‘गणिताच्या शिक्षकाला बेरीज येत नाही ही बातमी समस्त गुजराती बांधवांचा अवमान करणारी आहे. राज्याच्या गौरवासाठी विश्वगुरू झटत असताना अशा बातम्यांनी त्यांना वेदना होतात हे तुम्हाला कळायला हवे. त्यामुळे हा कलंक तातडीने पुसून काढण्यासाठी उपाययोजना करा’, असा संदेश दिल्लीहून मिळताच राज्याच्या शिक्षण मंडळाची बैठक तातडीने घेण्यात आली. नेमके करायचे काय यावर बराच खल झाल्यावर अध्यक्ष म्हणाले ‘गणिताची उत्तरपत्रिका तपासताना बेरीज चुकवणाऱ्या साडेचार हजार शिक्षकांचा उद्बोधन वर्ग घेण्यात काही हशील नाही. त्यापेक्षा यांना थेट बेरीज करण्याचेच काम देऊन परीक्षा घेऊ. या सर्वांकडून दंड म्हणून गोळा झालेले ६४ लाख रुपये आपल्या खात्यात आहेत. राज्याच्या बाजारात रोख रकमेची कमतरता नाही. खात्यातले पैसे काही प्रतिष्ठानांकडे वळते करून त्यांच्याकडून नगद घेऊ. पाच ते पाचशेपर्यंतच्या नोटा असतील. विभागणी करून या शिक्षकांकडून त्या मोजून घेऊ. त्यात कोणत्या नोटा किती याचाही तक्ता असेल व शेवटी बेरीज असेल. जो उत्तीर्ण होईल त्याला दंडाची रक्कम परत मिळेल असे जाहीर करू. त्यांचे गणित खरोखर कच्चे आहे की कसे हे कळेल. अनुत्तीर्ण होतील काय कारवाई करायची ते बघू. उपक्रम यशस्वी झाला तर राज्यावर लागलेला बदनामीचा डाग आपसूकच पुसला जाईल.’ हे ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
उपक्रम आरंभाच्या दिवशी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा डेराच मंडळाच्या कार्यालयासमोर पडला. आळीपाळीने बोलावण्यात आलेल्या शिक्षकांसाठी नगदीचा तुटवडा जाणवला तर ती तातडीने उपलब्ध करून देऊ असे काही व्यापाऱ्यांनी उत्साहात जाहीर केले. सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे मन पैसे मोजताना शांत राहावे म्हणून साधूसंत आशीर्वादासाठी हजर असतील, असे जाहीर झाले. काही संघटनांनी होमहवनाचे कार्यक्रम आयोजित करू असे माध्यमांना सांगितले. शिक्षकांना ‘मोजून’ बाहेर आल्यावर ढोकळा, जिलेबी व फापड्याचा नाश्ता देण्याची तयारी काही हॉटेलचालकांनी चालवली. उपक्रमाला शांततेत सुरुवात झाली. सलग आठ दिवस सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळात शिक्षक येत गेले व नोटांची बंडले मोजून बेरजेचा कागद मंडळाकडे सोपवत गेले. नंतर निकाल जाहीर झाला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. सर्वच शिक्षक यात उत्तीर्ण झाले होते. सर्वांनी बरोबर पैसे मोजले व नोटांच्या वर्गवारीची बेरीजही चुकवली नाही. हे कळताच राज्यात जल्लोष सुरू झाला. मग उत्तरपत्रिका तपासणीत या सर्वांच्या बेरजा चुकल्या कशा, असा प्रश्न मंडळाच्या अध्यक्षांना पडला. अचानक त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. याच शिक्षकांनी तपासणीचा मोबदला वाढवून द्या अशी मागणी केली होती व त्याकडे मंडळाने लक्ष दिले नाही. ती मान्य झाली असती तर यातले कुणी चुकलेच नसते. अध्यक्षांनी तातडीने ती मान्य केली व म्हणाले, ‘शेवटी गुजराती माणूस कुठलाही असो, अर्थव्यवहारावरच त्याची कार्यक्षमता व अचूकता अवलंबून असते.’