शरद बाविस्कर
‘तत्त्वज्ञानाला लवकरात लवकर लोकाभिमुख आणि लोकप्रिय केलं गेलं पाहिजे.’ – दनी दिदरो (१७५३)
वर्तमानपत्र म्हणजे दैनंदिन मानवी व्यवहाराला प्रतिबिंबित करणारा अवकाश आणि तत्त्वज्ञान म्हणजे दैनंदिन व्यवहाराशी संबंधित नसलेली, गूढ आणि अव्यवहारी समजली जाणारी गोष्ट. या प्रचलित धारणांनुसार पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मराठीत- त्यातही, वृत्तपत्रासारख्या अवकाशात मांडणी करण्याचा प्रयत्न म्हणजे दुहेरी कसरत होय. वर्तमानपत्राची भाषा आणि तत्त्वज्ञानाची ‘दुर्बोध’ भाषा यांतील दरीसोबतच पाश्चात्त्य परंपरा आणि भारतीय परंपरेमधील ‘निषिद्ध’ मानण्यात आलेली दरीदेखील आहे. प्रस्तुत लेखमालेचं उद्दिष्ट पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची संकल्पनात्मक मांडणी करणं आहे. विषयप्रवेशाच्या निमित्तानं या लेखमालेची प्रासंगिकता अधोरेखित करताना त्या ‘दुहेरी कसरती’विषयी सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे. खरंतर, ही दुहेरी कसरत पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या एकूणच चरित्राशी आणि वाटचालीशी संबंधित आहे.
(अ) पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या संकल्पनेचं लोकाभिमुख स्थित्यंतर :
मध्ययुगीन युरोपात एकंदर लोकसंख्येपैकी मोजक्याच लोकांच्या समूहाला ‘समाज’ या संकल्पनेचा दर्जा होता. मात्र १५व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १६व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये रनेसाँरूपी आधुनिकतेची पहाट होते. रनेसाँच्या दीर्घ प्रक्रियेत ‘मानव’ आणि ‘समाज’ या संकल्पनांत मूलभूत स्थित्यंतर घडून येतं. आधुनिकतेच्या प्रक्रियेत बंदिस्त, संकीर्ण समाजाच्या संकल्पनेचं विघटन होऊन त्याजागी सर्वसमावेशक समाजाच्या संकल्पनेचा उदय होतो. या आधुनिक समाजाच्या निर्मितीची पूर्वअट म्हणजे सार्वजनिक अवकाशाची निर्मिती, जिथं आधुनिक मूल्यांच्या आधारे ‘खासगी’ माणसांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडते. युरोपात कुटुंबसंस्था, धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्या प्रभावापासून लांब वर्तमानपत्रं, नियतकालिके, पॅम्फ्लेट, क्लब, कॅफे, सालों आणि विविध विषयांना वाहिलेल्या अकादमी इत्यादींच्या मदतीनं सार्वजनिक अवकाशाची निर्मिती आणि विस्तार होतो; त्यातून आधुनिक चर्चाविश्व उदयास येतं. विविध क्षेत्रांतला ज्ञानव्यवहार आणि त्यांची समग्रपणे मांडणी करू पाहणारी तत्त्वज्ञानं मोजक्या लोकांपुरती न राहता सार्वजनिक अवकाशात प्रवेशतात. लोकशाहीकरणाच्या या दीर्घ प्रक्रियेत तत्त्वज्ञान हे फक्त मोजक्यांनाच शक्य आणि मोजक्यांसाठीची गोष्ट राहिली नसून सगळ्यांना शक्य आणि सगळ्यांसाठी आवश्यक असं मूलभूत साधन आणि साध्य म्हणून मांडलं जातं. खरंतर सार्वजनिक अवकाशातील चर्चाविश्वात वर्तमानपत्रं, पॅम्फ्लेट्स, नियतकालिकं आदी माध्यमांनी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. तत्त्वज्ञानातले महत्त्वाचे प्रश्न वर्तमानपत्रासारख्या अवकाशात साध्यासोप्या भाषेत चर्चिले गेले. उदा.- ‘प्रबोधन म्हणजे काय?’ हा ऐतिहासिक निबंध इमॅन्युएल कांटनं (१७२४- १८०४) वर्तमानपत्रीय शैलीत लिहिला आहे. ‘माणसांमधील विषमतेच्या मुळांची कारणमीमांसा करणारं संभाषित’ हा निबंध रूसोनंही (१७१२- १७७८) वर्तमानपत्रीय शैलीतच लिहिला; त्याची प्रखर चर्चा तत्कालीन सार्वजनिक अवकाशात झालेली दिसते. थोडक्यात, तत्त्वज्ञानाची भाषा आणि वर्तमानपत्राची भाषा यांतला भेद कमी करण्याची कसरत आधुनिकतेच्या प्रक्रियेत मध्यवर्ती राहिली आहे.
