विसर्जनानिमित्त झालेल्या दगदगीतून थोडा निवांतपणा मिळाल्यावर भूतलावरील कार्याचा आढावा घेण्यासाठी गणरायांची सभा भरली तेव्हा उत्तररात्र सुरू झाली होती. डीजेचा दणदणाट, विजेच्या दिव्यांची सजावट, नवनवे मोदक यावर अनेकांनी मते मांडून झाल्यावर गाडी भाविकांच्या मागण्यांकडे वळली तसे एक ज्येष्ठ बोलू लागले. ‘यंदा सामान्य श्रद्धाळू नेहमीप्रमाणेच गर्दी करत होते. त्यांच्या मागण्याही त्याच, नेहमीसारख्या. तथास्तू म्हणताना वावगे वाटले नाही. पण राजकारण्यांच्या मागण्या ऐकून जरा अवाक् व्हायला झाले. कदाचित निवडणुकीमुळे असेल पण नेत्यांची संख्या यावेळी भरपूर दिसली. नास्तिक म्हणवणारेही त्यात होते. त्यांना चरणी लीन होताना बघून गंमतच वाटली. सत्ता त्यांना हवी अन् आशीर्वाद मात्र आपण द्यायचे. हरकत नाही पण जनतेच्या भल्याचे काय?’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ऐकताच शेजारी बसलेले एक गणराय म्हणाले. ‘अरे ते मुख्यमंत्री, पायाला भिंगरी लागल्यागत सर्वांकडे अगदी जातीने येऊन गेले. मागणी एकच. राज्यातील बळीराजाला सुखी कर, त्याचे राज्य येऊ दे. मागच्या निवडणुकीपासून यांनी धसकाच घेतलेला दिसतो या राजाचा. सर्व जनतेला सुखी कर ही मागणी तशी योग्य पण फक्त शेतकऱ्यालाच सुखी कर असे ते कसे काय म्हणू शकतात असा प्रश्नच पडला मला.’ हे ऐकताच जमलेल्या सर्वांनी ‘आम्हालाही नेमके हेच वाटले’ असे म्हणत हसून दाद दिली. ‘बहुधा त्यांचा स्क्रीप्ट रायटर’ लोकसभेच्या पराभवातून बाहेर आला नसावा’ अशी टिप्पणी एकाने करताच सारेच जोरात हसू लागले.

हेही वाचा : संविधानभान : विधानमंडळाचे अधिकारी

सर्वांना थांबवत आणखी एक ज्येष्ठ म्हणाले. ‘दीर्घकाळापासून सत्ता यांच्याजवळ व मागणे आपल्याला. बळीराजाला सुखी करणे यांचे काम. कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंधने, वाढवलेले निर्यातशुल्क ही यांचीच ‘कृपा’. आणि अडचण आम्ही दूर करायची? या दुटप्पीपणाची किळस येणार नाही तर काय? तीच गोष्ट सोयाबीन व इतर पिकांची. ग्राहकांचे हित जोपासणार हे व बळीराजाची काळजी आम्ही घ्यायची? हे कसे शक्य आहे? आपल्याकडे आशीर्वाद मागितल्याचे बळीराजाला कळले म्हणजे त्यांचा सत्तेवरचा राग निघून जाईल असे यांना वाटते की काय? अरे, खरेच सुखी करायचे असेल शेतकऱ्यांना तर द्या ना हमीभावाची हमी. करा तसा कायदा. अडवले कुणी तुम्हाला? आम्हाला मध्ये आणून त्यांची पुन्हा फसवणूक कशाला करता? स्वत:च्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी आमचेच पाय दिसतात का यांना? होय, आहोत आम्ही बुद्धीचे दैवत. त्यामुळे तुम्हाला सद्बुद्धी मिळो असा वर देऊ बिनदिक्कत पण त्याचा वापर तर सद्हेतूने करा ना! त्यासाठी तुम्हाला कुणी रोखले?’ ज्येष्ठाचा हा उद्वेग ऐकून सभेतील सारेच क्षणकाळ स्तब्ध झाले.

हेही वाचा : उलटा चष्मा : अध्यक्ष नेमणे आहे

सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी आपला वापर होऊ द्यायचा नाही म्हणजे नाही, अशी भावना सर्वांनी व्यक्त केल्यावर सर्व गणरायांनी एकमताने ठरवले. ‘यापुढे अशी मागणी कुणी केली की लगेच त्याच्या स्वप्नात जाऊन वास्तवाची टोचणी द्यायची. जोवर त्याला चूक वा लबाडी उमगत नाही तोवर.’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma article on ganeshotsav 2024 and political leaders demands css