प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, भाऊंचे अर्धवट राहिलेले ‘विकासाचे’ स्वप्न साकार करण्यासाठी मी या वेळी रिंगणात आहे हे तुम्ही जाणताच. त्या स्वप्नपूर्तीसाठी मी अहोरात्र परिश्रम घेत असतानाच काहींनी ‘हातउसने’ प्रकारावरून नाहक बदनामी चालवल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यावर स्पष्टीकरण देणे, मी माझे कर्तव्य समजते. मी लोकप्रतिनिधी असले तरी सर्वात आधी मी एक स्त्री आहे. घरातली एखादी वस्तू संपली की ती शेजारच्या घरून आणणे, मग कांदा असो, साखर असो वा सिलेंडर हा माझा गुणधर्मच आहे. तो लक्षात घेऊन माझ्या मतदारसंघातील अनेक व्यापारी, कंत्राटदार, मोठय़ा कंपनीचालकांनी मला स्वत:हून पैसे देऊ केले. अगदी शपथेवर सांगते की मी त्यांच्यापैकी कुणाकडेही काही मागायला गेले नव्हते.
समाजउत्थानाचा विडा उचललेल्या नेतृत्वाला कशाचीही कमतरता भासू नये म्हणून त्यांनी या पद्धतीने मदत केली. मी शपथपत्रात उल्लेख केलेले हे सत्तरेक मान्यवर देणगीच घ्या म्हणत होते पण ते योग्य न वाटल्याने पै-पै परत करण्याच्या बोलीवर मी या रकमा घेतल्या. त्याची यथायोग्य नोंद मी जाहीर केल्याने ते सर्व पैसे मला कधी ना कधी परत द्यावेच लागणार आहेत. तरीही काही विरोधक ‘खंडणी गोळा करण्याचा नवा प्रकार’ असा आरोप करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक जीवनात असल्यामुळे काहीही लपवून ठेवण्याचा माझा स्वभाव राहिलेला नाही. त्यामुळे अत्यंत प्रांजळपणे मी या ‘हातउसन्याची’ कबुली लेखी स्वरूपात दिली. त्यावरून विरोधकांनी राईचा पर्वत करू नये, असे नम्र आवाहन मी या पत्रकाद्वारे करते.
जगात कुठेही जा, प्रत्येकाला हातउसने घेण्याची गरज पडतेच. ते लक्षात न घेता अनावश्यक मुद्दा चव्हाटय़ावर आणणे हा प्रचार भरकटवण्याचा एक भाग आहे. हा मुद्दा चर्चेत आल्यापासून मला हातउसने देणारे अस्वस्थ आहेत. काही स्वकीय घरी येऊन ढसाढसा रडले. कर्तव्यतत्पर लोकप्रतिनिधीला स्वमर्जीने उधार देणे हा गुन्हा आहे का असा अंतर्मुख करणारा सवाल काहींनी केला, तेव्हा माझ्या डोळय़ांत टचकन पाणी आले. भविष्यात तपास यंत्रणांनी आक्षेप घेतलाच तर ताई तुमच्या सामाजिक कार्याला मदत व्हावी म्हणून एवढय़ाच कोटींचा (म्हणजे ३९) सन्माननिधी उभारू पण तुमच्या ‘कार्यात’ खंड पडू देणार नाही असेही साऱ्यांनी एकासुरात सांगितले. काहींनी माझ्या ‘व्यवसायात’ अधिकृतपणे भागीदार होण्याची तयारी दर्शवली. मी मात्र सर्वाना नम्रपणे नकार दिला.
मतदारसंघ कोणताही असो, त्याच्या विकासात व्यापारी, उद्योजक, कंत्राटदार यांचे योगदान मोठे असतेच. त्यांच्या उदारतेकडे टक्केवारीसारख्या संकुचित दृष्टिकोनातून बघणे योग्य नाही. त्यांनी केवळ धाकापोटी उसनवारीचा वर्षांव केला या आरोपातसुद्धा तथ्य नाही. संपत्ती विवरणात हातउसने हा प्रकार अधिकृत असतो. मी काहीही गैर केले नाही. माझ्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडणार नाही, उलट या चर्चेतून ती वाढेलच हे विघ्नसंतोषी विरोधकांनी लक्षात ठेवावे. मी उसनवारी करून जनतेची सेवा करते या मुद्दय़ावर लोक मला निवडून देतील, असा विश्वास व्यक्त करून मी थांबते.