विश्वगुरूंनी केलेली घराणेशाहीची व्याख्या ऐकून अथवा वाचून काहींच्या मनात प्रश्नांची भुते नाचायला लागली असतील तर त्याला आमचा नाईलाज आहे. या व्याख्येमागील कार्यकारणभाव उलगडून दाखवणे आमचे कर्तव्य ठरते. त्यासाठी काही उदाहरणे महत्त्वाची. गुरूंनी उल्लेख केलेल्या राजनाथजींच्या मुलाने स्वत:च्या ताकदीवर समर्थन मिळवले व उत्तरप्रदेशातून सलग आमदार म्हणून निवडून येत राहिले. मी राजनाथजींचा मुलगा हे विसरा असे आवाहन ते प्रत्येक सभेत करायचे व लोकही त्यांच्या वडिलांना विसरायचे. ही सवय त्यांनी लावल्यामुळेच त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागली व त्यात त्यांनी यश मिळवले.
राजनाथजी मुलाच्या प्रचाराला गेले, पण पक्षाचे नेते म्हणून, वडील म्हणून नाही. हिमाचलचे धुमळ सुपुत्र अनुरागजी तर एकटय़ाने पहाड चढले, दरीत उतरले. वडिलांकडे बघू नका, माझ्याकडे बघा असाच प्रचार त्यांनी केला. महाराष्ट्रातील मुंडे भगिनी कधी विजयी तर कधी पराभूत झाल्या पण पक्षपातळीवर अन्याय होताना दिसला तरी त्यांना वडिलांचे स्मरण झाले नाही. अमितजींचे सुपुत्र लहानपणापासून उत्तम क्रिकेट खेळत असल्याने या खेळाच्या राजकारणात शिरले. वडिलांचा आधार न घेता अगदी स्वकर्तृत्वाने या खेळाच्या संघटनेला जागतिक कीर्ती मिळवून दिली. याला घराणेशाही म्हणता येणार नाही हे गुरूंचे म्हणणे अगदी योग्य. या पद्धतीने एकाच कुटुंबातील दोन नाही तर दहा जणांची सुद्धा राजकारणात भरभराट झाली तरी चालेल हे गुरूंचे मत तुम्हाला पटवून घ्यावेच लागेल.
याच्या अगदी विपरीत असलेली उदाहरणे बघा. त्या उत्तर प्रदेशातील मुलायमसिंग घराण्यातील ३७ सदस्य एकाच वेळी राजकारणात होते. ‘नेताजी’ म्हटल्याशिवाय त्यांना एकही निवडणूक जिंकता आली नाही. प्रत्येक ठिकाणी वडिलांची पुण्याई समोर करून सायकल चालवण्याचे नाटक करत यश मिळवत राहिले. त्या बंगालच्या दीदीच्या भाच्याची तीच गत. ‘खेला होबे’ म्हटल्याशिवाय त्याला कुणी विचारतच नाही. काँग्रेसमध्ये तर वरपासून खालपर्यंत हीच पुण्याई वारसदारांच्या कामाला आली. ‘बलिदान’ हा शब्द वापरून वापरून निवडणुकीत यश मिळवण्याची मोठी परंपरा या पक्षात. या पक्षाचे नेते दिल्लीत बसायचे व कार्यकर्ते निवडणुका जिंकून द्यायचे. स्वकर्तृत्व शून्य. तरीही पक्ष चालवण्यासाठी साऱ्यांना राबवून घ्यायचे. ही खरी घराणेशाही व त्याला गुरूंचा विरोध होता, आहे व राहणार.
याउलट ठाकूर, सिंग, मुंडे प्रभूतींनी कधीही पक्ष ताब्यात घेण्याचा अथवा तो चालवण्याचा विचार स्वप्नातही केला नाही. त्यामुळे पक्षात लोकशाही टिकून राहिली व एकाच कुटुंबाच्या वर्चस्वाची बाधा होऊ शकली नाही. तेव्हा या व्याख्येमागील स्पष्ट संदेश हाच की नेतापुत्रांनी राजकारणात जरूर यावे पण पक्षावर ताबा (तोही दीर्घकाळ) मिळवू नये. आता यावर ते जे कुणी मोजके ‘काही’ आहेत ते म्हणतील की अशी व्याख्या करणारेच गेल्या दहा वर्षांपासून एकचालकानुवर्ती पद्धतीने पक्ष चालवताहेत. ही पद्धत घराणेशाहीचीच दुसरी बाजू असलेल्या हुकूमशाहीशी साधम्र्य साधणारी. हे खरे असले तरी ही प्रत्यक्ष घराणेशाही नाही व हुकूमशाही तर नाहीच नाही हे या ‘काहीं’नी कायम लक्षात ठेवत या नव्या व्याख्येचा स्वीकार करावा.