‘कोण म्हणते आम्हाला बुद्धी नाही? काळ्या मातीतून नवनिर्मितीची बीजे उगवण्याचे काम खाली मान घालून मुकाटपणे करतोच की आम्ही! तरीही तैलबुद्धीचा विरुद्धार्थी शब्द म्हणून बैलबुद्धी असा शब्दप्रयोग सर्रास सारेच करतात, हा अन्याय नाही का? अर्जुनाने बृहन्नडाचे रूप धारण केले, तेही एक वर्षासाठी. त्याचे केवढे स्तोम माजवले सर्वांनी. अरे, आम्ही शेतीसाठी तारुण्य गमावतो त्याचे कौतुक काय फक्त पोळ्याच्या दिवशीच कराल का? होय, आम्ही नाही उधळत घोड्यांसारखे. राग आला वा मानेवरचा भार असह्य झाला तर बसकण मारतो. तीच आमची नाराजी व्यक्त करण्याची तऱ्हा! म्हणून आम्हाला भावना नाही, बुद्धी नाही असा अर्थ काढताच कसा तुम्ही? आधी सारेच प्रेम करायचे आमच्यावर, तेही सदासर्वकाळ. ट्रॅक्टरची वर्दळ वाढली.आम्ही हळूच शेताच्या धुऱ्यावर ढकलले गेलो. आता आमची आठवण फक्त पोळ्याला. अलीकडे तर या सणाच्या निमित्ताने आमच्यावर चढवण्यात येणारा साजही ३० टक्क्यांनी महागला. त्यामुळे होणारी पूजाही बोडखेपणाची साक्ष पटवणारी. देशात हजारो वर्षे जुनी असलेली कृषी संस्कृती रुजवण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरलात? जरा विष्णुदत्त शर्मांच्या ‘पंचतंत्र’ कथा वाचा. एका राजाच्या दोन राजकुमारांना राजकारण शिकवताना त्यांनी रूपक म्हणून आमचा किती सुंदर उपयोग केलाय ते कळेल तुम्हाला.
काळाच्या ओघात तुम्ही केवळ हिणवण्यासाठी आमच्या नावाचा वापर करण्याची प्रथा रुजवली. बायकोच्या मागे जाणारा नवरा म्हणजे नंदीबैल. फजितीसाठी वापरले जाणारे वाक्य म्हणजे ‘आ बैल मुझे मार’. बुद्धी न वापरता केलेली मेहनत म्हणजे ‘ढोरमेहनत’. आमच्या वाट्याला इतकी अवहेलना यावी याला योग्य कसे ठरवाल तुम्ही? आम्हालाही स्वाभिमान आहे हे कधी लक्षात घेणार? अलीकडे तर गायच तुम्हाला प्रिय झालेली. ती माता, मग आम्हाला पित्याचा दर्जा का नाही? तिच्या लाडापायी आमची वंशावळच खुडून टाकण्याचे पातक तुम्ही बिनदिक्कत करू लागलात. याला चांगले तरी कसे म्हणायचे? तिला चारा घातल्याने पुण्य मिळत असेलही पण आमच्या कानात इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होते या परंपरेचे काय? ती विसरण्याचे पाप कुणाचे? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचेय त्यांनी जरी याचे पालन केले व लगेच त्यांची अपेक्षा पूर्ण झाली तर सुगीचे दिवस येतील आम्हाला. किमान स्वार्थापोटी का होईना पण लोकही जवळ करू लागतील आम्हाला. राजकारणासाठी तुम्हाला गाय जशी उपयोगी पडते तसे आम्हीही पडू की! त्यात काय एवढे? आम्ही पडलो शाकाहारी पण श्रावण संपून आमचा सण आला की तुम्हाला वेध लागतात ते मांसाहाराचे. त्यामुळे आमची पूजा हा केवळ उपचार उरलाय अलीकडे. कधी एकदा कपाळाला टिळा लावतो व ढकलतो गोठ्यात अशीच घाई झालेली दिसते अनेकांना. किती हे अवमूल्यन. अरे, निसर्गाचे चक्र टिकवायचे असेल तर जरा पशुपालकाच्या भूमिकेत या. आम्हालाही तेवढाच सन्मान द्या. इच्छापूर्तीसाठी कानाला लागा. बघा तुमचा उत्कर्ष कसा होतो ते!’