अहो, कीटक आणि माणसांची तुलना करताच कशी? दोघेही सजीव प्राणी हा एक समान धागा सोडला तर संबंधच काय यांचा? आढळले असतील दिल्लीत चतुर नावाने ओळखले जाणारे कीटक जास्त, म्हणून काय त्यांचा संबंध थेट चतुर माणसांची संख्या दिल्लीत अलीकडे वाढली त्याच्याशी जोडायचा? हे मान्य की देशाच्या राजधानीत तडजोडीचे तिसरे पर्व सुरू झाल्यापासून चतुर स्वभावाच्या लोकांचे प्रस्थ वाढले. पहिल्या दोन पर्वांत केवळ दोघेच चतुर व बाकीचे भोळे असेच चित्र दिसायचे. ते आता थोडे बदलले हेही कबूल पण याचा कीटकवाढीशी कसा संबंध जोडता येईल? यंदा पाऊस लांबला म्हणून दिल्लीत हे कीटक दोनशे पटीने वाढले असे सर्वेक्षण सांगते. तिकडे चतुरांच्या भूमिकेत वावरणाऱ्या चंद्राबाबू व नितीश कुमारांवरही यावेळी पैशाचा पाऊस पडला असा राजकीय अर्थ काढणे म्हणजे बादरायण संबंध जोडण्यासारखेच. दिल्लीत पाऊस चांगला महिनाभर लांबला व हा पैशांचा पाऊस तर केवळ दोन तासांत, तोही लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात, बदाबदा कोसळला. दोन्हीच्या कालावधीत समानता नाही, त्याचे अर्थही वेगवेगळे तरीही अशी माणसे वाढली म्हणून कीटक वाढले असा तर्क काढणे चूकच.

गेल्या दहा वर्षांत दिल्लीत अनेकदा पाऊस लांबला पण तेव्हा स्थिर सरकार असल्याने चतुरांचे फावत नव्हते म्हणून कीटकही वाढले नाहीत हा युक्तिवाद तर साफ खोटा व बहुमताचा अपमान करणारा. तेव्हाही चतुर होतेच पण ते साळसूदपणाचा आव आणून थेट सत्तेच्या कळपात सामील होत. आताचे चतुर कळपात राहूनसुद्धा बाहेर असल्याचे भासवत राजकीय चतुराई दाखवतात. त्याचे कीटकांशी नाते जोडणे योग्य ठरूच शकत नाही. आधी या चतुरांच्या विविध प्रजाती आढळत. आता एकच प्रजात जास्त दिसून आली. याचा अर्थ एकाच कलाने वागणाऱ्या चतुरांची संख्या वाढली व दिल्लीत गेल्या दहा वर्षांपासून चतुरांचा कल एकाच पक्षाकडे आहे असा निष्कर्ष काढणेसुद्धा घाईचे. जरा थांबा, पुढचा पावसाळा येऊ द्या. या कीटकांच्या इतर प्रजातीसुद्धा वाढतील व दिल्लीतील चतुर माणसे इतर दरवाजेसुद्धा ठोठवू लागतील. एका सर्वेक्षणावरून थेट निष्कर्षावर येणे सध्यातरी चूकच.

हे कीटक मोजले जात नव्हते तेव्हाही दिल्लीत चतुर माणसे भरपूर होतीच की. गाय पाळणे, वासराचे लाड करणे, गजाआडून बाहेर आल्यावर भ्रष्टाचारी नसल्याचा साक्षात्कार होत पद सोडणे ही अलीकडची चतुराईची उत्तम उदाहरणे डोळ्यासमोर आणा की जरा. आता यांनी कीटकांपासून किंवा कीटकांनी यांच्यापासून प्रेरणा घेतली, असे कसे म्हणता येईल? हे कीटक ‘पेस्ट कंट्रोल’चे काम करतात म्हणे! म्हणजे उधळी, कसरवर जालीम उपाय योजतात. दिल्लीतील राजकीय चतुरसुद्धा यात माहीर असतात की! लहान चतुरांना तुडवत राजकीय स्थान पटकावण्यात त्यांचाही हात कुणी धरू शकत नाही. अशी काही साम्ये असतात सजीवांमध्ये. म्हणून काय थेट तुलनाच करायची? हे योग्य नाही. त्यामुळे सध्याच्या कुबडीधारी सरकारमुळे निर्माण झालेल्या किंचित अस्थिरतेचा संबंध या कीटकवाढीशी व चतुर माणसांची संख्या वाढण्याशी जोडू नये ही नम्र विनंती!