‘भलेही ते असतील गरीब पण आपल्या जिल्ह्याला गरीब म्हणण्याचा अधिकार त्यांना दिला कुणी? ते काही नाही, आता पुढच्या आठवड्यात आले की थेट त्यांच्या विरोधात मोर्चाच काढायचा. यात जिल्ह्यातील सर्व श्रीमंतांना सहभागी करून घ्यायचे. म्हणजे आमदार पण आपसूक येतील.’ हिंगोलीच्या विश्रामगृहात जमलेल्या धनवंतांपैकी एकाने सुरुवात केली तसे इतरही तावातावाने बोलू लागले. गलका वाढतोय हे लक्षात येताच एक ज्येष्ठ म्हणाले, ‘मोर्चा वगैरे काही नाही. पालकमंत्री नरहरी झिरवळ आल्यावर आपली श्रीमंती दाखवून देणारे इतके कार्यक्रम आयोजित करायचे की त्यांचे डोळेच दिपायला हवेत.’ ही कल्पना साऱ्यांना पटली.
मग तिथेच बसलेल्या एकेकाने वेगवेगळ्या संघटनांची नावे समोर करत मंत्री कार्यालयात फोन करून वेळ ठरवण्यास सुरुवात केली. तिकडे कार्यक्रमांच्या मागणीत अचानक झालेली वाढ बघून झिरवळसुद्धा चक्रावले. गरिबीचा मुद्दा काढल्यामुळे हिंगोलीकर नक्कीच सुखावले असतील व ती दूर व्हावी म्हणून कार्यक्रम घेत असतील या समजुतीतून झिरवळांनी सर्व कार्यक्रम ‘ओके’ केले. ठरलेल्या दिवशी ते शहराच्या वेशीवर पोहोचले तेव्हा नजर जाईल तिथपर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला जेसीबी व ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या दिसल्या. स्वागतासाठी झालेली प्रचंड गर्दी बघून उत्साहित झालेल्या सहाय्यकांनी त्यांना खुल्या जीपमध्ये बसवले. अवजड वाहनांमधून होणारी गुलाबवृष्टी बघून ते हरखून गेले. तेवढ्यात या स्वागत समारंभाचे आयोजक असलेले एक गृहस्थ पुढे आले. त्यांनी भलामोठा हार त्यांच्या गळ्यात घातला. त्याच्या वजनाने ते वाकू लागले तसा तो बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ते गृहस्थ हळूच त्यांच्या कानात कुजबुजले. ‘आता तुम्ही मंत्री झाले. तेव्हा मनातले दारिद्र्य बाहेर काढून फेकून द्या. तुम्हाला या जिल्ह्यातील श्रीमंतांसाठीच राबायचे आहे हे लक्षात असू द्या’ हे ऐकताच झिरवळ चमकले.
दुसरा कार्यक्रम एका बंद शामियानात होता. तोही वातानुकूलित. आत सुमारे एक हजार लोक भरजरी वस्त्रे घालून बसलेले. झिरवळ जाताच पाच हत्तींनी त्यांच्या गळ्यात हार घातले. मग एकेकाची भाषणे सुरू झाली. ‘तुम्हाला आमच्या जिल्ह्याची म्हणजे फक्त ‘आमचीच’ सेवा करायची आहे हे ध्यानात असू द्या साहेब. जिल्ह्यात आहेत थोडेफार गरीब पण त्यांना उन्नत करायचे असेल तर आमच्या श्रीमंतीत वाढ होणे गरजेचे. तेव्हा पीकविमा, लाभाच्या सरकारी योजना, प्रसंगी थोडाफार वाळू उपसा यात आम्हाला प्राधान्य द्या. मग बघा जिल्हा कसा सुजलाम सुफलाम होतो ते. मनातले गरिबीचे मळभ दूर करून तुम्ही फक्त आमच्याकडेच लक्ष द्यावे यासाठी या सत्काराचे औचित्य साधून तुम्हाला एक कोटीची थैली आम्ही देत आहोत. त्याचा स्वीकार आपण करावा,’ हे ऐकताच झिरवळांना गरगरल्यासारखे झाले. त्यांनी भानावर येत आधी डोक्यावरची टोपी व्यवस्थित केली.
पालकमंत्रीपद हे गरिबी दूर करण्याचा एक मार्ग आहे असे दादा मला म्हणाले होते पण ते कसे याचे उत्तर आजच्या सत्कारातून मिळाले. एवढे बोलून झिरवळ खाली बसले. नंतर आयोजकांनी त्यांना एका झोपडीत जेवायला नेले. इथे नक्की गरिबी दिसेल असे वाटून ते आत शिरले तर समोर पंचपक्वान्नांचे चांदीचे ताट. हे घर कुणाचे असे त्यांनी विचारताच एका कृश महिलेने समोर येण्याचा प्रयत्न केला पण आयोजकांनी तिला मागे ढकलले. त्याकडे दुर्लक्ष करत झिरवळांनी कडाडून लागलेली भूक शमवली. नंतर जिल्हा कचेरीत जाताच त्यांनी संपूर्ण इमारत अत्याधुनिक करा असा आदेश देत दादांना फोन लावला व म्हणाले, ‘हिंगोलीबाबतचे माझे आकलन चुकले. होते कधी कधी गरिबांकडून चूक. दादा माफ करा.’
© The Indian Express (P) Ltd