‘प्रिय वाचकहो, मी रॉबर्ट कियोसाकी, तुम्ही सर्वानी डोक्यावर घेतलेल्या ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या पुस्तकाचा लेखक. गेल्या आठवडय़ात मी केलेल्या एका वक्तव्यामुळे तुम्ही सारे व्यथित व संतप्त झाले आहात याची कल्पना मला आलेली आहे. माझ्यावर असलेले अब्जावधी डॉलर्सचे कर्ज जाहीर केल्यामुळे तुमच्या मनात उडालेला गोंधळ मी समजू शकतो. जगभरातील वाचकांना श्रीमंत होण्याचे धडे देणारा स्वत:च कर्जबाजारी कसा असा प्रश्न लाखो लोकांनी मला या काळात विचारला. ‘तुमचे पुस्तक वाचून श्रीमंत होण्याच्या नादात आम्ही हजारो डॉलर्सचे कर्ज काढले व शेवटी दिवाळखोर झालो. नियोजन करताना आमचेच काहीतरी चुकले असेल असे समजून गप्प बसलो पण तुम्हीच कर्जबाजारी असल्याचे कळल्यावर फसवणूक झाल्यासारखे वाटले’ अशा आशयाचेही हजारो मेल मला मिळाले. काहींना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी कळवले. काहींनी माझ्या पुस्तकाच्या प्रती जाळल्या. एका वाचकाने तर पूर्ण पुस्तकाचे तुकडे तुकडे करून डब्यात भरून पार्सल पाठवले. काहींनी देवघरातील हे पुस्तक कचराकुंडीत टाकत असल्याच्या चित्रफिती पाठवल्या. ‘तुझी जागा नरकात’ अशा शिव्याशाप देणारे मेलही भरपूर आले.
आयुष्यात कधी तुमचे भले होणार नाही असा त्रागा अनेकांनी केला. मला फार स्पष्टीकरण द्यायचे नाही हे सारे घडले ते माझे वक्तव्य नीट न वाचल्यामुळे. त्यात भर पडली ती समाजमाध्यमावर बातमीला ट्विस्ट करण्याची वृत्ती फोफावल्यामुळे व त्यावर लागलीच विश्वास ठेवण्याच्या वृत्तीमुळे. माझी एकूण संपत्ती किती व कर्ज किती याकडे बारकाईने न बघितल्यामुळे. जगभरात यशस्वी होण्यासाठी सल्ले देण्याची परंपरा फार प्राचीन आहे. त्याचे पालन मी केले. त्याचा स्वीकार करताना कोणती काळजी घ्यायची याकडे तुम्ही दुर्लक्ष केले. तरीही मी तुम्हाला दोष देणार नाही. या वक्तव्यामुळे माझ्या पुस्तकाची विक्री कमालीची मंदावली. त्याचा मोठा फटका प्रकाशकांना रोज बसतोय. म्हणून मी आता जगभरात विकली गेलेली चार कोटी पुस्तके पुन्हा तुमच्याकडून विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. परत येणारी पुस्तके रस्त्यावरून घेतलेली नसावीत, त्यांची जी काही प्रत तुम्ही पाठवाल ती अधिकृत प्रत असावी, एवढीच माझी अपेक्षा! पुस्तकाची किंमत व ती परत पाठवण्याचा खर्च तुम्हाला देण्यात येईल असे वचन मी जाहीरपणे देत आहे. एक सहनशील उद्यमी व वाचकांप्रती जबाबदार असलेला लेखक म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. याचे तुम्ही स्वागत कराल अशी आशा. धन्यवाद’
हे जाहीर निवेदन समाजमाध्यमावर पोस्ट करून कियोसाकी खुर्चीतून उठले. दिवाणखान्यात थोडा वेळ येरझारा घातल्यावर त्यांनी एका मोठय़ा बँकेच्या प्रमुखाला फोन केला व स्वत:चीच पुस्तके परत विकत घेण्यासाठी एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली. केवळ अध्र्या तासात बँकेने ते मंजूर केले. हे कळताच ‘कर्ज म्हणजे पैसा’ असे म्हणत आनंदी झालेल्या कियोसाकींच्या डोक्यात नव्या पुस्तकाची योजना आकार घेऊ लागली!!