वा! काय बोललात दादा तुम्ही. विचारजंतू वळवळणारे काही मोजके सोडले तर इतर तमामांनी तुमचे स्वागतच करायला हवे. पण करणार नाही कुणी. घाबरट आहेत लेकाचे. तुमच्या या वक्तव्यामुळे आता कुणीही तुम्हाला सालगडी समजण्याची हिंमत करणार नाही. मत देतात म्हणजे काय उपकार करतात का हे लोक. तुम्ही तिकडे बारामतीत बोललात व त्यापासून स्फूर्ती घेत बुलढाण्याचे आमदार कम प्राध्यापक संजय गायकवाड यांनीसुद्धा एक पाऊल पुढे जात नेमके याच आशयाचे वक्तव्य केले. ‘कोंबड्या, बकरे खाणारे, दोन हजार रुपये मतांसाठी घेणारे मतदार असूच कसे शकतात,’ असे म्हणत त्यांनी या साऱ्यांची तुलना देहविक्रयाशी करून टाकली. त्यामुळे दादा तुमच्या व या आधुनिक संजयच्या हिमतीला दाद द्यायलाच हवी. कुणाची किती किंमत करावी हे समजण्यासाठी ठायी असाधारण बुद्धिमत्ता असावी लागते. ती तुम्हा दोघांमध्येही ठासून भरली असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला दिसले. आता यापासून प्रेरणा घेऊन राज्यातील सर्व नेते मतदारांचे गोडवे गाणे बंद करतील, अशी आशा करायला हरकत नाही. ही मतदारद्वेषाची चळवळ पुढे न्यायची असेल तर तुम्ही दोघांनी काही पथ्ये नियमितपणे पाळायलाच हवीत.
यापुढे मतदारराजा असा शब्दप्रयोग अजिबात करायचा नाही. हे राजे नाहीत तर नोकर आहेत, हेच मनात बिंबवून ठेवायचे. प्रचार करताना मतदान करा अशी विनंतीसुद्धा करायची नाही. मी मालक आहे व तुम्ही सारे सालगडी, त्यामुळे तुम्हाला मला मत द्यावेच लागेल, असा दम जाहीर सभांमधून द्यायचा. कुणी काही प्रश्न विचारण्याची ‘जुर्रत’ केलीच, तर तुम्ही गावागावात तयार केलेल्या ‘वाल्मीकी’च्या माध्यमातून त्यांच्या तोंडात थेट बोळाच घालायचा. रस्त्यात कुणी अडवण्याचा प्रयत्न केला, तर वाहन थांबवायचे नाही. फक्त चिरडले जाणार नाहीत याची काळजी तेवढी घ्यायची. विकले गेलेल्या माणसांची किंमत शून्य असते, हे मतदारांना सतत जाणवून देत राहायचे. आणि हो, आता रोज पाच वाजता उठून कामाला लागायची मुळीच गरज नाही. आरामात उठायचे व तुम्ही ठरवलेला ‘विकास’ करायचा. तक्रारी, निवेदने घेण्यासाठी गर्दीत उभे राहायची गरज नाही. एखादी पेटी बंगल्यासमोर लावून टाकायची. तरीही कुणी सार्वजनिक स्थळी गाठलेच तर मतदानाच्या वेळी केलेल्या ‘व्यवहारा’ची आठवण करून द्यायची. तुमच्यासारख्या नेत्यांनी आजवर ‘ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा’ खेळ केल्यामुळेच हा मतदार सोकावला. लोकशाहीच्या रक्षणासाठी त्याला वठणीवर आणण्याची वेळ आता आली आहे, हे समजूनच त्याच्याशी शिवराळ भाषेत संवाद साधला तरी हरकत नाही. सलग पाच वर्षे मतदारांना असे ‘आडव्या हाताने’ घेण्याचा कार्यक्रम तन्मयतेने राबवल्यावर निवडणुकीच्या काळात त्यांचा ‘भाव’ वधारणार नाही, याची काळजी मात्र घ्यायची. दोनाचे चार हजार झाले तरी चालतील पण पाच वर्षे डोक्याला ताप नको असेच धोरण ठेवायचे. साऱ्या मतदारांना एकाच मापात तोलायचे. विवेकबुद्धीने मतदान करणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत जाईल व काही काळानंतर ती शून्यावर येईल. यातून जी व्यवस्था तयार होईल ती खऱ्या लोकशाहीचे प्रतीक असेल. त्यामुळे दादा तुम्हाला मुख्यमंत्री व त्या संजयरावांना मंत्री होणे एकदम सोपे होऊन जाईल. तेव्हा तुम्ही एवढे कराच. समस्त देशभरातील राजकीय नेते तुम्हाला मनापासून ‘दुवा’ देतील.