सकाळी सकाळी सौभाग्यवतीने बनवलेल्या घावण व सुकटवर यथेच्छ ताव मारून आमदार महोदय दिवाणखान्यात दाखल झाले तेव्हा चारपाच शिष्टमंडळे त्यांची वाटच बघत होती. ते स्थानापन्न होताच त्यातले पहिले बोलू लागले ‘साहेब, आमच्या ग्रामपंचायतीवरचा शेकापचा झेंडा आम्ही काल उतरवला. अविश्वासातून सरपंचाला पायउतार केला. तुमच्याप्रमाणे आम्हीही ‘पण’ केला होता. चिखलात लोळण्याचा. आता कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी तुम्हाला यावे लागेल.’ हे ऐकताच आमदार मंद हसले. प्रतिज्ञेचे लोण मतदारसंघात पसरतेय हे बघून त्यांना आनंद झाला. आता त्या पाटलाची काही खैर नाही असे मनात म्हणत ते उठले व ‘चला’ म्हणत निघालेसुद्धा! मग दर दोन दिवसांआड ‘लोळण्याची’ निमंत्रणे येऊ लागली. आज काय तर खरेदी-विक्री संघातून डाव्यांना हटवले. उद्या काय पंचायत समितीतून लालबावटा हद्दपार केला. या चिखलाच्या निमित्ताने गावागावांत जायला मिळते. सर्वांसोबत अंग माखवून घेतल्याने कार्यकर्तेही खूश होतात. आमदार लोकांमध्ये मिसळणारे, त्यांना अजिबात गर्व नाही, स्वत:च्या हाताने चिखल माखून घेतात, कार्यकर्त्यांनाही माखवतात अशी प्रतिमा तयार होते, हे लक्षात येताच आमदारांनाही हुरूप आलेला. रोज सकाळी पांढरे स्वच्छ कपडे घालून निघायचे व रात्री माखलेल्या स्थितीत परतायचे असा दिनक्रमच ठरून गेलेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातला निकाल काहीही लागो पण आपल्या मतदारसंघात मात्र विजय ठरलेला, हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसत असल्याने आमदार निर्धास्त झालेले. लोकसभेच्या निकालामुळे उडालेली झोपसुद्धा आता त्यांच्या मनाचा ताबा घेऊ लागलेली. सतत चिखलात राहिल्यामुळे पायाला ‘चिखल्या’ झाल्या, पण त्याकडेही त्यांनी फार लक्ष दिले नाही. ही निमंत्रणे जशी वाढू लागली तसे ते कंटाळले. वारंवार आंघोळ करावी लागल्याने सर्दी होऊ लागली होती. असेच एके दिवशी ते तयार होत असतानाच पुन्हा तेच निमंत्रण आले. ‘द्या पांढरे कपडे’ असे सौभाग्यवतींना सांगताच त्या भडकल्या. ‘शुभ्र असलेला हा शेवटचा जोड. तुमचे माखलेले कपडे धुऊन कंटाळलेल्या चार धुणीवाल्या आतापर्यंत काम सोडून गेल्या. आता मुंबैत जाऊन प्लास्टिकचे कपडे मिळत असतील तर घेऊन या. मी कंटाळले आता. अहो, पदाला शोभेल अशा तरी प्रतिज्ञा करायच्या ना! हे काय चालवले काय? रात्री झोपेत तुम्ही आधी घोरायचात, आजकाल ‘डराव डराव’ करता.’ या संतापाने आमदार थोडे वरमले. हे कुठे तरी थांबायला हवे याची जाणीव त्यांना झाली.

मग तब्येतीचे कारण देत त्यांनी चिखलाचे कार्यक्रम नाकारण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांच्या अंगाला खाज सुटू लागली. चिखल्याही वाढल्या. कुणाला खोटे वाटायला नको म्हणून ते डॉक्टरकडे गेले. त्यांनी तपासून निदान केले. ‘बेडकांना होतो तसा आजार तुम्हाला जडलाय. चिखलापासून दूर राहा.’ हे ऐकून आमदार व सौभाग्यवती दोघेही हादरले. तरीही लोक निमंत्रण घेऊन येतच होते. ही त्या पाटलाची चाल तर नसेल अशी शंका त्यांच्या मनात डोकावली. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सराव ते करत असतानाच एक दिवस भ्रमणध्वनीवर त्यांना एका फलकाचे छायाचित्र मिळाले. जिल्हा बँकेसमोर लागलेल्या त्या फलकावर लिहिले होते ‘निवडणुकांना गटारीच्या पातळीवर आणल्याबद्दल आमदारांचे अभिनंदन!’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma elections gram panchayat constituency mla amy
Show comments