कवी एखादा कळीचा प्रश्न किती साध्या शब्दात विचारू शकतो हे केदारनाथ सिंह यांच्या काही कवितांमधून जाणवतं. त्यांची कविता सहजासहजी आपल्या हातून निसटून जात नाही. एखादा रोमांचित करणारा स्पर्श दीर्घकाळ लक्षात राहावा तशी ती आहे. ती एखाद्या नादासारखी आतल्या आत झंकारत राहते.

साहित्याची वर्गवारी ही आपल्याकडे कधी कधी इतकी झापडबंद होऊन जाते की त्या वर्गवारीत चांगल्या साहित्याला कुठे कोंबायचं असा प्रश्न पडतो. शहरी, ग्रामीण, दलित, नागर अजून काय काय… विशाल अशा परिघात सर्वांना कवेत घेईल असं साहित्य खरे तर कुठल्याच वर्गवारीत ढकलता येत नाही. एक अशी कविता आहे जिने गावाचं चित्रणही केलं आणि शहरातल्यांनाही ती परकी वाटत नाही. नसता आपल्याकडे भविष्यात ग्रामीण म्हणावल्या जाणाऱ्या साहित्यातही ‘कोरडवाहू ग्रामीण साहित्य’ आणि ‘बागायती ग्रामीण साहित्य’ अशी वर्गवारी करावी लागेल की काय असा प्रश्न पडतो. कवी केदारनाथ सिंह यांची कविता हे अशा वर्गवारीला चोख उत्तर आहे. या कवितेत गाव आणि शहर अशी दोन्ही टोकं परस्परांच्या हातात हात घालून चालत असतात. या कवितेतील प्रतिमाविश्व हे विलोभनीय तर आहेच, पण एकूणच कवितेत विरळही आहे.

एखादा हात हाती घेतल्यानंतर जसा एक उबदार, आश्वासक असा स्पर्श जाणवतो तशी अनुभूती ही कविता देते. या कवितेत येणारं आकाश, पृथ्वी, नदी, प्रकाश, झाड, गवत, प्राणी- पक्षी असं सारं काही एखाद्या चित्रासारखं दृश्यमान होत जातं किंवा हळूहळू प्रकाशाचे रंग बदलत गेल्यानंतर चित्राचा गहिरेपणा अधिकच उत्कट भासावा तसं होऊन जातं. पाहता क्षणी अमूर्त वाटावं असं एखादं चित्र हळूहळू आकळत जावं आणि त्यातले आकारही संदर्भासह स्पष्ट व्हावेत असं या कवितेच्या बाबतीत वाचकांचं होतं जातं. ‘यहाँ से देखो’ हे केदारनाथ सिंह यांच्या एका कवितासंग्रहाचे नाव आहे. जणू वाचकालासुद्धा ही कविता ‘या दृश्यबिंदूपासून माझ्याकडे पहा’ असं आवाहन करते. भौतिक जगातल्या अनेक वस्तू या कवितेत येतात पण त्यांना केदारनाथ सिंह यांच्या संवेदनेचा स्पर्श होतो आणि पाहता पाहता त्या जणू एखाद्या सजीव गोष्टीत रूपांतरित होतात. रस- रूप- गंधासह त्यांचा परिचय वाचकांना होऊ लागतो.

‘विद्रोह’ या नावाची त्यांची एक कविता आहे. घरात प्रवेश केल्यानंतर अजब दृश्य दिसू लागते. घरातल्या निर्जीव वस्तू एक एक करत आपल्या मूळ नैसर्गिक रूपात पुन्हा पूर्ववत जाण्यासाठी संघर्ष पुकारतात. आम्हा सर्व कैद्यांना माणसाच्या तुरुंगातून मुक्त व्हायचे आहे असे म्हणतात. यात ‘बिस्तर’पासून ते नळातून टपकणाऱ्या पाण्यापर्यंत सर्वांनाच मुक्ती हवी आहे.

