‘प्रिय चिन्मय, तुझ्या ‘राज’घराण्याच्या वारसाची काहींनी चालवलेली बदनामी निषेधार्ह आहेच, यात वाद नाही. पण त्याचा निषेध म्हणून तू महाराजांची भूमिका नाकारणे हे पळून जाण्यासारखेच. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या राजांनी प्रत्येक संकटाला धीराने तोंड दिले, पण विरोधकांना कधी पाठ दाखवली नाही. मग तू कशाला पाठ दाखवतोस? सहा चित्रपटांतून महाराजांची भूमिका साकारलीस. त्यामुळे रयतेच्या मनात राजांचे आधुनिक रूप म्हणून तुझी प्रतिमा रुजली आहे. राजांच्या विचारांचा प्रसार करण्याचे महत्कार्य तू करत असल्यामुळे सारी प्रजा आनंदात होती. असे असताना तुझे माघार घेणे कुणालाही पटणारे नाही. काही मूठभर ट्रोलकरांना घाबरून अशी भूमिका घेणे महाराजांच्या विचारांशी प्रतारणा करण्यासारखेच. त्यामुळे आम्हास अशी शंका येऊ लागली आहे की तू हा सगळा प्रकार प्रसिद्धीचा स्टंट म्हणून करत असावास. तसे असेल तर तू चुकीचा मार्ग निवडला आहेस हे मान्य कर. तू कलाकार आहेस. त्यामुळे तुला अशा स्टंटची गरज भासते कधी कधी पण त्यात महाराजांना ओढण्याचे कारण काय?
महाराजांची भूमिका केल्यामुळे तू ट्रोल होत नाहीस तर वारसदाराच्या नावामुळे होत आहेस, हे कळत नाही का? महाराजांच्या कुळातसुद्धा शहाजी व शरीफजी होतेच की. त्यावरून त्यांना कधी बोल लावण्याची हिंमत विरोधकांनी दाखवली नाही इतका त्यांचा दरारा होता. तुझ्याबाबतीत घडलेला हा ट्रोलिंगचा प्रकार पहिला नाही. याआधीही राळ उठवली गेली. त्यानंतर खबरदारीम्हणून तू ‘काश्मीर फाईल्स’मध्ये जीव ओतून काम केलेस. मग उजव्या वर्तुळातून अनेक प्रचारपटांसाठी विचारणा सुरू झाली पण तू प्रस्ताव नाकारलेस. हा बाणेदारपणा त्यांना आवडला नसावा. त्यामुळे त्यांनी ही मोहीम हाती घेतली असेल तर बाणेदारपणा कायम राखत लढ की! पलायनवादी भूमिका का स्वीकारतोस?
आज महाराज असते तर त्यांनी गनिमी काव्याने या ‘सोशल’ शत्रूंचा नि:पात केला असता. एकेकाचे हातपाय कलम करून ‘चौरंग’ बनवले असते. मोठ्या पडद्यावर तू दाखवलेला हा आवेश प्रत्यक्ष जगण्यात दाखवण्याची संधी आली असताना तू तलवार का म्यान करतोस? महाराजांनी स्वराज्य कसे स्थापन करावे याचा वस्तुपाठ घालून दिला. त्याच महाराजांच्या सहा भूमिका करूनही तुझ्यात निराशावाद झळकत असेल तर घेतलेली प्रेरणा गेली कुठे? भूमिका करण्याआधी तू महाराजांचे चरित्र अनेकवार वाचले असशील. त्यातून स्फूर्ती घेण्याचे सोडून हे ‘आम्ही नाही जा…’ पद्धतीचे वागणे तुला शोभणारे नाही. त्यामुळे तू तातडीने या भूमिकेवर पुनर्विचार कर. अन्यथा उरलेल्या तीन चित्रपटांसाठी नाइलाजाने नवा चेहरा शोधावा लागेल.’ शेवटचे वाक्य पूर्ण होताच मंडलेकरांना जाग आली. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एकाने स्वप्नात दिलेला हा दृष्टांत त्यांना जसाच्या तसा आठवत होता. मग त्यांनी हातात भ्रमणध्वनी घेत नवी भूमिका मांडण्यासाठी मनात शब्दांची जुळवाजुळव सुरू केली…