महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल सहा दशकांनंतर प्रशासनाच्या प्रमुख म्हणजेच मुख्य सचिवपदी महिला अधिकाऱ्याची वर्णी लागली. १९८७च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील सुजाता सौनिक यांना पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती होण्याचा मान मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांपासून विविध महत्त्वाच्या पदांवर राज्यात महिलांची नियुक्ती झाली आहे. मुख्य सचिवपदासाठी यापूर्वी ज्येष्ठता असूनही दोन महिला अधिकाऱ्यांना डावलण्यात आले होते. नव्याने नियुक्ती झालेल्या सुजाता सौनिक यांना ज्येष्ठता असूनही यापूर्वी दोनदा डावलण्यात आले होते. अखेर त्यांना संधी मिळाली. राजकारण असो वा प्रशासकीय सेवा, न्यायपालिका, कोणत्याही क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढणे हे महिलांसाठी मोठे आव्हान असते. सुजाता सौनिक या कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मंत्रालयात ज्या काही ठरावीक अधिकाऱ्यांचा धाक अजूनही शिल्लक आहे त्यात सुजाता सौनिक या एक आहेत. गेल्या ३७ वर्षांच्या सेवेत केंद्र व राज्य सरकार तसेच संयुक्त राष्ट्र संघात प्रतिनियुक्तीवर त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

मूळच्या हरियाणाच्या असलेल्या सुजाता सौनिक यांचे सारे खानदानच प्रशासकीय सेवेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहे किंवा होते. त्यांचे वडील सी. डी. चिमा हे १९६३च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते. त्यांनी पंजाबमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपदापासून विविध पदे भूषविली होती. सौनिक यांचे बंधू भारतीय पोलीस सेवेत वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या दोन आत्या या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या, त्यापैकी राज्याच्या सेेवेतून निवृत्त झालेल्या राणी जाधव या एक. पती मनोज सौनिक यांनी राज्याचे मुख्य सचिवपद भूषविले आहे. नाशिकच्या महापालिका आयुक्त, महिला आर्थिक विकास महामंडळ, आरोग्य, वित्तीय सुधारणा, कौशल्य विकास, सामान्य प्रशासन अशा विभागांचे सचिवपद भूषविल्यानंतर गेल्या वर्षी प्रशासनात दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद समजल्या जाणाऱ्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. केंद्र सरकारमध्ये महिला व बालविकास, नैसर्गिक आपत्ती विभाग, संयुक्त राष्ट्रांच्या वतीने यादवीग्रस्त कोसोवोमध्ये नागरी अधिकारी अशा विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या निभावल्या आहेत. मुख्य सचिवपदावर सौनिक यांना बरोबर एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. त्यात त्यांना करड्या शिस्तीची छाप पाडता येईल. मुख्य सचिवपदी पहिल्या महिलेच्या नियुक्तीबरोबच पती-पत्नीने मुख्य सचिवपद भूषविल्याची नोंदही राज्याच्या इतिहासात या नियुक्तीमुळे होणार आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma bombay high court sujata saunik politics judiciary amy
First published on: 02-07-2024 at 05:58 IST