‘वा, रामदासभाई. अगदी योग्य वेळी स्पष्ट बोलून तुम्ही कोंडी फोडलीच शेवटी’ असे अभिनंदनाचे दूरध्वनी घेत आठवले संसदेतून बंगल्यावर परतले तेव्हा जाम खुशीत होते. फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे स्पष्टपणे सांगितल्याने शिंदे चिडले असतील पण चिडू देत त्यांना. शेवटी आपल्यासाठी दिल्लीतले चाणक्य महत्त्वाचे. पहिल्यांदा त्यांनी आपल्यावर अशी महत्त्वाची कामगिरी सोपवली व आपण ती उत्तमपणे पार पाडली. खूप काळानंतर का होईना पण गांभीर्याने घ्यायला लागले आपल्याला, असे मनाशी म्हणत ते खुर्चीत बसले. चहा घेऊन आलेल्या नोकराची दृष्टीसुद्धा बदललेली, हे लक्षात येताच ते सुखावले. मग नेहमीप्रमाणे डोळे मिटून ते विचार करू लागले. मित्रपक्षाच्या नेत्यांच्या बुद्धीचा वापर करून घेण्यात भाजपएवढे कुणीही माहीर नाही. आपले वक्तव्य वाहिन्यांवरून प्रसारित होताच तिकडे राज्यात बरीच खळबळ उडाली. शिंदेच हवेत असा हट्ट धरणाऱ्या सेनानेत्यांच्या बोलण्यातला जोश गायब झाला. भाजपच्या झाडून साऱ्या नेत्यांनी आनंदित होत फोन केले. आता आपली वाटचाल आणखी सुकर होणार हे निश्चित.
आठवले केवळ कवितेपुरते असे म्हणत आपल्याला हसण्यावारी नेण्याचे प्रसंगसुद्धा कमी होतील आता. एक बरे झाले. ती वक्तव्याची जबाबदारी पार पाडताना आपण कविता केली नाही. शिंदेंच्या बाबतीत स्पष्ट बोलणे ही भाजपची अडचण होती. अशा कठीण प्रसंगी आपली मदत घेतली गेली. आता याचा मोबदला म्हणून काहीतरी पदरात पाडून घ्यायला हवे. राज्यातील एखाद्या कार्यकर्त्याची मंत्रिमंडळात वर्णी लावून घ्यायची की स्वत:साठी कॅबिनेट दर्जा मागून घ्यायचा. हा विचार मनात येताच ते थबकले. डोळे उघडून त्यांनी समोरचा थंडगार चहा एका घोटात संपवला. मग पुन्हा थोडी तरतरी जाणवू लागल्यावर ते विचाराच्या डोहात डुंबू लागले. नको, कार्यकर्त्याला संधी नकोच. पद मिळाले की फितूर होतात सगळे. त्यापेक्षा कॅबिनेटचा दर्जाच भला. मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजेरी लावण्याची संधी मिळेल, शिवाय क्रमांक एक व दोनशी आणखी सलगी साधता येईल.
राज्यातील निवडणुकीच्या जागावाटपावरून आपण जास्त ताणून धरले नाही ते बरेच झाले. त्यातून नाहक कटुता निर्माण होते. तसे झाले असते तर ही कोंडी फोडण्याची जबाबदारी चाणक्याने दिलीच नसती आपल्याला. सब्र का फल मिठा होता है हेच खरे! पक्षातले लोक नाराज झाले पण त्यांना काय, कधीही समजवता येईल. शेवटी क्रमांक दोनचा विश्वास व सत्तेतील पद हेच भविष्यासाठी महत्त्वाचे. पक्ष काय, तो नंतरही वाढवता येईल. तसेही कुणाचीही सत्ता आली तरी आपल्याशिवाय पर्याय नसतोच मोठ्या पक्षांना. तेवढ्यात जेवण तयार असल्याची वर्दी नोकराने दिली. त्यासाठी ते जसे उठले तशी त्यांना कविता सुचली.
काँग्रेस मे नही रही ग्रेस
चुनके आयी महायुती</p>
सब हुए परास्त धराशाई चाहे टेरीकाट हो या सुती.