शिरसाठ, गोगावले, सामंत व कदम सकाळी धावपळ करून ठाण्यातील साहेबांच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा एकही बूमधारी त्यांच्या घरासमोर नाही हे बघून चौघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. दिवाणखान्यात ‘जय महाराष्ट्र’चे सोपस्कार पार पडताच कदम नेहमीप्रमाणे तावातावात येत म्हणाले, ‘तुम्हाला काहीच गरज नव्हती त्या चॅनलवाल्यावर चिडण्याची. त्याचा बूम बाजूला सारण्याची. यामुळे तुम्ही अस्वस्थ झाले की इरेला जाता या शंकेला बळ मिळाले. याची चर्चा वाढली तर तुमचा प्रत्येक दौरा शंकेला वाव देणारा ठरेल. अहो, चिडण्याचे, रागावण्याचे काम माझे. तुम्ही कशाला ते अंगावर घेता? द्यायचे की उत्तर- येऊ द्या ठाकरे एकत्र आले तर. तुम्ही कसलेले राजकारणी आहात हे आम्ही सतत सांगत असतो व तुम्हीच त्यावर पाणी फिरवता.’ हे ऐकताच शिंदेंनी अस्वस्थ होत डोळे मिटले, पण बोलले काहीच नाहीत. मग शिरसाठ म्हणाले, ‘मला ठाऊक आहे चहुबाजूने आपली कोंडी केली जातेय. सध्या ग्रह फिरले असले तरी भविष्य उज्ज्वल आहे आपले. सोबतीला ठाकरे नसले म्हणून काय झाले? खरी सेना आपलीच. ते दोघे एकत्र येत असतील तर तिसरा ठाकरे शोधू युतीसाठी. जयदेवला विचारायचे का? कुणीतरी व्यासपीठावर असला तरी पुरे. बाकी सत्तेतून येणारी ताकद आहेच की आपली.’ यावर शिंदेंनी आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले, पण मौन सोडले नाही. मग थोडे सरसावून सामंत बोलू लागले.

‘देऊ द्या त्यांना एकमेकांना टाळी. ते कधीच एकत्र येणार नाहीत. समजा आलेच तर चिखल उडवायला आहेच की भक्तांची फौज. तरीही त्यांचा आलेख चढताना दिसला तर जाऊ एकदा परत दिल्लीच्या चाणक्यांकडे. आपल्याला जशी सुरुवातीला ‘ईडी’ची भीती दाखवली तशी त्या दोघांना पुन्हा एकदा दाखवा अशी गळ घालू. ऐकतील ते आपले. शेवटी या एकत्रीकरणाचा त्रास त्यांनाही होणारच आहे ना! मग आपण घाबरण्याचे कारण काय? तुम्ही आता अधिकृत सेनेचे प्रमुख आहात. असे अचानक चिडणे अजिबात शोभणारे नाही तुम्हाला. तुम्ही त्या लहान्याला गेल्या काही दिवसांपासून चुचकारत होतात. राजकारणात सर्वच फासे सरळ पडत नसतात. म्हणून काय इतका त्रागा करायचा?’ हा युक्तिवाद ऐकूनही शिंदे काहीच बोलले नाहीत. नाश्ता व चहा आणा असे खुणेनेच त्यांनी नोकराला सांगितले. साहेब फारच दुखावलेले आहेत हे लक्षात येताच मग गोगावले म्हणाले. ‘ते दोघे एकत्र आले तरी त्यांचे राजकारण घरातूनच चालणार. तुमच्यासारखा जमिनीवरचा नेता त्यांच्यापैकी कोणीच नाही. आपल्याला महाशक्तीचा आशीर्वाद आहे, चाणक्यांचे मार्गदर्शन मिळते आहे, याचा फायदा घेत त्यांच्या एकत्र येण्यात मोडता घालण्याचे काम तर आपण करूच शकतो. चिडण्यापेक्षा यावर विचार करायला हवा. सत्तेच्या ताकदीपुढे सारेच नमतात. हे दोघे कोण लागून गेले? यांनाही वठणीवर आणता येईल की! फक्त स्थानिक भाजपने यात काही गडबड करायला नको. आजकाल त्यांचा काही भरवसा देता येत नाही. या एकत्रीकरणाचा बागुलबुवा उभा करून आपल्याला त्यांच्यात विलीन करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सावध राहावे लागेल.’ तरीही शिंदे बोलेनात. मग चौघेही उठले. त्यांना सोडण्यासाठी ते बाहेर येताच एक बूमधारी समोर आला तसे शिंदे पुन्हा चिडले ‘ए काम की बात कर’ असे म्हणून आत गेले. हे बघून चौघांनीही कपाळावरचा घाम पुसत व भविष्याचा विचार करत मुंबईचा रस्ता धरला.