ही गोष्ट सूर्याइतकी जुनी आणि उजेडासारखी नवी आहे. ही गोष्ट चंद्राएवढी जुनी आणि चांदणीसारखी नवी. ही गोष्ट ढगाएवढी जुनी आणि पावसासारखी नवी. ही गोष्ट एखाद्या बीसारखी जुनी आणि हिरवळीसारखी नवी. ही गोष्ट फुलाइतकी जुनी आणि फळासारखी नवी. विजयदान देठा यांच्या ‘दिवाले की बपौती’ या कथेची सुरुवात अशी होते. गोष्ट सांगण्याची जी लोककथेची पद्धत आहे त्या शैलीत या कथा सुरू होतात. विजयदान देठा यांना राजस्थानात ‘बिज्जी’ या नावाने ओळखलं जातं. वेगवेगळ्या जातसमूहातल्या असंख्य लोककथा त्यांनी संकलित केल्या. यात भटक्या विमुक्तांपासून ते समाजातल्या तळाच्या वर्गापर्यंतच्या अनेक समूहांचा समावेश आहे. अगदी सुरुवातीला लोककथांचं संकलन करण्याचं हे काम पुढे वेगळ्याच दिशेने विकसित होत गेलं. या लोककथांना नवे आयाम देणं, त्यांना आधुनिक संदर्भानिशी पुन्हा नव्यानं सजवणं आणि आजच्या काळाचा अर्थ प्राप्त करून देणं अशा अनेक गोष्टी बिज्जी यांनी केल्या. ‘बातां री फुलवाडी’ या नावाने या सगळ्या कथा सुरुवातीला राजस्थानी भाषेत चौदा खंडांमध्ये आल्या. पुढे त्या हिंदीत अनुवादित झाल्या.
बिज्जी यांनी या लोककथा जशाच्या तशा शब्दबद्ध केल्या नाहीत. त्यात खूप बदल केले. आता त्यांची ‘दुविधा’ सारखी कथा याचे उदाहरण म्हणून पाहता येईल. एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर आपल्या गावी परतत असताना एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतं. त्या झाडावर एक भूत असतं. नवविवाहितेच्या सौंदर्यावर हे भूत भाळतं. लग्नानंतर लगेचच त्या तरुणीचा नवरा व्यापारासाठी पाच वर्षांकरिता दूरदेशी जायला निघतो. तेव्हा हे भूत त्याला भेटतं. त्याच्याकडून स्वत:ला हवी तेवढी माहिती काढून घेतं आणि त्याचंच रूप घेऊन त्या तरुणीसोबत राहू लागतं. तिच्या नवऱ्याचं रूप धारण करून त्या तरुणीसोबत राहिलेल्या त्या भुताने त्या तरुणीवर जीवापाड असं प्रेम केलेलं असतं. व्यापारासाठी दूरदेशी गेलेला नवरा एके दिवशी परततो आणि इथं एक द्विधा परिस्थिती निर्माण होते. आपल्या बायकोच्या भावनेचा विचार न करता भौतिक गोष्टीतच गुरफटलेला तो आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करणारं हे भूत यात निघून गेलेला काळ आणि मानवी नातेसंबंध यावर ही कथा भाष्य करते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मूळ राजस्थानीतली ही अतिशय कमी शब्दातली लघुकथा. पुस्तकाचं अर्ध पान होईल एवढाच तिचा ऐवज पण बिज्जी यांनी ती वीस पानांपर्यंत फुलवली. मणी कौल यांचा या कथेवर ‘दुविधा’ नावाचा सिनेमा १९७३ यावर्षी आला आणि पुढे अमोल पालेकर यांचा त्याच कथेवरचा ‘पहेली’ हा सिनेमा २००५ यावर्षी आला. एका व्यापाऱ्याचा मुलगा, त्याची नवविवाहित वधू आणि भूत अशा तीन प्रमुख व्यक्तिरेखा या कथेत आहेत. मूळ लोककथेत या नवविवाहित वधूला जास्त जागा नाही. व्यापाऱ्याचा मुलगा हा नायक आहे. भूत हे या लोककथेत खलपात्र आहे. बिज्जी यांनी या कथेला वेगळी कलाटणी दिली. इथं भूत हे नायक ठरतं आणि कथेतील तरुण विवाहित स्त्री, जिला लोककथेत फारशी जागा नव्हती ती इथे सशक्त व्यक्तिरेखा वाटू लागते. व्यापाऱ्याचा मुलगा खलपात्र ठरतो. ज्याला पैसा इतका महत्त्वाचा वाटतो की तो प्रेमाचे मूल्य समजत नाही.

