‘हे बघा, मी पद सोडले. तुम्हाला मुख्यमंत्री केले. आदर म्हणून तुम्ही माझी खुर्ची रिकामी ठेवली याचा आनंदच. उच्च स्तरावर झालेल्या तडजोडीनुसार आता माझा मुक्काम हरियाणात. त्यामुळे मी तुम्हाला निर्देश देणार नाही. खुर्ची रिकामी ठेवल्याची परतफेड म्हणून मी माझा मफलर तुम्हाला देत आहे. तो गळ्यात घाला अथवा खुर्चीवर ठेवा. तोच तुम्हाला निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देत राहील’ असे म्हणत केजरीवालांनी ‘जड अंत:करणाने’ मफलर आतिषीजींना सुपूर्द केला तेव्हा दोघांचेही डोळे पाणावले. आतिषींनी मफलरवर माथा टेकवला तेव्हा कुबट वास त्यांच्या नाकात शिरला. पण दीर्घकाळ तुरुंगात राहिल्यामुळे हा वास असेल असे म्हणत त्यांनी तो विचार त्यागला. मग दैनंदिन कामकाज सुरू केल्यावर त्यांना मफलरचा वास येणे बंद झालेच, उलट त्याच्या माहात्म्याची प्रचीती येऊ लागली. कधी तो त्यांच्या गळ्यात अडकवलेला असायचा तर कधी त्या रिकाम्या खुर्चीवर ठेवलेला. एकदा त्या कार्यालयात आल्यावर दोन्ही खुर्च्यांच्या मागे असलेल्या भगतसिंग यांच्या तसबिरीला नमस्कार करायचे विसरल्या. तसा तो खुर्चीवर ठेवलेला मफलर सापासारखी चुळबूळ करीत असल्याचा भास त्यांना झाला. मग लगेच त्यांनी चूक सुधारली.

एकदा तर गंमतच झाली. नायब राज्यपालांना पाठवायच्या पत्राचा मसुदा त्यांच्यासमोर आला. त्यावर त्या सही करणार तेवढ्यात मानेला गुंडाळलेल्या मफलरमधून त्यांना गुदगुल्या केल्या जात असल्याचे जाणवले. असे का होते ते आतिषींना कळेच ना! मग त्यांच्या लक्षात आले की हे पत्र आणखी खरमरीत भाषेत हवे असे मफलर सुचवतोय. लगेच त्यांनी मसुदा बदलला. मोफत वीज व मोहल्ला क्लिनिक या दोन योजनांना मुदतवाढ देण्याची फाइल त्यांच्यासमोर आली तेव्हा मफलरमधून अचानक सुगंध येऊ लागला. इतका की आतिषींना तो सोसवेना. शेवटी ‘कळले सर मला’ असे मनाशी पुटपुटत आतिषींनी त्या दोन्ही फाइलींवर लफ्फेदार स्वाक्षरी केली तेव्हाच तो दरवळ थांबला. असेच एकदा दिल्लीतील दारू दुकानांच्या परवान्यांच्या वार्षिक नूतनीकरणाची फाइल त्यांच्यासमोर आली. भीतीमुळे बराच काळ त्यांनी तिला हातही लावला नाही. वारंवार विचारणा होऊ लागल्यावर त्यांनी ती हातात घेताक्षणी मफलर गळा आवळतोय असे त्यांना वाटले. त्यांनी पटकन तो काढून रिकाम्या खुर्चीत ठेवला. यातून काय बोध घ्यायचा हे कळताच त्यांनी ती फाइल तशीच परत पाठवण्याचे निर्देश दिले. एकदा त्या बदली प्राधिकरणाच्या बैठकीत बसल्या असताना मफलरमध्ये असलेली लोकर त्यांच्या मानेला अचानक टोचू लागली. लगेच त्यांना संकेत कळला व सर्व बदल्यांना विरोध दर्शवणारा शेरा लिहून त्या बैठकीतून बाहेर पडल्या. मग कोणतेही निर्णय घेताना अनेकदा खुर्चीत ठेवलेल्या त्या मफलरकडे बघण्याची सवयच आतिषींना जडून गेली. त्याच्या जादूने त्या नेहमी भारावलेल्या असायच्या. एकदा आतिषींचे आई-वडील कार्यालयात आले. तेव्हाही त्या खुर्चीतल्या मफलरकडेच बघत असल्याचे त्यांना दिसले. बाहेर पडल्यावर त्या दोघांच्याही मनात विचार आला. ‘बरे झाले हिने मार्क्स व लेनिनवरून ठेवलेले ‘मार्लेना’ हे नाव त्यागले.’