अरे, ते एक्झिट पोलवाले कुठल्या बिळात दडून बसलेत? जनतेला सामोरे जाण्याची हिंमत का दाखवत नाहीत? असले प्रश्न या कंपन्यांना अजिबात विचारायचे नाहीत. करू द्या त्यांना आराम आता पाच वर्षे. खाल्ल्या मिठाला जागल्याने त्यांना गाढ झोप लागलेली असू शकते. मीठ कुठले हा प्रश्न तर नकोच. अगदी शेवटच्या मुलाखतीत विश्वगुरू सांगून गेले, गुजरातेत होते काय तर फक्त मीठ म्हणून. त्यामुळे तिथले जास्त खारट असलेले मीठ अतिप्रमाणात खाल्ल्याने पोट तर बिघडणारच. थकव्यामुळे त्यांना ग्लानी आली असेल, त्यातून झोप आली असेल तर त्या बिचाऱ्या कंपनीवाल्यांचा तरी काय दोष? त्यामुळे होऊ द्या त्यांना जरा आडवे.

याच मिठासाठी देशातील अनेक स्वायत्त संस्था, यंत्रणांनी इमान विकायला काढले असेल तर या कंपन्यांनी तरी का मागे राहावे? मग तेही उभे राहिले वाटपाच्या रांगेत. त्यातून झाली असेल मोजणीच्या शास्त्रात भेसळ, पडले असतील बाहेर भलतेच आकडे. म्हणून एवढा त्रागा करून घ्यायची गरज काय? आणि त्यासाठी या कंपन्यांना तर अजिबात जबाबदार धरू नये. यात दोष असेलच तर तो ‘काही होत नाही’ म्हणून जास्त प्रमाणात खाल्लेल्या मिठाचा. ते पुरवणाऱ्या माणसांचा. आहे का धमक तुमच्यात त्यांना जबाबदार धरण्याची. नाही ना? मग उगीच आदळआपट कशाला? तो एक ‘मॅनेज’ (अ‍ॅक्सेस नाही) इंडियावाला. ऐन निवडणुकीत निकालाचे वास्तव काय ते समाजमाध्यमावर बडबडून गेला. नंतर मिठाच्या गरम पाण्यातून बाहेर काढलेल्या चाबकाचे फटके बसताच कळवळत ‘डिलीट’चे बटण शोधले. नंतर सुतासारखा सरळ होत ‘मी अंदाज बांधत नाही, एक्झिट पोल तेवढा करतो’ असे वाहिन्यांवर बरळला. नंतर अतिरंजित आकडे बघितल्यानंतर तरी तुमच्या लक्षात यायला हवे ना! नुसता मिठाचा वास होता त्या आकडय़ांना. तरीही त्याला व इतरांना शोधण्याची गरज काय? ते दांडीजवळच्या मिठागारात असतील असा तर्क काढत तिकडे धाव घेण्याची काही गरज नाही. कथित एक्झिटवाल्यांचे व बंगाली बाबांच्या जाहिराती लावणाऱ्यांचे सारखेच असते. दोघेही काम करताना कधीच दिसत नाहीत हा समाजमाध्यमी तर्क खरा. आणि हो, या कंपन्यांनी ज्या मतदारांच्या मुलाखती घेतल्या त्यांना शोधण्याच्या भानगडीत पडूच नका. एकदा इमान विकल्यावर ते एवढी मेहनत तरी कशाला घेतील ? तरीही तुम्हाला एखादा मुलाखतदाता भेटलाच तर प्रश्न विचारून भंडावू नका. कदाचित त्याच्याही तोंडात एखादा मिठाचा खडा कंपन्यांनी टाकला असेल व त्याला गुळणी धरावी लागली असेल. मग तो कसा बोलणार?

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma exit polls companies access election results amy
First published on: 06-06-2024 at 00:53 IST