‘‘घ्या आता, भोगा तुमच्या कर्माची फळं. बसावे लागले ना पिंजऱ्यात. तेही लोकशाहीच्या पवित्र मंदिराच्या आवारात. तेवढ्याने तरी बरे! त्या सत्ताधाऱ्यांना तुमची दया आली व पिंजरा वातानुकूलित ठेवला. बाइट न मिळाल्याने घशाला कोरड पडू नये म्हणून पिण्याचे पाणीही ठेवले. किमान यासाठी तरी आभार माना त्यांचे. ते मानताना ‘वाह, क्या व्यवस्था है. धन्यवाद सरकारजी’ असे जरूर म्हणा. तशीही तुम्हाला गेल्या दहा वर्षांत ‘जी’ म्हणण्याची व सारे काही चांगले दिसण्याची सवय लागली आहेच. प्रश्न राहिला बाइटचा. त्याचीही व्यवस्था करेलच तुमचे ‘आवडी’चे सरकार. ‘कुठे आहे हुकूमशाही?’ असा प्रश्न तुम्हीच विचारत होतात ना, सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिळवत? आता घ्या लक्षात. ही आहे हुकूमशाही. तरीही तुम्हाला ती गोड वाटत असेल तर आमचे काही म्हणणे नाही.
हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असा सूर तर आता अजिबात आळवायचा नाही. जेव्हा आम्ही हे म्हणत होतो तेव्हा तुम्ही ‘कुठे दाबलाय आवाज’ असे उच्च रवात विचारत होतात. आता थंडगार हवेत तुमचा आवाज बसणार नाही तर आणखी खुलेल याची खात्री बाळगा. बाइटची सवय स्वस्थ बसू देत नसेल तर घ्या एकमेकांचे बाइट. तेवढीच करमणूक! आम्ही काय करणार? आमचे ‘आका’ तिकडे शरण गेले असा तर्क तर अजिबात नको. तुमचा कणा ताठ नव्हता असे स्पष्ट सांगा की! ‘हांजी हांजी’ची सवय लागली की होते असे. सभागृहात माइक बंद करता येतो. कॅमेरा वळवता येतो. बाहेर कशी तोंडे बंद करायची असा प्रश्न पडल्यानेच तुम्हाला बंद करून टाकले. आता तुमची पोपटपंची बंद. जरा वाचा जुनी पुस्तके. हुकूमशाहीचा संबंध पिंजऱ्याशी कसा हे कळेल तुम्हाला. त्यांनी तुम्हाला पाट फेकून मारला. तुम्हाला असे वाटत असेल की बसायला दिला तर काही हरकत नाही. आधी यंत्रणांचा पोपट केला आता तुमचा. आता काही दिवस ठेवतील इथे. मग सीबीआय व ईडीच्या मध्ये एक जागा रिकामी आहे. तिथे तुमच्या कंटेनरची रवानगी निश्चित. ही पिंजरा करायची कल्पना कुणाची याची चौकशीही करू नका. नाही तर पाय आणखी खोलात जाईल. ज्याने पिंजरा केला तो सर्वशक्तिमान आहे. त्याला आव्हान देण्याची भाषा कराल तर पिंजरा हाच राहील, फक्त त्याची जागा बदलेल. कदाचित तिहारमधली असेल. हे माध्यमांचे अवमूल्यन, कोंडी, गळचेपी असे अजिबात म्हणायचे नाही. असले शब्द शोभून दिसत नाहीत तुमच्या तोंडी. तो अधिकार तुम्ही केव्हाच गमावला. फार फार तर ‘हम बेचारे’ म्हणा, त्यावरही आक्षेप आला तर ‘नॉन बेचारे’ योग्य. आमचे काय आम्ही बघून घेऊ. करू तयार नवे दांडूबहाद्दर. तेव्हा बसा आता निवांत स्वत:च्या कॅमेऱ्यात स्वत:चे चेहरे न्याहाळत.’’ दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सर्व जण आवारातल्या पिंजऱ्यात शिरल्यावर रात्री पडलेल्या स्वप्नाविषयी एकमेकांना सांगू लागले. आश्चर्य म्हणजे साऱ्यांना एकाच आशयाचे स्वप्न पडले होते व कुणी ‘राहुल’ नावाचा इसम त्यात बौद्धिक घेत होता. काही कामच नसल्याने सर्वांनी अख्खा दिवस त्यावर चर्चा करण्यात घालवला.