आमच्या असे निदर्शनास आले आहे की, कलेच्या वर्तुळात सक्रिय असलेले बहुतांश विनोदकार व विडंबन तसेच वात्रटिकाकार अतिशय चाणाक्षपणे त्यांच्या कलेचा वापर सरकार तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध करत आहेत. यातले बरेचसे कलाकार हे सरकारने निश्चित केलेल्या ‘अर्बन नक्षल’ या व्याख्येत बसणारे आहेत. कलेच्या नावाखाली पातळी सोडून, संविधानाच्या ‘धज्जियाँ’ उडवत सुरू असलेला हा स्वैराचार पूर्णपणे बेकायदा आहे. अशा कृत्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दाद देणे हा कायदेभंग असल्यानेच कुणाल कामरा प्रकरणात प्रेक्षकांना नोटीस बजावण्यात आल्या. भविष्यात प्रेक्षकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत.

(१) अशा कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याआधी सरकारने विकसित केलेल्या ‘विरोधक शोधन अॅप’मध्ये संबंधित कलाकाराचे नाव टाकून तो काळ्या यादीत आहे की पांढऱ्या याची खात्री करून घ्यावी.

(२) कोणत्याही यादीत नसलेल्या कलाकाराच्या कार्यक्रमाला तुम्ही गेलात व त्याने राज्यकर्त्यांची खिल्ली उडवणे सुरू केले तर लगेच उठून त्याचा निषेध नोंदवल्यास नोटिशीपासून तुमची सुटका होईल.

(३) या निषेधाचे तुम्ही केलेले वा करवून घेतलेले चित्रीकरण पुरावा म्हणून सादर करावे लागेल.

(४) सत्तेतील ज्या महनीयांवर विनोद वा व्यंग केले, तो किती शक्तिशाली आहे याचा विचार करूनच ही विरोधाची कृती तुम्हाला करावी लागेल. क्षुल्लक सत्ताधाऱ्यांवरील टीकेचे चित्रीकरण सादर करून पोलिसांचा अमूल्य वेळ वाया घालवू नये.

५) तुम्ही विरोध करत असताना आजूबाजूचे प्रेक्षक ‘खी खी’ हसून त्या कलाकाराला दाद देत असतील तर त्यांचेही चित्रीकरण करावे. या कायदेशीर मदतीसाठी तुम्हाला रोख बक्षीस दिले जाईल.

६) समोरचा कलाकार व्यंगाच्या आडून सत्ताधीशांची तारीफ करत आहे की टीका, याचे आकलन प्रत्येक प्रेक्षकाला असणे आवश्यक आहे. नसेल तर त्याने कार्यक्रमाला जाण्याच्या फंदात पडू नये.

७) सत्ताधाऱ्यांवर केलेल्या विनोदावर हसणे हासुद्धा एक गुन्हाच आहे याचे भान प्रत्येकाला ठेवावेच लागेल.

८) मी कार्यक्रमाला गेलो, पण अजिबात हसलो नाही, अशी सबब देऊन कारवाईच्या कचाट्यातून सुटता येणार नाही.

९) हसणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे असा समज कुणीही करून घेऊ नये.

१०) सत्ताधाऱ्यांवरील विनोदाच्या वेळीच मी लघुशंकेसाठी वा पापकॉर्न आणण्यासाठी बाहेर गेलो होतो असे कारण देत कारवाईतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.

११) हसण्याव्यतिरिक्त टाळी वाजवून वा मुद्राभिनय (वाचा जनसुरक्षा कायदा) करून दिलेली दादसुद्धा बेकायदा समजली जाईल.

१२) पांढऱ्या यादीत असलेल्या व कायम विरोधकांची खिल्ली उडवणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमात तुमच्या हसण्यावर कुठलेही बंधन नसेल.

१३) तुमच्या घरी किंवा मोबाइलमध्ये डोकावण्याचा सरकारचा तूर्त इरादा नाही. मात्र विनोदाच्या नावाखाली स्वैराचाराला प्रोत्साहन देणार नाही, अशी भूमिका तुम्ही व्यक्तिगत पातळीवर घेतली तर त्याचे स्वागतच केले जाईल.

सत्ताप्रेमी नेत्यांप्रमाणेच सत्ताप्रेमी नागरिकही मोठ्या संख्येत निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत, त्याचे पालन करून सहकार्य करावे.