नागपुरातील एका सप्ततारांकित हॉटेलातील वातानुकूलित खोलीत हिटर लावून बसलेले छगन भुजबळ अस्वस्थ होतेच. मला डावलता काय? थांबा, आता दाखवतोच साऱ्या नाराजांना एकत्र करून. आमचेसुद्धा एक शॅडो कॅबिनेट असेल. पक्षनेत्यांना व पर्यायाने सरकारला सुरुंग लावणारे, असे पुटपुटत त्यांनी गळ्यातला मफलर ठीक केला. तेवढ्यात सुधीर मुनगंटीवार आत आले तसा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मग एकेक करून सारेच नाराज त्या खोलीत जमत गेले. वळसे पाटील, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत. सर्वात शेवटी रवींद्र चव्हाण एवढ्या थंडीतही घाम पुसत खोलीत शिरले तसे सुधीरभाऊ आनंदले. सारे स्थिरावताच मुख्यमंत्री कोण असा प्रश्न जरा उतावळ्या स्वरात भुजबळांनी उपस्थित केला. सारे एकमेकांकडे बघू लागले. मग सुधीरभाऊ म्हणाले. ‘तिकडे भाजपकडे ते पद असल्याने इकडे मलाच मिळायला हवे. ओपन कॅटेगिरीतल्या व्यक्तीला ओपनचाच माणूस पुरून उरू शकतो.’ यावर नाराज होत भुजबळ म्हणाले, ‘राज्यात ओबीसींची संख्या जास्त. माझ्यामुळे हा घटक युतीशी जोडला गेला. त्यामुळे मला हे पद मिळाले तर सरकारला आणखी अडचणीत आणता येईल.’ अधीर झालेले तानाजी सावंत म्हणाले. ‘किमान आपण तरी यावर वाद घालण्यात अर्थ नाही. तुम्हा दोघांपैकी एकाने मुख्य तर दुसऱ्याने उपमुख्य व्हावे पण सरकारच्या वाटेत काटे पेरण्याचे काम लवकर सुरू करावे.’ मग मंत्रीपदावर चर्चा सुरू झाली. शिक्षण, सांस्कृतिक कार्य, बंदरे, मराठी भाषा केसरकरांना देण्याचे एकमताने ठरले. सोबत त्यांनी अतिशय विश्वसनीय पद्धतीने या ‘अशांत टापू’ची बाजू माध्यमात मांडण्याचा ठराव झाला. सत्तार कृषीसह महसूल व आणखी तीन खाती हवी म्हणून आग्रह धरू लागले. शेवटी अडीच वर्षांनंतर मंत्रीपद मिळाले तरी तिकडे जाणार नाही असे शपथपत्र लिहून देण्यास तयार झाल्यावर त्यांचा आग्रह मान्य झाला. स्वीय साहाय्यकासारखे वागणार नाही अशी हमी दिल्यावर वळसेंना गृहमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला. आरोग्य, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, उच्चशिक्षण मला द्या, साऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून कसा जेरीस आणतो ते बघाच असे तावातावात म्हणणाऱ्या सावंतांची मागणीही मान्य झाली. ओबीसी कल्याण व नागरी पुरवठा मीच सांभाळणार असे भुजबळांनी जाहीर करताच शिलकीचा अर्थसंकल्प मीच दिला असे सांगत सुधीरभाऊंनी वित्त माझ्याकडे असे सांगून टाकले.
बैठकीला हजर असूनही रवींद्र चव्हाण काही बोलत नाही हे लक्षात येताच भाऊ म्हणाले. ‘रवी, तू आमचा सर्वांचा हनुमान. तिकडेही तू याच भूमिकेत होतास पण तिकडे बरेच हनुमान होते. त्यामुळे तुझा पत्ता कट झाला. इकडे तू एकटाच असशील याची हमी देतो. तुला ते प्रदेशाध्यक्ष नाही करत. तू इकडे सार्वजनिक उपक्रम सांभाळ.’ हे ऐकून चव्हाण पहिल्यांदा हसले. तर ठरले. आजपासून एकेकाला घेरायचे असा सूर सर्वांनी एकत्रितपणे आळवताच प्रत्येकाचा फोन वाजू लागला. पलीकडची वाक्ये ऐकून एकेकाचा चेहरा पडू लागला. अस्वस्थ होत भुजबळांनी विचारले ‘काय झाले.’ सर्वात आधी सत्तार उठले व बाहेर जात म्हणाले ‘ईडीचे लोक घरी आलेत.’ त्यांचे ऐकून इतर सर्व ‘आमच्याकडेही तेच’ म्हणत क्षणार्धात गायब झाले. मग एकट्याच उरलेल्या भुजबळांनी नोंदी केलेला शॅडो कॅबिनेटचा कागद टराटरा फाडून टाकला.