जवळजवळ अर्धा तास ट्रेडमिलवर चालून झाल्यावर चंद्रकांतदादांनी डंबेल हाती घेतले. यानंतर चेस्टप्रेस व लेगप्रेस करूनच थांबायचे असे त्यांनी ठरवले होते. आता काहीही करून तरुण व्हायचेच. शरीराने व मनानेसुद्धा! तेव्हाच आपल्यातली ज्येष्ठत्वाची भावना निघेल, ती हद्दपार झाली की ज्येष्ठ असूनही गृहमंत्रीपद का नाही अशी वाक्ये तोंडातून बाहेर पडायची थांबतील असा विचार करताना त्यांना गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी आठवल्या. सांगली ही वसंतदादांची कर्मभूमी. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनाही लोक दादा म्हणायचे. आता तुम्हीच आमचे नवे दादा. मग मुख्यमंत्री नाही तर किमान गृहमंत्री तरी व्हायला काय हरकत आहे? तुम्हीही त्या दादांप्रमाणे आता ज्येष्ठच झालात की, असे अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्यामुळे आपण ते वक्तव्य केले. पण झाले उलटेच. नेहमी ‘अलर्ट मोड’वर राहणारे देवाभाऊ जाम चिडले. अलीकडे तुम्ही फारच ज्येष्ठ ज्येष्ठ करायला लागलात, त्या नाथाभाऊसारखे. चाणक्यांचा आशीर्वाद आहे या भ्रमात फार काळ राहू नका असा धमकीवजा निरोपच पाठवला. काहीही झाले तरी या भाऊंना नाराज करून पुढे जाता येणे शक्य नाही. नाही तर आपलाही सुधीरभाऊ व्हायचा.

मग ठरवले की आता काहीही वावगे बोलायचे नाही म्हणजे नाही. कुणी कितीही फूस दिली तरी जिभेवर नियंत्रण ठेवायचे. लोक दादा म्हणतात म्हणून वसंतदादा होण्याची स्वप्ने बघायची नाहीत. तेव्हा त्यांच्या पाठीत शरदरावांनी खंजीर खुपसला. आता तर चाकू, सुऱ्यांचा जमाना आलाय. त्यामुळे सावध राहायचे, पण मनात रुजलेल्या ज्येष्ठतेच्या भावनेचे काय? यावर खूप विचार केल्यावर ठरवले की आता पुन्हा तरुण व्हायचे. म्हणून मग तातडीने जीम सुरू केले. आता वजन कमी करायचे. एकदम सडपातळ व्हायचे. मुख्य म्हणजे पोट आत ढकलायचे. नेहमीचे कपडे त्यागून मस्तपैकी ‘स्लिमफिट’ शर्ट व जीन्स वापरायचे. कधी कधी गुडघ्यात फाटलेली फॅशनेबल जीन्ससुद्धा घालायची. वय झाले तरी सुदैवाने डोक्यावरचे केस बऱ्यापैकी उपस्थिती दर्शवून आहेत. ते आणखी वाढावेत म्हणून केशरोपण करून घ्यायचे. वाढलेल्या केसांना आता अजिबात तेल चोपडायचे नाही. भलेही परिवारातल्या लोकांनी नाक मुरडले तरी चालेल. केस कोरडे राहिले तरच आणखी जास्त खुलून दिसतील पण तरुण दिसण्यासाठी हे आवश्यकच. चष्मा घालवायला लासिक लेझर किंवा लेन्सचा पर्याय डॉक्टरांनी सुचवला आहेच. तो गेला की भारी भारी गॉगल वापरायला आपण मोकळे. खाण्यापिण्याची पथ्ये पाळतोच. ती आणखी कठोरपणे पाळायची. मंत्रीपदाचा व्याप सांभाळून हा ‘मेकओव्हर’ सहा महिन्यांत झाला पाहिजे असा निर्धार करत दादा जीममधून निघाले.

मग तरुण होण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या दादांनी कोणतीही कसर सोडली नाही. संपूर्ण राज्यात त्यांच्या या प्रयोगाची चर्चा सुरू झाली. काही लोक त्यांना दादाऐवजी भाऊ म्हणू लागले. पूर्णपणे बदललेले दादा एक दिवस सांगलीतल्याच ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाला गेले. तिथे बोलता बोलता त्यांच्या तोंडून सहज निघून गेले. ‘ज्येष्ठांना महत्त्वाची पदे दिली जात नाहीत.’ यामुळे पक्षात पुन्हा खळबळ उडाली. इतके प्रयत्न करूनही ही ज्येष्ठत्वाची भावना व खंतावण्याचा विचार मनातून जात कसा नाही या प्रश्नाने दादा पुन्हा हैराण झाले.