सन १९८४मध्ये एस. एम. जोशी यांचा ‘सहस्राचंद्रदर्शन सोहळा’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ‘एस. एम. सहस्रादर्शन गौरव ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आला होता. एस. एम. जोशी गौरव समितीतर्फे प्रकाशित या ग्रंथाचे संपादन सर्वश्री मधु लिमये, मधु दंडवते, प्रेम भसीन, बाबा आढाव, भाई वैद्या यांनी केले होते. त्यात ‘राजकीय पक्षपद्धतीची अधोगती’ शीर्षक लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिला होता.
त्यात त्यांनी तत्कालीन राजकीय पक्षांच्या अंतर्गत लोकशाही कार्यपद्धतीची सतत होणारी घसरण लक्षात घेत भाष्य करीत लिहिले होते की, प्रातिनिधिक किंवा संसदीय लोकशाहीमध्ये पर्यायी पक्षपद्धती अस्तित्वात येऊन स्थिर व्हावी लागते. भारतामध्ये निवडणुकीनंतर एक पदच्युत झाला, तर दुसरा पर्यायी पक्ष सत्तेवर यावा, अशी परिस्थिती सध्या नाही आणि नजीकच्या भविष्यकाळी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. कारण, विरोधी पक्षांना सारखे तडे जात आहेत. एका पक्षातून दोन, दोघांचे चार-पाच-सहा असे लहान लहान तुकडे निर्माण होत आहेत. याचे कारण, पक्षातील गट, स्पर्धा व वैयक्तिक स्पर्धा, आधुनिक राज्याच्या ठायी असलेली सत्ता विलक्षण प्रक्षोभक आहे. सगळ्या तऱ्हेच्या वासनांना आणि मोहांना चेतवणारी आहे. पक्षांमध्ये अवांतर गट उत्पन्न होतात आणि ते एकमेकांच्या विरुद्ध जळत असतात. एकमेकांचे पाय ओढू लागतात. आयाराम, गयाराम, दलबदलू वाढीस लागले आहेत. ज्या पक्षाची सद्दी असते, त्या पक्षात आयाराम आणि ज्या पक्षाची शक्ती क्षीण झालेली असते, त्यात गयाराम उत्पन्न होतात. सत्तेवर जातात. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खूनही होऊ लागले आहेत. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा खून झाल्यास तिकडे दुर्लक्षही करतात. या ध्येयशून्य व गर्ह्य प्रवृत्ती आज सत्ताधारी पक्षामध्येसुद्धा सारख्या उलटून वर येत आहेत.
यातून सत्तेवर दृढपणे पक्का रूढ झालेला पक्ष हळूहळू हुकूमशाही प्रवृत्तीचा बनायचा धोका वाढू लागला आहे. हुकूमशाही की लोकशाही, अशा तऱ्हेचा पेचप्रसंग आज उत्पन्न झालेला आहे. भारतीय लोकशाही धोक्यात सापडली आहे. परंतु, हा धोका सामान्यांच्या मनामध्ये कसलीही चिंता उत्पन्न करीत नाही. याचे कारण, राजकीय पक्षोपपक्ष हे लोकविमुख बनले आहेत.
सत्ताधारी विशेषत: आणि विरोधी पक्ष हे अलीकडे हळूहळू गुंडांना जवळ करू लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांच्या ज्या हकिकती विश्वसनीय व्यक्ती आणि संस्थांकडून बाहेर येत आहेत, त्यावरून सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष हे जनतेच्या विवेकबुद्धीवर अवलंबून किंवा विसंबून देशाच्या राजकीय जीवनाला सामर्थ्य देत नाहीत, हे स्पष्ट होते. अनेक गुन्हेगार, गुंड राजकीय सत्तेची केंद्रस्थाने काबीज करू लागले आहेत.
गेली पाच-सहा वर्षे लोकसभा व राज्यसभांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचे वर्तन सभ्यतेच्या मर्यादांचा अनेक वेळा भंग करते. प्रचंड कोलाहल माजतो. अनेक सदस्य एकदम उठतात, बोलतात; आरडाओरड चालू राहतो. वस्तुत: सभ्यता राखणं ही बहुमतात असलेल्या सत्ताधाऱ्यांची मुख्य जबाबदारी. तीच त्यांना पेलावत नाही, असे वारंवार सिद्ध झाले आहे.
संसदीय किंवा प्रातिनिधिक लोकशाहीला आवश्यक राजकीय पक्षपद्धती होय; तिलाच प्रथम धोका पोहोचण्याची शक्यता उत्पन्न झाली आहे. तिची उपयुक्तता संपली आहे किंवा संपण्याची शक्यता वाढत आहे. वस्तुत: मूलगामी लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाही परिणत होणे, हे समाजाच्या राजकीय विकासाचे उद्दिष्ट आहे. परंतु, या उद्दिष्टाच्या दिशेने राजकीय पक्षांची वाटचाल सुरू नाही म्हणून असे म्हणावे लागते की, एकंदरीत संसदीय लोकशाही धोक्यात सापडली आहे. कारण, राजकीय पक्षपद्धतीचा ऱ्हास व अधोगती होऊ लागली आहे.
तर्कतीर्थांनी प्रस्तुत लेखांच्या पूर्वार्धात जगात असलेल्या लोकशाही राष्ट्रांमध्ये पक्ष व पक्षपद्धती, संसदीय व्यवहार यांचा ऊहापोह केलेला होता व त्या पार्श्वभूमीवर वरील भारतीय लोकशाहीतील पक्षपद्धतीच्या अधोगतीचे चित्रण केले होते. विचार स्वातंत्र्य आणि संघटना स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा पाया असतो, तो आपण गमावल्याचं खेदजनक वास्तव चित्रित करून त्यांनी आत्मपरीक्षणास भाग पाडले आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com