लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा. नोव्हेंबर आणि डिसेंबर, १९३७ च्या ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या अंकांमध्ये प्रसिद्ध झालेला. दुसऱ्या महायुद्धाची त्यास पार्श्वभूमी होती. यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, सर्व समाजव्यवस्थेच्या मुळाशी असलेले विचारांचे युग बदलले आहे. त्यांची समीक्षा करणे आता आवश्यकच नव्हे, तर अनिवार्य झाले आहे. जुने अर्थोत्पादन मानवी श्रमांवर आधारित होते. त्याला मर्यादा होती. आता यंत्राद्वारे उत्पादन होऊ लागले आहे. ते अमर्याद आहे. मानवी श्रमाचे मूल्य कमी होऊन उत्पादित वस्तूचे मूल्य वधारले आहे. माणूस छोटा झाला आणि पैसा मोठा झाला आहे.

युरोपात बुद्धिवादाने प्रबोधन युगात (रेनेसान्स) श्रद्धावाद आणि परंपरावादी विचारांवर कुठाराघात केला. हा आघात प्रामुख्याने दोन प्रकारच्या विचारधारांवर होता. १) सृष्टीविषयक विचारपद्धती, २) समाजविषयक विचारपद्धती. यामुळे धर्मश्रद्धा आणि धर्मस्वरूप यांची चिकित्सा सुरू झाली. यातून युरोपात चर्च, पोप आणि बायबल यांना आव्हान दिले गेले. ते आव्हान एका अर्थाने धर्मव्यवस्था, धर्मगुरू व धर्मग्रंथ यांनाच होते. या तत्त्वचिंतनातून चिकित्सा युग (दी एज ऑफ क्रिटिसिझम) जन्माला आले.

भारतात या युगाचे आगमन ब्रिटिशांमुळे झाले. भारतात पूर्वापार धर्म, इतिहास, समाजशास्त्रादींचा अभ्यास श्रद्धांच्या आधारे होत असे. त्याची जागा बुद्धिवादाने घेतली. आस्तिक, नास्तिक चर्चांच्या पलीकडे धर्मनिरपेक्षतेचा विचार सुरू झाला. युरोप आणि भारतातील धर्मस्वरूप मूलत: भिन्न आहे. युरोपात एकविचारी धर्म होता. भारतातील धर्मविचार हा अनेकांगी आहे, त्यामुळे येथे वस्तुविज्ञानास एकमुखी विरोध झाला नाही. इथे विरोध झाला तो धर्म आणि समाजसुधारणांना. येथील समाजात मूल्यनिष्ठेस असाधारण महत्त्व होते. ते पूर्वापार चालत आलेले होते. युरोपातील नव्या वस्तुनिष्ठ चिकित्सा युगाचा भारतावर जो परिणाम झाला, त्याचे पडसाद म्हणून भारतातील जाती-धर्मांवर आधारित अर्थोत्पादन व येथील अर्थसाधने प्रभावित झाली. त्यातून इथे नवतत्त्वज्ञान युगाचा उदय झाला.

तत्त्वज्ञानातून मात्र नवी साधने निर्माण होत नसतात. ती निर्माण होतात विज्ञानातून. विशेषत: वस्तुविज्ञानातून. बुद्धिवादाचा प्रयत्न जीवन भौतिकदृष्ट्या संपन्न करण्याचा असतो. प्रत्येक विचारधारा या शास्त्राचे मार्ग व पद्धती मात्र भिन्न असतात. विज्ञान आपणास कार्यकारण भाव शिकविते, त्यामुळे भविष्यावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते. भौतिक विश्व जीवनोपयोगी बनविण्याचे कार्य विज्ञान करीत असते. साठवण, वृद्धी, विनिमय, विभागणी या प्रक्रियांतून समाजरचना आकाराला येत असते. जगात ज्या प्रकारचा समाज तयार होतो, तसे त्याचे कायदे, धर्म, नीती इत्यादी बनत असते. जशी उत्पादन पद्धती असते, त्यावर समाजाचे स्वरूप अवलंबून असते. त्या स्वरूपाधारित क्रिया-प्रतिक्रिया समाजात घडत राहतात. यातून नवीन विचारयुग व त्यांचे तत्त्वज्ञान जन्म घेत असते.

मानवी विचारधारा कालौघात निरंतर उन्नत होत राहतात. धार्मिक, तात्त्विक आणि शास्त्रीय विचारधारांच्या संदर्भात हे लक्षात येते. धार्मिक विचारधारांमधून देवचरित्राची निर्मिती होते, तर तात्त्विक व शास्त्रीय विचारधारांतून मनुष्याची जडणघडण होते. धर्मसंबंधी विचारधारा मानवी समाजाच्या प्रारंभिक अज्ञानकालात तर अधिक प्रभावी होत्या. मध्ययुगात आध्यात्मिक आणि तात्त्विक विचारधारा अस्तित्वात आल्या, तर आधुनिक काळात विज्ञान विकसित झाले असले, तरी प्रत्येक विचारधारेत अंगभूत गुणदोष राहतातच. मानवी बहुजन समाजास विविध पारंपरिक बंधनांतून जे तत्त्वज्ञान मानवी जगास समृद्ध, सबल करते, ते नव्या युगाचे तत्त्वज्ञान म्हणून स्वीकृत होत राहते.

तत्त्वज्ञान आणि विज्ञानात मूलभूत फरक असतो. तत्त्वज्ञान तर्कातून, व्यक्तिमत्त्व चिंतनातून जन्मते, तर विज्ञान प्रयोगांतून. त्यामुळे शास्त्रीय ज्ञानाच्या तुलनेत तत्त्वज्ञान दुर्बल ठरते. तत्त्वज्ञानी काल्पनिक, गतिहीन सत्य सांगतो, तर वैज्ञानिक गतिमान सत्याचा साक्षात्कार घडवून आणतो. तत्त्वज्ञानाची सारी भिस्त मन, बुद्धी, विचार यांवर असते. परंतु, विज्ञान प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष अशा अवस्थेतून सत्याचा शोध घेत निर्मिती करत असते. एका अर्थाने तत्त्वज्ञान पर्यंकपांडित्य (सुखासीन ज्ञान) असते, वैज्ञानिक ज्ञान वस्तुनिष्ठ राहते. तात्त्विक ज्ञानाने नवनिर्मिती होत नसल्याने मानवी समाज क्रांतिकारक बनत नाही. (यास रेनेसान्स, मार्क्सवाद अपवाद होत.)

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com