प्रिय नानाभाऊ, परवाच्या त्या पाय धुण्याच्या प्रकारानंतर तुमची सूचना मिळताच मी तातडीने बेपत्ता झालो व सध्या एका अज्ञातस्थळी लपून बसलोय. मीडियावाले मागे लागू नयेत म्हणून तुमच्याच सांगण्यावरून मी फोन बंद ठेवलाय. सोबतीला एक भावकीतला कार्यकर्ता आहे. त्याच्या फोनवरून मी खूप वेळा ट्राय केला पण ‘नेहमीप्रमाणे’ तुम्ही फोन उचलला नाही म्हणून हा लघुसंदेश पाठवत आहे. भाऊ, चिखलाने माखलेल्या तुमच्या पायावर पाणी टाकून मी कोणतीही चूक केली नाही. मोठय़ांचे पाय धुण्याची परंपरा आपल्याकडे आहेच. तुम्हाला चिखलाचा खूप तिटकारा, कारण की त्यातून कमळ उगवते. हे मी कुठेतरी वाचले होते म्हणून तुम्ही धू म्हणताच मी उत्स्फूर्तपणे पुढे झालो. तरीही भाजपवाले तुमच्याविरुद्ध आंदोलन करू लागलेत. त्यांनी माझ्या घरच्यांशी संपर्क साधून खूप आमिषे दाखवली. तो निरोप माझ्यापर्यंत पोहोचला पण मी त्याला बळी पडण्यास ठाम नकार दिला हे लक्षात असू द्या.

गावच्या चावडीवर नेहमी तुमच्या नावाची चर्चा होत असते. नानाभाऊ, खूपच नशीबवान आहेत. फारसे प्रयत्न न करताही त्यांना प्रत्येक निवडणुकीत यश मिळाले. अशा प्रत्येक चर्चेच्या वेळी ‘नाही नाही भाऊ मेहनती आहेत’ असा प्रतिवाद केला आहे. त्यामुळे व्हिडीओ मीच काढायला लावला अशी शंका असेल तर प्लीज काढून टाका. बाळापूरच्या ज्या वाडेगावात तुमची लाडूतुला होती, तिथलाच कुणीतरी कार्यकर्ता असेल. मी शेगावजवळच्या कालखेडचा. केवळ तुमच्या प्रेमापोटी त्या कार्यक्रमाला आलो. भक्तिरसाने न्हाऊन निघणाऱ्या माझ्या गावात पाय धुणे हे नित्याचेच. तुम्ही पक्षाला मिळवून दिलेल्या यशामुळे विरोधक बिथरले आहेत. ते संधी शोधत होते. या प्रकारामुळे त्यांना ती मिळाली. तुम्ही दिलेले उत्तरसुद्धा जोरदार टोला होता भाऊ. ‘हर घर नल’ ही योजना केवळ कागदावर आहे. आमच्या गावात ती नाही म्हणून मी पक्षातर्फे मोर्चा काढला होता. या घटनेनंतर माझ्या गावातल्या विरोधकांनी मला ‘पाय चाटय़ा’ ठरवून मीम्स फिरवले. पण मी विचलित झालो नाही. गावी परतल्यावर सर्वाना प्रत्युत्तर द्यायचे मी ठरवले आहे.

भाऊ, गावकीतली लढाई मी लढतो. काळजी करू नका. मी सच्चा कार्यकर्ता असल्याने पक्षात पद किंवा उमेदवारी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते याची कल्पना आहे. जो कुणी अध्यक्ष असतो तो आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी दैवतच असतो. हेच मी आता मीडियाला जाऊन सांगणार आहे. या पाद्यपूजेमुळे तुमच्यात व माझ्यात एक वेगळाच अनुबंध तयार झाला. तो अधिक वृिद्धगत करण्यासाठी मला जळगाव जामोदमधून पक्षाची उमेदवारी देण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, अशी नम्र विनंती आहे. असे झाले तर विरोधकांनी चालवलेल्या बदनामीच्या मोहिमेला योग्य प्रत्युत्तर मिळेल. केवळ या पाय धुण्याच्या बळावर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडे असलेली ही सीट मी काढून दाखवतो. पुन्हा कधी या भागात आले तर पाण्यात गंगाजल टाकून मी तुमचे पाय कॅमेऱ्यासमक्ष धुवेन. बस, एवढे करा भाऊ.