राज्यभरातील लाडक्या बहिणींचे धन्यवादाचे फोन घेऊन थकलेल्या आदितीताई जरा वेळ खुर्चीत विसावल्या तेवढ्यात एकनाथरावांच्या कार्यालयातून त्यांना तातडीचा संदेश आला. सर्व बहिणींना एक पत्र पाठवायचे आहे. त्याचा मसुदा तयार करून आणा. आता हे काय नवीन असा विचार त्या करत असतानाच असाच संदेश अजितदादा व देवाभाऊंच्या कार्यालयातून येऊन थडकला. लगेच त्यांनी खात्याच्या सचिवांना बोलावले व एक तासाच्या आत मसुदा हवा असे निर्देश दिले. सचिवांनी सहसचिव, त्यांनी उपसचिव, मग त्यांनी कक्ष अधिकारी व त्यांनी वरिष्ठ कारकुनाला निर्देश दिल्यावर खात्यातल्या सर्वात कनिष्ठ कारकुनावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. राज्याचे एक प्रमुख, दोन उपप्रमुख व खात्याच्या प्रमुखांची स्वाक्षरी असलेले हे पत्र नेमके कसे लिहायचे या प्रश्नानेच त्याला घाम फुटला. कटिंग चहाने थोडी तरतरी आल्यावर त्याने सुरुवात केली. ‘लाभार्थी भगिनींनो, तुम्हाला विदितच आहे की राज्य शासनाने शासन निर्णय क्रमांक/ मबावि/ मदत-३ अन्वये राज्यपालांच्या मान्यतेने राज्यभरातील पात्र महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ कार्यान्वित केली आहे. ज्याअर्थी शासनाला असे निदर्शनास आले की महिलांचे आर्थिक उत्थान करणे राज्याच्या विकासासाठी आवश्यक आहे त्याअर्थी हा निर्णय अमलात आणण्याचे ठरवले होते. सदर निर्णयाचा लेखाशीर्ष क्रमांक १/२/२४ असून त्या माध्यमातून राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून खात्यामार्फत केली जात आहे.

महिन्याला रुपये पंधराशे या पद्धतीने एका आर्थिक वर्षात १८ हजार रुपये लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याचे सरकारचे नियोजन आहे. शासनाची अशी धारणा झाली आहे की राज्यभरातील महिला लाभार्थी या योजनेमुळे आनंदित झाल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ९६ लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे अनुदान जमा करण्यात आले असून अडीच कोटी लाभार्थींचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. समस्त महिलावर्गाची आत्मनिर्भरता हेच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व खात्याच्या मंत्री यांचे ध्येय असून त्याच्या पूर्ततेसाठी सर्व कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. या योजनेत सामील होण्यात काही अडचणी येत असतील तर खात्याच्या वतीने एक टोलफ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून तो पत्राच्या शेवटी नमूद आहे. त्यावर सर्वांनी संपर्क साधावा. राज्यातील सर्व महिला लाभार्थींना सुखी व स्वस्थ करणे हेच शासनाचे धोरण असून ते राबवण्यासाठी मा.मु./ मा.उ.मु./ मा.उ.मु./ मा.मं. यांच्या निर्देशान्वये आमचे खाते कार्यरत आहे. यांची नोंद सर्व लाभार्थींनी घ्यावी.’ हा मसुदा तयार झाल्यावर पुन्हा त्याच क्रमाने सचिवांपर्यंत पोहचला. त्यांनी तो आदितीताईंकडे दिला व त्या लगेच वाटच बघत असलेल्या शिंदे, फडणवीस व पवारांकडे गेल्या. तिथे तो दाखवल्यावर तिघांचेही चेहरे खाडकन् उतरले. ‘तुम्ही तरी हे वाचले होते का’ अशी विचारणा तिघांनी एका सुरात केली तेव्हा काय घडले असेल हे ताईंच्या लक्षात आले. मग पीआर एजन्सीजना फोनाफोनी सुरू झाली. त्यानंतरच्या अर्ध्या तासात चार मसुदे तिघांच्या पुढ्यात होते. त्यातल्या तीनात ‘पुन्हा संधी द्या’ असा शेवटी उल्लेख होता. हा आचारसंहितेचा भंग ठरू शकतो हे लक्षात आल्यावर ‘कष्टाळू हात डोक्यावर असू द्या’ हे वाक्य असलेले पत्र अंतिम करण्यात आले. बैठक संपल्यावर कक्षात येताच संतप्त ताईंनी त्या कारकुनाला बोलावले, पण तो फास्ट लोकल पकडायची असल्याने निघून गेला होता.