मा. आयुक्त, भारतीय निवडणुकांचा आयोग, दिल्ली.
हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी आपण सुरू केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने ‘अधिकृत’ शिवसेनेच्या वतीने आम्ही खालीलप्रमाणे स्पष्टीकरण सादर करत आहोत. ‘आमच्या पक्षाचे सर्वोच्च एकनाथजी शिंदे हे गतिमान कारभारासाठी ओळखले जाणारे राज्यातील एकमेव नेते आहेत. ते इतरांप्रमाणे घरी बसून राज्यशकट हाकत नाहीत. हीच गतिमानता निवडणुकीतही दिसावी म्हणून त्यांनी पक्षाच्या सर्व विभागीय सचिवांना हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक विभागाचे सचिव भाऊसाहेब चौधरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ‘अन्य’ काही कामासाठी तिथे जात होते. तेव्हा चाललेच आहात तर दोन एबी फॉर्म घेऊन जा असे त्यांना सहज सांगितले गेले. त्यामागे निवडणुकीवर ‘धनशक्ती’चा प्रभाव पाडण्याचा उद्देश नव्हता. खर्चाचे म्हणाल तर त्यातही फारसे तथ्य नाही. एकमेव ‘खरी’ शिवसेना अशी ओळख तुमच्याच मान्यतेने आम्हाला मिळाली तेव्हापासून अनेक दानशूरांनी त्यांची विमाने व हेलिकॉप्टर आम्हाला जनतेच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत. तरीही आयोगाचे समाधान होत नसेल तर या सेवेसाठी मंजूर दरपत्रकानुसार पक्ष खर्च दाखवायला तयार आहे. नाशिकमधील आमच्या दोन उमेदवारांनी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टरने एबी फॉर्म आले असे सांगितले.
पक्षाचे सचिव ऐवीतेवी तिथे येतच आहेत तेव्हा फॉर्म त्यांच्यासोबत दिले आहेत एवढाच निरोप त्यांना दिला होता. त्यांनी उत्साहाच्या भरात तसा उल्लेख केला हे आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो. आमचे नेतेच गतिमान असल्याने सर्वांनाच ‘गती’चे वेड लागले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही नकळत चूक झाली. नाशिक प्रवासासंदर्भातली वस्तुस्थिती तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सध्या रस्ता खराब असल्याने मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी आठ तास लागतात. कामाचा झपाटा राखायचा असेल तर हवाई व रेल्वेसेवेशिवाय पर्याय नाही. हे लक्षात घेऊनच सचिवांकडे फॉर्म दिला. केवळ त्यासाठी त्यांना पाठवण्यात आले नव्हते. नाशिक जिल्ह्यात दोनच जागा वाट्याला आल्या, त्यातील एका ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बंडखोरी केली. त्याला शह देण्यासाठी वेळेवर दिंडोरी व देवळालीसाठी फॉर्म पाठवायचे ठरले, म्हणून हेलिकॉप्टरचा वापर केला या चर्चेत तथ्य नाही.
महायुतीत असूनसुद्धा ‘आपण भले व आपले काम भले’ याच तत्त्वावर चालणारा आमचा पक्ष आहे याची नोंद कृपया घ्यावी. आमचे नेते शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर अधिक वेगाने नाशिकचा रस्ता गुळगुळीत करतील. पुढील निवडणुकीत हा प्रश्नच उद्भवणार नाही, याची हमी आम्ही देत आहोत. नाशिक हे रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. तिथे फॉर्मसाठी अशी ‘हनुमानउडी’ घेणे भारतीय परंपरेला अनुसरून आहे, असे आम्हाला वाटते. तसेही हेलिकॉप्टरने फॉर्म पाठवू नये असे कुठल्याही नियमावलीत नमूद नाही. त्यामुळे आपण आमच्या पक्षाला मान्यता देताना जसा ‘सहानुभूतीपूर्वक’ विचार केला तसाच या तक्रारीबाबत करून प्रकरण निरस्त करावे ही विनंती.’
सरचिटणीस, शिवसेना
(‘व्हायरल’ होऊ लागलेले हे पत्र ‘फेक’ असल्याचे नंतर उघड झाले आहे! )