(ब) फिलॉसफी शब्दाच्या अर्थछटा :
पाश्चात्त्य तत्त्वज्ञान मराठीत अभिव्यक्त करताना येणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पाश्चात्त्य संकल्पनांसाठी मराठीत समाधानकारक शब्द शोधणं. उदाहरणार्थ, फिलॉसफी शब्दासाठी मराठीत तत्त्वज्ञान हा शब्द रूढार्थाने वापरला जातो. पण वास्तवात हे दोन शब्द वेगवेगळ्या गोष्टी सूचित करतात. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक मे. पुं. रेगेंच्या मते प्राचीन भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थी तात्त्विक परंपरांसाठी ‘दर्शनशास्त्र’ हा शब्द वापरला जात असे. या ‘चपखल’ शब्दाऐवजी तत्त्वज्ञान हा मराठी शब्द रेगेंच्या दृष्टीने असमाधानकारक आहे, कारण हा शब्द प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेशी फारकत घेऊन आधुनिक महाराष्ट्रातील विचारविश्वात काहीतरी नवीन मांडू पाहात आहे.
दुसऱ्या बाजूला, दर्शनशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे शब्द फिलॉसफी या शब्दाची ऐतिहासिक वाटचाल आणि त्यातून येणारा गर्भितार्थ पुरेसा सूचित करत नाहीत. फिलॉसफी हा शब्द ‘फिलिया’ आणि ‘सोफिया’ या दोन ग्रीक शब्दांनी बनलेला आहे. ‘फिलिया’त प्रेम, मैत्री, आनंद, लालसा अशा अर्थछटा दडलेल्या आहेत आणि ‘सोफिया’चा अर्थ ज्ञान, शहाणपण असा होतो. त्याअर्थी फिलॉसफी म्हणजे ज्ञानाशी मैत्री आणि ज्ञानावर प्रेम करणं. फिलॉसफी शब्दातच मैत्री, प्रेम, आनंद, लालसा सारख्या मानवी भावनांचा अंतर्भाव करून सॉक्रेटिस आणि प्लेटोसारख्या प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी धर्मशास्त्र आणि मिथकशास्त्रांपासून निर्णायकपणे फारकत घेऊन, फिलॉसफीला स्वायत्तता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फिलॉसफी या शब्दातच ज्ञान प्रक्रियेला आकाशातून जमिनीवर आणण्याचा प्रयत्नही अभिप्रेत आहे. प्लेटो ‘सिंपोझिअम’ मध्ये लिहितो, ‘No God philosophizes or desires to be wise; for he is.’
सॉक्रटिसला तर ईश्वरनिंदा आणि तरुणांना नीतिभ्रष्ट करण्याच्या आरोपाखाली हेमलॉक प्राशन करून देहदंडाची शिक्षा भोगावी लागली. त्याचा शिष्य प्लेटोनं होमरवर अर्थात मिथकशास्त्रांवर प्रखर टीका करून एकूणच मिथकशास्त्रीय आकलनाला ज्ञानाचा दर्जा नाकारला. प्लेटो लिखित ‘अपॉलजी’ या संवादात फिलॉसफी म्हणजे मनुष्याने स्वायत्तपणे निर्माण केलेलं आणि मनुष्याचं माणूसपण अधोरेखित करणारं ‘मानवीय शहाणपण’ होय.
हेदेखील तितकंच खरं की, मध्ययुगाच्या सुरुवातीलाच फिलॉसफी शब्दातील मानवतावादी अर्थछटा मिटवून, फिलॉसफीला कॅथोलिक चर्चची- अर्थात धर्मशास्त्राची- अंकित बनविण्यात येतं. त्यामुळे प्राचीन काळातील मिळवलेली स्वायत्तता फिलॉसफी गमावून बसते. नंतर तब्बल हजार वर्षांनी म्हणजे पंधराव्या शतकात रनेसाँच्या अर्थात पाश्चात्त्य आधुनिकतेच्या दीर्घ पहाटेत फिलॉसफीला आपला हरवलेला मानवतावादी चेहरा आणि स्वायत्तता परत मिळते.
(क) तत्त्वपरंपरेतील आदानप्रदानाच्या शक्यता :
कालौघात वैचारिक पंरपरांमध्ये स्थित्यंतरं, संवाद, विसंवाद होताना दिसून येतात. कुठलीही परंपरा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बंदिस्त, एकजिनसी, अपरिवर्तनीय आणि ‘शुद्ध’ नसते. ‘शुद्ध’ परंपरांच्या अस्तित्वाला इतिहासात आधार सापडत नाही- राजकीय, धार्मिक कथानकं आणि मिथकं मात्र जरूर सापडतात; जे तत्त्वज्ञानाच्या कुतूहलाचे आणि विश्लेषणाचे विषय आहेत. कुतूहल आणि विस्मय तत्त्वज्ञानाच्या प्रेरकशक्ती, तर कर्मठ आणि हटवादी पूर्वग्रह मारकशक्ती समजल्या जातात. कुठल्याही दोन वैचारिक परंपरांत फरक असतोच जो ‘इतरत्वा’चा निर्देशक समजला जातो. तसं पाहता कुठलीही परंपरा स्वत: एकजिनसी नसल्यानं तिच्याआतही इतरत्व दडलेलं असतं, जे राजकीय कथानकं सपाट करू पाहतात. किंवा स्वत:त दडलेल्या इतरत्वाच्या आधारे विषम समाजाची निर्मिती आणि दृढीकरण करताना दिसतात. म्हणून इतरत्व फक्त तटस्थ ज्ञानप्रक्रियेचा विषय नसून अर्थकारण आणि राजकारणासारख्या गतिशील सत्तासंबंधाचा आधारही असतं.
