विश्वगुरूंना पाठिंबा जाहीर केल्यावर आनंदलेल्या राज ठाकरेंनी महायुतीतील घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी बाळा, संदीप व नितीन यांच्या नावाची घोषणा केली. महायुतीच्या बैठकांत सहभागी होऊन चर्चेत राहता येईल म्हणून त्रिकूट जाम खूश होते. कमळ, धनुष्यबाण, घडयाळासोबत इंजिनसुद्धा दिसू लागेल व पक्षविस्ताराचे स्वप्न साकार होईल या समाधानात तिघे भेटीच्या तयारीला लागले.
भाजपशी समन्वयाची जबाबदारी मिळालेले बाळा आशीषभाऊंच्या कार्यालयात पोहोचले. प्रचंड गर्दी होती. एक तासाने निरोप आला ‘कोअर समिती’ सुरू आहे. दोन तास वाट बघावी लागेल. ‘कोअर’मध्ये आपण का नाही असा प्रश्न बाळांच्या ओठांवर आला पण त्यांनी तो गिळला. दीर्घ प्रतीक्षेनंतर आत शिरताच भाऊंनी प्रश्न केला ‘हं, सांगा तुमची मतपेढी कोणत्या भागात, किती आहे?’ त्याकडे दुर्लक्ष करत ते सांगू लागले ‘२००९ मध्ये आम्हाला या भागात इतकी मते मिळाली..’ हे ऐकून भाऊंचा चेहरा त्रासला. ‘अहो, इतिहास उगाळू नका. आता ताकद किती, कुठे हे आकडेवारीनिशी सांगा’. नेमके उत्तर ठाऊक नसल्याने त्यांनी साहेबांच्या सभेला लाखाची गर्दी होते. ते सारे आमचे मतदारच असा युक्तिवाद केला. वाद घालण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच भाऊंनी तुमच्या पाच कॉर्नर मीटिंग आयोजित करतो, स्थळ तुम्ही निवडा असे सांगत चर्चा संपवली.
हेही वाचा >>> संविधानभान: आरक्षण समजावून घेताना..
राष्ट्रवादीची जबाबदारी सोपवलेल्या संदीपरावांनी अजितदादांना खूप फोन केले पण प्रतिसादच मिळाला नाही. शेवटी त्यांनी तटकरेंची वेळ मिळवली. ते म्हणाले, ‘आम्ही सहा-सात जागा लढवत आहोत तिथे तुमचा किती जोर ते सांगा’ संदीपराव पुणे, बारामती, रायगड, शिरुर, सातारा परिसरातील सक्रिय सैनिकांची नावे घेऊ लागले. यातले एकही नाव माझ्या परिचयाचे नाही, असे तटकरेंनी म्हणताच त्यांचा चेहरा पडला. उगीच नाराजी नको असे पुटपुटत ‘तुम्ही सर्व ठिकाणी सभा घ्या व छायाचित्रे मला पाठवा. रस्तामार्गानेच प्रवास करावा लागेल. हवाईसेवेची ऐपत नाही.’ हे ऐकून संदीपराव बाहेर पडले व अलिबागची जेटी गाठली. भरपूर प्रयत्न केल्यावर नितीनदादांना एकनाथ शिंदेंनी पहाटे दोन वाजता बोलावले. नितीनदादांनी ठाण्यात आमचा प्रभाव कसा, हे सांगण्यास सुरुवात करताच त्यांचा चेहरा आक्रसला. त्यांनी प्रमुख नेत्यांची नावे सांगताच शिंदे हळूच म्हणाले ‘या सर्वांना घेऊन तुम्ही आमच्या पक्षात येत का नाही?’ नितीनदादांना दरदरून घाम फुटला. हे तिघेही एकत्र आले, तेव्हा झालेली अवहेलना हाच त्यांच्यातल्या चर्चेचा विषय होता. तेवढयात तिघांचेही लक्ष टीव्हीकडे गेले. तिथे सुषमा अंधारेताई बोलत होत्या. ‘राज ठाकरेंचा पक्ष एकही टॅक्सी नसलेल्या पण सर्वांना टॅक्सी पुरवणाऱ्या ओला उबरसारखा, एकही हॉटेल नसून खाद्य पुरवणाऱ्या झोमॅटोसारखाच’ हे ऐकून तिघांनीही साहेबांकडे जाण्याचा बेतच रद्द केला.