प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी ‘भिडू’ या शब्दाच्या वापरावरून व्यक्तिगत व प्रसिद्धीच्या हक्काचे उल्लंघन होत असल्याचा खटला काही दिवसांपूर्वी दाखल केला. त्यावर श्रॉफ यांच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने सरकारला दिलेल्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या ‘शब्द स्वामित्व हक्क आयोगा’चा पहिला कार्यपालन अहवाल जाहीर करताना अत्यानंद होत आहे. आयोगाकडे नोंदणीसाठी अल्पावधीत शेकडो अर्ज आले. त्यावर घेतलेल्या निर्णयानुसार आता या शब्दांवर फक्त आणि फक्त त्या अर्जदाराचीच मालकी असेल. इतर कुणालाही या शब्दांचा वापर सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मित्रों’ हा शब्द बहाल करून कामकाजाची सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी ‘मोहब्बत की दुकान’ या केवळ एकाच शब्दाची नोंदणी केली आहे. ‘पप्पू’ या शब्दासाठी चाळीस हजार (पैसे नाही) तर ‘जुमलेबाज’ साठी वीस हजार अर्ज आले. त्यामुळे हे दोन्ही शब्द सध्या ‘फ्रीज’ करण्यात आलेत. योगी आदित्यनाथ यांना ‘मिट्टी मे मिला देंगे’ या शब्दांचे हक्क देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी ‘मिंधे’ व ‘फडतूस’ अशा दोन शब्दांची मागणी केली होती. कोणताही एकच मिळेल असे सुनावणीदरम्यान स्पष्ट केल्यावर त्यांनी ‘मिंधे’वर पसंती दर्शवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांनी ‘दादा’ या शब्दासाठी अर्ज केला. त्यावर ४१ लोकांनी आक्षेप घेतला, पण त्याच्या पुष्टय़र्थ ते योग्य ते पुरावे देऊ न शकल्याने तो त्यांना बहाल करण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ‘पाहिजेल’ची मागणी केली ती तात्काळ मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ची मागणी केली. त्यावर दुसऱ्या गटाने घेतलेला आक्षेप फेटाळल्यानंतर त्यांना हा शब्द देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी ‘याठिकाणी’ची मागणी नोंदवली. भाषा वापरात याचा कुणीही वापर करू शकतो हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पण भविष्याचा वेध घेऊन ही मागणी केली या त्यांच्या उत्तरावर आयोगाचे समाधान झाले. कंगना रानौत यांनी ‘मंडी-क्वीन’ची मागणी केली, पण क्वीनच्या निर्मात्याने त्यावर आक्षेप घेतल्याने त्यांचा अर्ज सध्या प्रलंबित आहे. उत्तरेकडील लोकप्रिय नेते लालूप्रसाद यादव यांनी ‘हट्’ या शब्दाची मागणी केली. ती लगेच मंजूर झाली. अखिलेश यादवांनी ‘नेताजी’वर हक्क सांगितला. त्यावर अनेकांनी हरकत नोंदवली, पण वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हवा असे जोडनिवेदन त्यांनी दिल्याने तो मंजूर झाला. ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे’ची केलेली मागणी त्वरित मान्य करण्यात आली. शहाजीबापू पाटलांनी ‘काय झाडी, काय डोंगार, एकदम ओके’ एवढा मोठा शब्द मागितला. त्यातील ‘एकदम ओके’ वगळून त्यांचा अर्ज मंजूर झाला. स्वामी विवेकानंदाचे वंशज आम्हीच, असा दावा करत ‘बंधू आणि भगिनींनो’ यावर हक्क मागणाराही अर्ज दाखल झाला. त्यावर आयोगाने या वंशजांचे खरेपण तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. या प्रकटनाचे सर्व भारतीयांनी पालन करावे असे आवाहन आयोग करीत आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma violation of right to privacy and publicity by famous actor jackie shroff for using the word bhidu amy