या लेखात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी आहे. द्वैभाषिक मुंबई राज्य निर्मितीनंतर (१९५६) संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली मराठीचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्र अस्तित्वात यावे, म्हणून मोठे आंदोलन झाले. परिणामस्वरूप १ मे, १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्रा. गं. बा. सरदार संपादित ग्रंथ ‘महाराष्ट्र जीवन : परंपरा, प्रगती आणि समस्या’ (खंड एक-दोन) (१९६०)विषयी जाणून घेऊया. या ग्रंथातील पहिल्या खंडात ‘तत्त्वमीमांसा’ भागात ‘आंग्लपूर्व काळ’ हा लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिला आहे.
आंग्लपूर्व काळ म्हणजे बारावे ते अठरावे शतक. या सहाशे वर्षांत मुकुंदराज, ज्ञानदेव, चांगदेव, एकनाथ, दासोपंत, रामदास, वामन पंडित प्रभृती कवींनी महाराष्ट्रातील ‘तत्त्वमीमांसे’चा प्रपंच उभारला. त्यातही श्रीचक्रधर, कवी मुकुंदराज व ज्ञानेश्वरांनी संस्कृत प्रस्थान त्रयीवर (उपनिषद, भगवद्गीता व ब्रह्मसूत्रे) आधारित मराठी तत्त्वज्ञानाची रचना केली. द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद व द्वैत अशा पाच प्रकारचा वेदांत बादरायणाच्या ‘ब्रह्मसूत्र’ ग्रंथावर आधारित तयार केला. यापैकी अद्वैतमत व्यक्त करणारे ‘शांकरभाष्य’ (आद्या शंकराचार्य) यांच्या आधारे मराठी कवींनी तत्त्वमीमांसा केलेली दिसते. मात्र, मध्यकाळात द्वैताद्वैतवाद, शुद्धाद्वैत्वाद आणि अद्वैतवाद यांचा अभाव दिसून येतो. जुन्या भागवत धर्माच्या तत्त्वज्ञानास वर्तमान पारखे झाल्यासारखी स्थिती आहे. वर्तमानात आपण भावना आणि श्रद्धांवर विजय मिळविला आहे. बुद्धीवर भरवसा ठेवण्याच्या अपरिहार्य काळात परतत्त्वास फारसा अवकाश राहिलेला नाही, हे तर्कतीर्थांचे मत निष्कर्ष असून, ते तत्त्वज्ञानाच्या व्यासंगातून आलेले आहे, हे विसरून चालणार नाही. तर्कतीर्थांची ही तत्त्वमीमांसा महाराष्ट्राच्या भावी जीवनात पथदर्शक ठरणारी असल्याने ती विचारणीय सिद्ध होते.
प्राचीन युगातील भारतीय तत्त्वदर्शनाचा वारसा मराठी वाङ्मयास मध्ययुगात लाभला. या तत्त्वदर्शनाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात उपनिषदे, सांख्यदर्शन, भागवत धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म यांचा अंतर्भाव होतो. दुसऱ्या भागात षड्दर्शने येतात. यात ज्ञानमीमांसाही येते. ज्ञानमीमांसा ही तत्त्वदर्शनाच्या प्रौढावस्थेचे गमक असते. पैकी उपनिषदे सत्य तत्त्व केंद्रित आहेत. भारतात ज्ञानाकरिता ज्ञान या दृष्टीने तत्त्वचिंतन झाले नाही. भारतीय दर्शने ही पुरुषार्थ प्रयोजनाने प्रेरित आहेत. प्राचीन भारतीयांची तत्त्वदर्शने योग्य प्रकारे लक्षात घेतली, तर ती परिपूर्ण विचारस्वातंत्र्याचे साकार झालेले विशाल विचारविश्व साकार करते, असे दिसून येते. वेदप्रामाण्य मानणारी गौतम, कणाद, कपिल, पतंजली, जैमिनी व बादरायण यांची सहा आस्तिक दर्शने एका बाजूस आहेत, तर दुसरीकडे वेदप्रामाण्य नाकारणारी बौद्ध, जैन व चार्वाक ही दर्शने दिसून येतात. ही ईश्वरवादी आणि अनिश्वरवादी दर्शने परस्पराच्या युक्तिवादाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. या सर्व भारतीय दर्शनांना ‘वाद’ ही संज्ञा लाभली आहे. मराठी तत्त्वमीमांसेच्या पाठीशी ही हजारो वर्षांची वादपरंपरा आहे. चक्रधर, मुकुंदराज, ज्ञानदेव यांचे काव्य या तत्त्वमीमांसेवर उभे आहे. रामदास, वामन पंडित यांच्या काव्यातही तत्त्वमीमांसा आहे. प्राचीन काव्य आणि तत्त्वमीमांसा यांचे अद्वैत लक्षात घेण्यासारखे आहे.
आंग्लपूर्वकाळात संत, पंडित कवींनी आपल्या काव्यात परतत्त्व विवेचन केलेले आहे. ही पूर्वकाव्यातील श्रद्धेची घट्ट पकड आता ढिली पडण्याचे युग आहे. आजच्या भारतीय समाजात अश्रद्ध निर्भय आहेत. सामाजिक कायदे धर्मशास्त्राच्या चौकटीची बंधने तोडून समाज बदलत आहेत, तसेच व्यक्तिजीवनही बदलले आहे. कर्मकांडरूपात तो आचारधर्म होता, त्यामुळे जीवनात पावित्र्य होते. ते आता उरले नाही. संस्कार संपल्याने वैचारिक विसंगती निर्माण झाली आहे. भावना व बुद्धीमध्ये विरोध निर्माण झाला आहे, त्यामुळे नव्या जगाला परतत्त्व पारखे झाले आहे.
प्रस्तुत लेखात तर्कतीर्थांनी विस्ताराने महाराष्ट्र जीवनाची तत्त्वमीमांसा केली आहे. बुद्धी व मन हे विचार आणि भावनांचे उत्पत्तिस्थान आहे. श्रद्धा हृदयात निर्माण होते, तर विचार बुद्धीतून. भारतीय दर्शनातील परतत्त्व हृदयस्थ असते. ते मानवी सदाचार नियंत्रित करते. श्रद्धा संपली की विचार मुक्त होतात. ते नेहमी विधायक राहतात असे नाही.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com