तुम्ही काहीही म्हणा, अजितदादांसारखा स्पष्टवादी राजकारणी राज्यात शोधूनही सापडणार नाही. काय वक्तव्ये असतात त्यांची एकेक. परवाचेच बघा ना! ‘संसदेत भाषणे करून, सेल्फी काढून, संसदरत्न पुरस्कार मिळवून मतदारसंघातील कामे होत नाहीत. मी मतदारसंघात न येता मुंबईत बसून उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळवला असता तर कामे झाली असती का?’ याचा मथितार्थ हाच की नुसती भाषणे नको, कामे करा. आता यावरून कुणी असा निष्कर्ष काढला की दादांना काका व ताईंसारखी भाषणे करता येत नाहीत, या असूयेतून ते बोलले तर त्यांच्यासारखा पढतमूर्ख या जगात नाही. आमदार किंवा खासदार होणे याचा अर्थ एकच तो म्हणजे विकासकामे मार्गी लावणे. आता कामे करायची म्हटली की कंत्राटे आलीच, ती ‘घेणारे’ व त्यातून ‘देणारे’ लोक आले असा तर्क लावणे सुद्धा दादांवर अन्याय करणारे. कितीही आरोप होवोत पण दादा ‘त्यातले’ नाहीत. म्हणूनच तर आधी आरोप करणाऱ्या नागपूरच्या भाऊंनी त्यांना शेजारी बसवून ‘पवित्र’ केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ : उद्यमी ट्रम्प यांचे फसवे ‘उद्योग’!

लोकप्रतिनिधी केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित नसतात. त्यांनी त्यापलीकडे जात राज्य व देशातील लोकांचे प्रश्न मांडायला हवेत, त्यासाठी भाषणे करायला हवीत ही संकल्पनाच चुकीची. अशी तोंडाने वाफ दवडल्याने लोक मत देतात हे दादांना अमान्य. काम दाखवा व मत मिळवा हा त्यांचा सरळ ‘हिशेब’. अशा कामांमुळे सरकारी पैसा ‘वाहता’ राहतो. त्याचा लाभ अनेकांना होतो. हे वास्तव नाकारून दादा केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी बोलताहेत असा अर्थ काढणे चुकीचेच. गेली अनेक वर्षे बारामतीचे काका व ताई देशभर नुसती भाषणे ठोकत हिंडत होते तेव्हा दादा याच भागात शेकडो ‘कामे’ करण्यात व्यग्र होते. नेमकी हीच बाब दादांना सांगायची होती. कामवाला हवा भाषणवाले नकोत. त्यामुळेच तर दादा ‘उत्कृष्ट संसदपटू’ वगैरे पुरस्काराच्या भानगडीत कधी पडले नाहीत. भाषणांमुळे लोक भावनिक होतात पण त्याने भाकरीचा प्रश्न सुटत नाही हे दादांचे महत्त्वाचे वाक्य. यातली भाकरी नेमकी कुणाच्या ताटात? दादा, त्यांचे ‘कामवाले’ मित्र की सामान्य लोक? असले कुजके प्रश्न उपस्थित करून दादांच्या ‘काम’निष्ठेवर शंका घेण्याची काही गरज नाही. आणि हो, हे वाक्य केवळ काका व ताईसाठी होते, विश्वगुरूंसाठी नाही.दादा नेहमी असेच काहीतरी बोलतात व नंतर माघार घेत प्रायश्चित्ताचे नाटक करतात असा निष्कर्ष तर अजिबात नको. ते धरणात पाणी भरणे असो वा पीएच.डी.संदर्भातले. या दोन्ही वक्तव्यांमागे ‘काम काय, फायदा काय’ अशीच प्रेरणा होती. त्याने लोक दुखावले म्हणून दादा नरमले पण आता घरचेच दुखावल्याने ते माघार घेण्याची शक्यता नाही. लोकांच्या कामाचे ओझे ते भविष्यातही सहन करतील पण घरच्यांचे ओझे त्यांनी नुकतेच खांद्यावरून उतरवलेले. त्यामुळे आता त्यांचे दोन्ही खांदे कामांचे ओझे वाहण्यासाठी सज्ज झालेले म्हणून ते इतके स्पष्ट बोलले. काम, कंत्राटदार व सरकार हीच आता दादांच्या कार्याची त्रिसूत्री. त्यामुळे आता काका व ताईंनी भाषणबाजी न करता बारामतीतील विकासकामे दादांचीच, आम्ही काहीही केले नाही असे सत्वर जाहीर करावे व राज्यातील विविध कंत्राटदार संघटनांतर्फे लवकरच आयोजित केल्या जाणाऱ्या दादांच्या गौरव समारंभाला एक सामान्य प्रेक्षक म्हणून उपस्थिती लावावी हेच योग्य!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma satire article on ajit pawar controversial remarks zws