‘उलझन’ या त्यांच्या कथेतला युवक जंगल आणि प्राण्यांमध्ये वाढतो. चार पायांवर चालणाऱ्या प्राण्यांसारखं तो दोन हात आणि दोन पायांच्या आधारे चालू लागतो. जंगलात राहिल्याने त्याचा देह काळ्या केसांनी एखाद्या अस्वलाप्रमाणे झाकला जातो. योगायोगाने एका परित्यक्ता स्त्रीच्या संपर्कात तो येतो. ही स्त्री त्याला एका देखण्या तरुणात बदलून टाकते, खऱ्या अर्थाने त्याला माणसात आणते आणि त्याच्यासोबत विवाहबद्ध होते. एका नाट्यपूर्ण प्रसंगात कथेला वेगळेच वळण मिळते आणि त्यातून हा तरुण म्हणजे एका राजाचा मुलगा असल्याचे सत्य पुढे येते. लहानपणीच आपल्या आई-वडिलांपासून दूर झालेला हा मुलगा जंगलातच वाढलेला असतो. राजाला ही गोष्ट कळते तेव्हा तो आपल्या या तरुण मुलाला आणि त्याच्या पत्नीला राजवाड्यात घेऊन येतो. अधिकारपदाची सूत्रे आपल्या या मुलाकडे सोपवतो. हा तरुण राजाच्या भूमिकेत शिरल्यानंतर मात्र त्याच्यातला निरागसपणा आणि प्रेमळ वृत्ती नष्ट होते. सत्ता त्याला निर्दयी आणि भ्रष्ट करते. जेव्हा तो अंगावरच्या केसांमुळे अस्वलासारखे दिसत होता तेव्हा त्याच्यात माणूसपण होते. आता नागरी परिवेशात आल्यानंतर तो आधुनिक दिसतो पण सत्ता अंगी मुरल्यानंतर तो पशुवत वागायला लागतो. त्याच्यातला राजा अनिर्बंध सत्तेमुळे पाशवी ताकदीचा अवलंब करायला लागतो. त्याच्या या वर्तनाचा फटका प्रजेला बसतो आणि आपल्या पत्नीचाही तो छळ करायला लागतो. शेवटी त्याच्या बायकोला पश्चात्ताप होतो. याला जंगलातून मी माणसांच्या जगात आणलं. सत्तेचा वारा लागल्यानंतर हा बदलला. सत्तापदी बसल्यानंतर याच्यातलं माणूसपण एकाएकीच संपुष्टात आलं या विचाराने ती चिंताक्रांत होते. आता ती गरोदर असते आणि तिला एक प्रश्न सातत्याने छळतो की आपल्या पोटी आता काय जन्माला येणार ? ‘अस्वल’ की ‘माणूस’?… अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण करणारी ही कथा आहे.

