भाग एक
‘‘प्रिय दादा, नमस्कार. ‘लाडकी बहीण’ योजनेची बातमी वाचली. मी घरकाम करते तिथल्या सायबांनी अर्ज कर असा आग्रह केल्यावर खूप विचार करून हे पत्र पाठवीत आहे. दादा, याचा लाभ घ्यावा असे मला वाटत नाही. आमच्यासाठी एकेक पैसा मोलाचा पण त्याहीपेक्षा बहीण-भावाचे नाते महत्त्वाचे. बहिणीला पाडण्यासाठी तुम्ही वहिनीला उभे केले. एक भाऊ म्हणून कर्तव्यात कसूर करून आता तुम्हीच ‘माझी लाडकी बहीण’ म्हणता हे पटणारे नाही. ज्यांच्या भाऊपणाविषयी संशय निर्माण झाला त्याच्या योजनेचा लाभ घ्यावा असे कोणत्या बहिणीला वाटेल? दादा, भाऊ-बहिणीचे नाते हे प्रेम व त्यागाचे असते. तुम्ही स्वार्थाला महत्त्व दिले त्यामुळे तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. पाच वर्षांपूर्वी तुम्ही पहाटेच्या शपथविधी प्रकरणातून सहीसलामत बाहेर आल्यावर सुप्रियाताईंना झालेला आनंद मी बघितला होता. दादा.. दादा.. म्हणत त्यांनी तुम्हाला तेव्हा जवळ घेतले होते. नाते असावे तर असे हे मी माझ्या भावांना सांगितले होते. आता योजना जाहीर झाल्यापासून तेच भाऊ मला चिडवू लागलेत. त्यांचेही बरोबर आहे. त्यामुळे मी योजनेची लाभार्थी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नको मला ते तुमचे दीड हजार रुपये. पाहिजे तर आणखी दोन घरची कामे करेन पण स्वाभिमानाने जगेन. माझ्या पत्राचा तुम्ही राग मानून घेऊ नका, ही विनंती.’’- एक बहीण.
भाग दोन
जाहीर केलेल्या योजनेला कमालीचा प्रतिसाद मिळत असल्याने सुखावलेले दादा कोचावर शांतपणे बसले होते. तेवढय़ात साहाय्यकाने हळूच हे पत्र त्यांच्या हातात दिले. ते वाचून त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली. अर्थसंकल्पापूर्वीच्या एकेक गोष्टी आठवायला लागल्या. यात बहिणीचा उल्लेख असल्याने ही योजना मी जाहीर करणे विरोधकांना टीकेची संधी दिल्यासारखे आहे, असे सांगून बघितले. पण एकनाथराव व देवेंद्रभाऊ ऐकायलाच तयार नव्हते. नंतर याच एकनाथरावांनी ‘तीर्थयात्रा’ योजना स्वत:च जाहीर केली. मी फारच आग्रह धरल्यावर बहिणीच्या योजनेत मुख्यमंत्री हे नाव जोडले तेव्हा कुठे राजी झालो. लोकसभेतल्या पराभवानंतर असा विरोधाचा सूर उमटणे म्हणजे धोक्याची घंटाच. तिकडे मला संपवायला काका तर टपलेलेच. या पत्राचे त्यांना कळले तर ते बरोबर फायदा उचलतील. अशी हजारो पत्रे पाठवण्याची तजवीज करतील. सुप्रिया आणि रोहित लगेच पत्र लिहिणाऱ्या बाईला भेटायला जातील. त्यापूर्वीच काहीतरी हालचाल करायला हवी म्हणत दादांनी सर्व साहाय्यकांना बोलावले. ‘‘हे पत्र वाचा. ते कुठून आले याचा शोध घ्या. ते तिनेच लिहिले की तिच्या सायबाने याची खात्री करा. तिला गाठून तिचा लाभार्थीचा अर्ज भरून घ्या. जावा, कामाला लागा.’’ साहाय्यक निघून गेल्यावर दादांच्या मनात विचार आला ‘‘आपला निर्णय चुकला तर नाही?’’