तत्त्वज्ञानासारख्या क्षेत्रातील अनुवादाच्या शक्यतांच्या संदर्भात फ्रेंच तत्त्वज्ञ बार्बरा कासांने ‘In Praise of Translation’ या पुस्तकात तीन भिन्न दृष्टिकोनांची चर्चा केली आहे. बार्बारा कासां लिहिते की पहिल्या दृष्टिकोनानुसार प्रत्येक परंपरा आणि भाषा एकामेवाद्वितीय असल्याने भाषिक शुद्धता आणि पावित्र्य भाषांतरित होऊच शकत नाही. हा दृष्टिकोन सत्ताशास्त्रीय देशीवादाचं द्याोतक समजला जातो. पुढे कासां नमूद करते की जर्मन फासीवादाची पाळंमुळंदेखील अशा बंदिस्त/ ताठर तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोनात आहेत. असाच ताठर, कर्मठ दृष्टिकोन मूलतत्त्ववादी धर्मांध, आत्मसंतुष्ट आणि वर्चस्ववादी मानसिकतेला खतपाणी घालत असतो. या दृष्टिकोनाच्या दुसऱ्या टोकाला साम्राज्यवादी ‘मेल्टिंग पॉट’ दृष्टिकोन आढळून येतो ज्यानुसार फक्त साम्राज्यवादी भाषा, संस्कृती, परंपरांकडे इतर संस्कृती, भाषा आणि लहानमोठ्या परंपरा सामावून घेण्याची म्हणजेच भस्म करण्याची ‘ईश्वरदत्त’ क्षमता आणि ‘नैतिक’ अधिकार असतो. या दृष्टिकोनानुसार पाश्चात्त्य ज्ञान-परंपरेला ऐतिहासिक भान, दिशा आणि गती असल्यानं जगाचं नेतृत्व करण्याचा आणि जगाला वाचवण्याचा नैतिक अधिकार पाश्चात्त्य परंपरेकडे (उदा.- आजच्या संदर्भात अमेरिकेकडे) आहे.
पण तिसरा दृष्टिकोन असा की, प्रत्येक भाषेत इतर कुठल्याही भाषेला सामावून घेण्याची अंगभूत क्षमता असते. त्यासाठी शब्दांच्या वाच्यार्थाला सर्वार्थ न मानता व्युत्पत्तीशास्त्र, कालौघात बदलत जाणारे विविध संदर्भ आणि अर्थछटांचा विचार करून त्यांचं सर्जनशीलपणे पुनर्वसन करता येतं. अशा प्रक्रियेत अनुवादकाला एकाच वेळी विचारवंत आणि सर्जनशील लेखक अशीही तिहेरी भूमिका पार पाडावी लागते. या दृष्टिकोनाचा अवलंब करून बार्बरा कासांच्या मार्गदर्शनाखाली ‘डिक्शनरी ऑफ अनट्रान्स्लेटेबल्स : अ फिलॉसॉफिकल लेक्सिकॉन’ सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला. खरंतर, या तिसऱ्या चौकटीशी युरोपचा संबंध रेनेसाँपासूनचाच.
‘रेनेसाँ’ या ऐतिहासिक प्रक्रियेचं श्रेय अशी तिहेरी भूमिका बजावणाऱ्या तत्कालीन विचारवंत-लेखक- अनुवादकांना जातं, ज्यांनी रेनेसाँच्या सुरुवातीच्या टप्प्यात (१५ वं शतक) आत्मविश्वास निर्माण केला की, कुठल्याही जिवंत भाषेत इतर कुठल्याही वैचारिक परंपरांना अभिव्यक्त करता येतं.प्राचीन हिब्रू आणि ग्रीक, रोमन परंपरांतल्या संहिता इटालियन, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन यांसारख्या जनसामान्यांच्या भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्या रेनेसाँच्या या आद्या मानवतावादी विचारवंत-लेखक-अनुवादकांमुळे पंधराव्या शतकात युरोपीय समाजातल्या ‘मध्ययुगा’चा शेवट होऊन आधुनिकतेच्या दीर्घ पहाटेची सुरुवात होते.
(चित्रअंश: डेथ ऑफ सॉक्रेटिस : जॅकलुई डेव्हिड, १७८७)