दीर्घकाळ शहरात वास्तव्य करणाऱ्या आणि खेड्यातून आलेल्या माणसालाही आपले आता परतीचे दोर कापले आहेत असे वाटू लागते. केदारनाथांच्या कवितेत मात्र तसे जाणवत नाही. शहर विरुद्ध खेडे अशी व्यस्त मांडणी ते करत नाहीत. ग्रामीण संचित घेऊन ते शहरात वावरतात आणि शहरी आधुनिकतेचा परिवेश धारण करून त्यांच्यातला कवी पुन्हा आपल्या गावी परततो. कौन है ये लोग/जो कि मेरे है ?/ इनके चेहरोंको देखकर / मुझे अपनी घडी की सुई / ठिक क्यों करनी पडती है बार बार/ स्वत:ला पुन्हा पुन्हा तपासत राहण्याची सजगता ही कवीला एक गरज वाटू लागते. याच कवितेत ते शेवटी म्हणतात की, काय करू म्हणजे या लोकांना मी त्यांच्यातलाच एक वाटेल ? हीच आहेत माझी माणसे की ज्यांना मी कवितेत आणतो आणि हे तेच लोक आहेत की जे मला कधी वाचणारही नाहीत.

अनुभव व्यक्त होताना कुठेही अनावश्यक अशी शब्दांची उतरंड नाही. फापटपसारा नाही. विनाकारण ताणलेला विस्तार नाही. उत्स्फुर्तता आणि सहजतेबरोबरच त्यांच्या कवितेत दिसून येते, ते परिश्रमपूर्वक रचलेले कवितेचे शिल्प. लोकपरंपरा, सामाजिक संकेत, लोकसमजुती या सर्व घटकांशी केदारनाथांच्या कवितेचे एक अतूट असे नाते आहे आणि त्यात एक रसरशीत असा जिवंतपणा आहे. त्यांच्या कवितेतून काही लोककथा सूक्ष्म असे रूप धारण करून अवतरतात. ‘कुछ सूत्र जो किसान बाप ने बेटे को दिए’ या त्यांच्या कवितेत अशा लोकधारणा क्रमाने येतात. या कवितेतला शेतकरी आपल्या मुलाला काही गोष्टी आग्रहाने सांगतो. झाडाचे हिरवे पान कधी तोडू नकोस आणि तोडायचेच असेल तर असे तोड की झाडाला जराही दु:ख होणार नाही. रात्री जेव्हा भाकरीचा तुकडा मोडशील तेव्हा शेतातल्या धान्याच्या रोपांची आठवण येवू दे किंवा अंधाऱ्या रात्री जर वाट चुकलास तर ध्रुवताऱ्यापेक्षा दुरून ऐकू येणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजावर विश्वास ठेव. अशा अनेक गोष्टी या कवितेत येतात.

‘पत्तीयों से सिप सिप सिप सिप गिरनेवाली धिमी गुनगुनाहट’, ‘तम्बाखु के खेतों से उठनेवाली खुंखार चमक’, ‘टमाटरों कि रोशनी में लहकता हुआ चेहरा’, ‘जाते हुए आदमी कि धुपमें चमकती हुई पीठ’ ‘एक विशाल फुल कि तरह खिलता हुआ शहर’ या त्यांच्या कवितेतील प्रतिमा पाहिल्या म्हणजे या प्रतिमांचा ताजेपणा किती तरतरीत आहे याची साक्ष पटते. त्यांच्या कवितेतील कोणतीच प्रतिमा गुळगुळीत आणि अर्थहीन वाटत नाही. तीव्र अशी संवेदनशीलता ज्या कवीकडे आहे, तोच कवी अशी तल्लख प्रतिमासृष्टी आपल्या कवितेतून उभारू शकतो.

या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात असलेलं संवादीपण. केदारनाथ सिंह यांच्या बहुतांश कविता या जणू एखाद्या संवादाच्या रूपात व्यक्त होतात. त्यामुळे वाचक या कवितेपासून अलिप्त राहत नाही, तो या कवितेशी जोडला जातो. ‘शब्द’ हा केदारनाथ यांच्या कवितेत वारंवार येणारा शब्द आहे. तो इतक्यांदा येतो तरीही प्रत्येक कवितेतले त्याचे अस्तित्व वेगळे आणि अर्थपूर्ण आहे. शब्दांची अक्षरंसुद्धा किती प्रभावी असतात हे त्यांच्याच एका कवितेतून दिसून येईल…‘एक जीर्ण असं हस्तलिखित, जे बहुधा गेल्या शतकातलं असावं. इतकं जीर्ण की भीत भीत मी त्याचं पहिलं पान उलगडलं आणि तुम्ही विश्वास ठेवा, मला त्यात एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. जी कुठल्यातरी अक्षराखाली दबून होती.’