विजयदान देठा यांच्या अन्यही साहित्यकृतींवर अनेक सिनेमे निघाले. नाट्यरूपांतरं झाली. प्रकाश झा यांचा ‘परिणती’, शाम बेनेगल यांचा ‘चरणदास चोर’, दैदीप्य जोशी यांचा ‘कांचली’ याशिवाय कथांवर झालेल्या लघुपटांची संख्या तर किती तरी. जोधपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरुंदा या गावी राहूनच त्यांनी हे सर्व लेखन केलं. तसा हा सारा परिसर वैराण… बारमाही सिंचनाखाली असणारी हिरवीगार शेतं नाहीत, पावसाच्या पाण्यावर येणारी बाजरीसारखी पिकं, पांढुरक्या जमिनी, त्यावरचं खुरटं गवत असा सगळा भवताल असणाऱ्या परिसरातच विजयदान देठा यांनी गोष्टींची फुलबाग असलेली कथासृष्टी निर्माण केली. आयुष्यभर आपल्याच राजस्थानी भाषेत लेखन केलं. त्यांचे पुत्र कैलासदान देठा यांनी त्यांच्या बहुतेक कथांचा हिंदी अनुवाद केला आहे. कैलास कबीर या नावाने ते हिंदीत कविता लेखन करतात. इंग्रजीतही बिज्जी यांच्या कथांचे संकलन उपलब्ध आहे. २०११ या वर्षी नोबेल पारितोषिकासाठी त्यांचं नामांकन झालं होतं. त्यांची कथासृष्टी अत्यंत मोहक आहे. यात भूत- खेत, राजा- राणी, पशुपक्षी, निसर्ग असं सारं काही आहे. या गोष्टी वाचताना आपण त्या एखाद्या बुजुर्गाच्या मुखातून ऐकत आहोत असा भास होतो. राजस्थानी लोकसंगीत, कला, लोकसाहित्य या संदर्भात संकलन- संवर्धनासाठी बिज्जी यांनी बोरुंदा या गावीच ‘रूपायन’ ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेची भव्य अशी दगडी इमारत तिथं आहे आणि त्यांच्याच काही कथातील दृश्यं असणारी शिल्पेही तिथे लावण्यात आली आहेत.

बिज्जी यांच्या लेखनाचं मर्म काय? इतिहास म्हणजे केवळ संस्थानिकांच्या कहाण्या, सणावळ्या आणि राजमहालातल्या लोकांचे जीवन एवढाच मर्यादित नाही. लोकजीवनाच्या जिभेवर असलेल्या रयतेच्या कहाण्या यासुद्धा तेवढ्याच आश्वासक, जिवंत आणि महत्त्वाच्या आहेत या भावनेतून त्यांच्या सर्व कथांकडे पहावं लागतं. राजस्थानी भाषेतले वाक्प्रचार, म्हणी, लोक संकेत अशा गोष्टींनी या सर्व कथा ओतप्रोत आहेत. गावातले भूमिहीन शेतमजूर, स्त्रिया, शेतकरी, सामाजिकदृष्ट्या तळाचे लोक हे सर्वच जण पारंपरिक रूढी आणि शोषणाच्या विळख्यात जखडलेले होते मात्र आपल्या मुक्तीसाठी त्यांनी काही कहाण्या रचल्या. गीतं लिहिली. मोठमोठ्या सामंतशहापुढे भलेही या सर्वसामान्य जनतेने स्वत:ला हतबल असल्याचं अनुभवलं असेल पण कल्पनेच्या पातळीवरच्या निर्मितीत या रयतेने कधीही समझोता केला नाही. लोकसाहित्याची उपज त्यातून झाली आहे. योग्य वेळी रयतेच्या या कल्पनाशक्तीने सत्ताधीशांना, सरंजामदारांना, देवा- धर्माच्या मुखंडांनाही ललकारलं आहे. याची साक्ष विजयदान देठा यांच्या अनेक कथा देतात. खुद्द त्यांनीच या कथांबद्दल असं म्हटलं आहे की, ‘सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या लढाईचं क्षेत्र हे एखाद्या युद्धभूमीपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. युद्धभूमीवर असंख्य शरीरांच्या कत्तली होतात, रक्तांचे पाट वाहतात आणि पशुत्वाचं दर्शन घडतं. मात्र जगण्याच्या लढाईतले हुंकार जेव्हा लोकभाषेत व्यक्त होतात तेव्हा ते केवळ मानवीय असतात. वेद, पुराण, उपनिषद आणि रामायण- महाभारतातली कथानकं निवडून त्यावर प्रयोग करण्यापेक्षा मी राजस्थानातल्या पारंपरिक लोककथांना आपल्या भाषेत, नव्या शैलीत, पुन्हा नव्याने रचलं आहे. आधुनिक परिप्रेक्ष्यात त्यात नवे रंग भरले आहेत.’ … म्हणूनच हे रंग आजही तितकेच ताजे आणि टवटवीत आहेत.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta taltipa vijaydan detha the story folktales borunda rajasthan amy