राज्य मंत्रिमंडळाच्या गठनानंतर महाराष्ट्रातील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून असलेल्या दिल्लीतील चाणक्यांच्या दरबारातील कूटनीतिकारांना एका प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळेना. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आमदार नितीन गडकरींना भेटून आल्यावर एकदम आनंदी कसे? गडकरी राज्यात कुणाला काही देऊ शकत नाहीत. तरीही ते एका झटक्यात या साऱ्यांची नाराजी कशी दूर करतात याचा छडा लावायलाच हवा. मग गडकरींच्या दु:खनिवारण केंद्राला भेट दिलेल्यांची यादी तपासण्यात आली. त्यातल्या कुणाला आमिष दाखवले तर तो तिथे काय घडले हे सांगू शकेल यावर विचार केल्यावर आमदार किसन कथोरेंवर खिळली. लगेच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले. आपल्या नाराजीची दखल घेतली, आता काहीतरी मिळणार असे वाटून तेही मोठ्या उत्साहात दाखल झाले. त्यांना विचारण्यात आले, गडकरींकडे काय घडले ते सविस्तर सांगा? फायदा होत असेल तर सांगायला काय हरकत असे मनाशी ठरवून ते उत्साहात सांगू लागले.

हेही वाचा : चतु:सूत्र: सांविधानिक प्रगल्भतेची ७५ वर्षे

‘मी व संजय केळकर त्यांची वेळ घेऊन गेलो. ती ठरवतानाच कारण विचारण्यात आले. वारंवार निवडून येऊनसुद्धा मंत्रीपद नाही असे आम्ही सांगितले. प्रत्यक्ष भेटायला गेलो तेव्हा अगदी खालच्या प्रवेशद्वारापासून स्वागतासाठी लोक उभे होते. खाली कार्यकर्त्यांनी हारतुरे घालून तर वर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी औक्षण करून स्वागत केले. त्यामुळे आम्ही मंत्रीच झालो की काय असा भास झाला. मुनगंटीवारांचेही याच पद्धतीने स्वागत झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले. नंतर मंत्र्यांसाठी राखीव खोलीत बसवण्यात आले. थोड्या प्रतीक्षेनंतर खुद्द गडकरीसाहेब आले व भरजरी शाल पांघरून त्यांनी आमचा सत्कार केला. आयुष्यात तुम्ही खूप प्रगती कराल, मोठे व्हाल, राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यात आहे, अशा शब्दात त्यांनी गौरव केला. आम्ही हरखून गेलो. मग खाण्याची चंगळ सुरू झाली. संत्र्याचे सूप, बर्फी, डीफ्रिजरमध्ये भिजवल्यानंतर तयार केलेले कांदापोहे असे बरेच काही होते. साहेब अगदी आग्रहाने खाऊ घालत होते. मध्येच दोनदा अन्यायाचा विषय काढला पण बोलू त्यावर नंतर असे म्हणत साहेब खाद्यापदार्थांवर बोलत राहिले. पोट भरल्यावर थोडे धाडस करून थेट विषयाला हात घातला. कधी जातीच्या निकषावर तर कधी हुजऱ्यांना संधी असे करून आम्हाला सातत्याने डावलले जात आहे. आता तुम्ही ज्येष्ठ या नात्याने न्याय मिळवून द्या अशी विनंती केली. ती ऐकल्यावर साहेबांनी दोन मिनिटे डोळे मिटले. नंतर म्हणाले, ‘हे बघा न्याय, अन्याय हे आपल्या मानण्यावर असते. अनेक जण म्हणतात माझ्यावरही अन्याय झाला, पण मी तसे मानत नाही. आयुष्यात कधी कुणाचे स्पर्धक होऊ नका. स्वत:चे काम असे आणि इतके उभे करा, की कुणीच तुम्हाला डावलणार नाही. मलाही कुठे कुठे डावलत असतात, संसदेत कुठेही बसा म्हणतात पण मी कधीच प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे समोरचेच अस्वस्थ होतात. कुणी नाराज आहे का विचारलेच तर खाण्याच्या गोष्टी काढायच्या. हेच राजकीय जीवनाचे सार. तेव्हा निघा आता. तुम्हाला शुभेच्छा! हे ऐकून आम्ही हसतमुखाने बाहेर पडलो.’ कथोरेंचे हे कथन ऐकून चाणक्यांचे कूटनीतिकार आणखी चक्रावले.

Story img Loader