केदारनाथ सिंह यांच्या ‘अभी बिल्कुल अभी’, ‘जमीन पक रही है’, ‘यहाँ से देखो’,‘अकाल में सारस’ आदी कविता संग्रहांमधील प्रतिमासृष्टी ही लोकजीवनाशी नाळ असलेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित विपुल असे संदर्भ ही कविता घेऊन येते, पण ती अजिबात सामान्य वाटत नाही. सामान्य माणसाच्या जगण्यातील आशा-आकांक्षा, त्यांची स्वप्न, हर्ष-खेद, दैनंदिन जीवनातले छोटे मोठे प्रसंग असा ऐवज या कवितेत येतो, पण त्याला केदारनाथांच्या जादुई शब्दकळेचा स्पर्श होतो आणि इथे ही कविता वेगळी ठरते, हा वेगळेपणाचा स्वर जपते. त्यांच्याच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘मैं उनकी तरफसे बोल रहा हूँ, जो चले गये है काम पर… और देखिए न मेरी मुस्तैदी कि मैं सबकी ओर से बोलता हूँ। ओर बोलता हूँ अपनी पुरी सच्चाई के साथ’. केदारनाथ यांची कविता ही एका अर्थाने समूहाचीच भाषा बोलते.

अभिव्यक्ती ही काळाची गरजच आहे याचे भान त्यांच्या कवितेत निरंतर जाणवते. या कवितेत सवंग विधाने आणि शेरेबाजी चुकूनही सापडत नाही. तरीही कवितेचे म्हणून जे एक तत्त्व आणि बांधिलकी असते त्यापासूनही ही कविता ढळत नाही. ‘चुप्पीया बढती जा रही है, उन सारी जगह पर/ जहाँ बोलना जरुरी था’ या शब्दांमधून हा कवी सर्वांनाच भानावर आणण्याचं काम करतो. ‘जर तुम्ही या वस्तीतून जात असाल तर त्यांचं ऐकण्याचा प्रयत्न करा, जे गप्प आहेत. त्यांना घडलेलं सारं आठवतंय पण ते बोलायचंच विसरले आहेत.’ असं सांगणारी त्यांची एक कविता आहे.

केदारनाथांची कविता कमालीची संक्षेपी आहे. ती कुठेही अतिरिक्त, अनावश्यक, अस्थानी शब्दातून व्यक्त होत नाही. म्हणूनच तिच्यात एक सहजता आहे. कधी कधी ही सहजता अंगभूत आहे की, त्यासाठी ते परिश्रमपूर्वक काही कारागिरी करतात हे वाचकांच्या लक्षातही येणार नाही. त्यांच्या कवितेतील शब्दांची निवड मात्र वाचकाला मोहवते, स्तिमित करते. ही कविता सहजासहजी आपल्या हातून निसटून जात नाही. एखादा रोमांचित करणारा स्पर्श दीर्घकाळ लक्षात राहावा असे या कवितेचे अस्तित्व आहे. ही कविता एखाद्या नादासारखी आतल्या आत झंकारत राहते. लोकतत्त्वांमधून आशयद्रव्य घ्यायचं आणि आधुनिकतेलाही तितक्याच समर्थपणे भिडायचं अशी अनोख्या जातकुळीची ही कविता आहे. सृष्टीचक्रातले असंख्य घटक या कवितेत येतात मात्र आपल्याकडच्या रूढीबाज आणि पारंपरिक वळणाच्या ह्यग्रामीणह्ण कवितेपेक्षा कितीतरी वेगळे या कवितेचे अस्तित्व आहे.

कवी एखादा कळीचा प्रश्न किती साध्या शब्दात विचारू शकतो हे त्यांच्याच एका ओळीचा दाखला देऊन सांगता येईल. ‘वे चुप क्यों है, जिनको आती है भाषा’. ज्यांना भाषा अवगत आहे ते गप्प का आहेत असा हा साधा प्रश्न आहे. एका कवितेत केदारनाथ सिंह म्हणतात, ‘ठण्ड से नहीं मरते शब्द, वे मर जाते है साहस की कमी से’ आजच्या काळात सर्जनशील लेखकांसाठी हे किती महत्त्वाचं आहे.