‘हर एक्सलन्सी, ख्वाजा मोईद्दीन चिश्ती विद्यापीठात होणाऱ्या आपल्या भाषणासाठी काही मुद्दे काढले आहेत. चिश्ती हे सुफी संत होते. त्यांनी गंगा-जमुनी तहजीबचा आयुष्यभर प्रचार व प्रसार केला. धार्मिक ऐक्यात त्यांचे योगदान मोठे आहे वगैरे वगैरे. तुम्ही एकदा नजरेखालून घातले तर मसुदा तयार करता येईल.’ एडीसीचे हे म्हणणे ऐकताच महामहिमांनी रागाने त्यांच्याकडे बघितले. देशात सत्ता येऊन दहा वर्षे झाली. तरी या सरकारी बाबूंचा दृष्टिकोन बदलायला तयार नाही. त्या मसुरीच्या अकादमीचा चेहरामोहराच बदलून टाकायला हवा असा विचार मनात आला, पण त्यांनी बोलणे टाळले. मग विषय बदलत त्या म्हणाल्या, ‘अहो, अशा ‘परकीय’ ठिकाणी भारतीय संस्कृती व प्राचीन विज्ञानाचे गुणगान करायला हवे. आमच्या परिवारात तशी पद्धतच आहे. गेली पाच वर्षे मी या लखनौच्या राजभवनात आहे. अजूनही तुम्हाला माझी विचारसरणी कळली नाही का? तुम्ही आता फार विचार करू नका. मीच सांगते तुम्हाला मुद्दे. त्यावरून भाषण तयार करा.’
हे ऐकताच एडीसी घाम पुसत हातात पेन व कागद घेऊन बसले. मग त्या बोलू लागल्या. ‘तुम्हाला भारद्वाज ठाऊक आहेत? नाही ना? मग ऐका या विज्ञानवादी ऋषीची कथा. त्यांनी सर्वांत आधी विमानाचा शोध लावला व ते मुंबईच्या चौपाटीवरून हवेत उडवले. कालच मी वेळ कसा घालवायचा या विवंचनेत असताना अचानक गुजराती भाषेतले ‘प्राचीन भारतीय विज्ञान’ नावाचे पुस्तक वाचले. त्यात हे नमूद आहे. या उदाहरणाने भाषणाची सुरुवात करू या’ हे ऐकताच आपण काटेरी खुर्चीवर बसलो आहोत की काय, असा प्रश्न एडीसींना पडला. याला पुरावा काय असा प्रश्न मनात आला, पण त्यांनी तो गिळला. तरीही धाडस करून ते म्हणाले, ‘पण ते राईट बंधू…’ त्यांनी मध्येच थांबवत त्या म्हणाल्या. ‘अहो ते नंतरचे. त्यांच्या आठ वर्षे आधी शिवाजी तळपदेंनी विमान उडवले. त्याआधी रामाने पुष्पक विमानातून प्रवास केला. त्यांच्या किती तरी आधी- सहा हजार वर्षांपूर्वीचे हे संशोधन आहे. आतापर्यंत आमच्या परिवारातले ‘ज्ञानी’ पुष्पकचाच उल्लेख करत. आपण हा उल्लेख करू, म्हणजे माझा अभ्यास दांडगा आहे हे सर्वांना कळेल.’
हेही वाचा : अन्वयार्थ : झारखंडी राजकारणास भाजपची ‘कलाटणी’
पुढे चांगली नेमणूक मिळवायची असेल तर हो ला हो करण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच एडीसींच्या मनावरचा ताण एकदम कमी झाला. मग हसत ते म्हणाले. ‘एक तासाच्या भाषणासाठी हा मुद्दा कमी पडतो, आणखी मुद्दे हवेत’. मग महामहीम उत्साहात म्हणाल्या, ‘अरे, तो कुंभकर्ण राहिला ना! मला खूप आवडतो तो. ग्रंथकारांनी ‘झोपाळू’ म्हणून त्याची उगाच बदनामी केली. त्याच्या इतका तंत्रस्नेही माणूस जगात सापडणार नाही. खरा विज्ञानवादी. तो झोपेतच संशोधनावर विचार करायचा. युद्धावर जाण्यासाठी त्याला नगारे वाजवून उठवले नसते तर त्याने रोबोटचाच शोध लावला असता. त्याची अनेक संशोधने मला तोंडपाठ आहेत. त्याचा उल्लेख भाषणात ठेवा’. आता हसावे की रडावे हेच एडीसीला कळेना. हे संशोधन नाही तर ग्रंथकारांचा कल्पनाविलास असे सांगण्याचे धाडस त्यांना झाले नाही. मग कसाबसा भावनेवर ताबा मिळवत ते म्हणाले. ‘ओके’. दुसऱ्याच क्षणाला त्यांना नव्या नेमणुकीची जाणीव होताच ते म्हणाले, ‘मॅडम तुम्ही राजकारणात येण्याऐवजी संशोधनाच्या क्षेत्रात गेला असतात तर मोठे यश मिळवले असते.’ हे वाक्य कानी पडताच महामहीम समोरचा ढोकळा हातात घेत खळखळून हसल्या.