गँगस्टर संतोष ऊर्फ काला जठेडीने मंडोली कारागृहाच्या बाहेर पाऊल टाकताच उभ्या असलेल्या गँगस्टर अनुराधा चौधरी ऊर्फ मॅडम मिंजने त्याला घट्ट मिठी मारली तसे त्याच्याभोवती गराडा घातलेले पोलीस मागे सरकले. नेमक्या त्याच संधीचा फायदा घेत अनुराधाने ओढणीआड लपवलेले रशियन बनावटीचे पिस्तूल हळूच कालाच्या खिशात टाकले. नंतर सुरक्षेच्या गराड्यात त्यांचे वाहन द्वारकेच्या दिशेने धावू लागले तशी नियोजित वधू उद्गारली. ‘सारी तय्यारी हो चुकी है’ हे वाक्य ऐकताच पोलिसांचे कान टवकारले. हे लक्षात येताच संतोष आश्वस्त सुरात म्हणाला ‘काळजी करू नका. आमच्या सुरक्षेची काळजी आम्हीच घेऊ. काहीही होणार नाही. न्यायालयाने विवाहाला परवानगी देताना सांगितल्याप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून सारे पार पडेल. तुम्ही फक्त तुमच्या बक्षिसापुरते बघा’ हे ऐकताच पोलीस बंदुका बाजूला ठेवत निर्धास्त होत खिडकीतून बाहेर बघू लागले. तीच संधी साधून वरवधूची कुजबूज सुरू झाली.
हेही वाचा >>> चतु:सूत्र : संविधानातील ‘लापता लेडीज’
लग्नासाठी मिळालेल्या सहा तासांत प्रतिस्पर्धी टोळ्या आपल्याला टपकवण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मंडपात सुरक्षेचे एकूण चार स्तर ठेवण्यात आले आहेत. विरोधक वेश बदलून येतील ही भीती लक्षात घेऊन साऱ्या सहकाऱ्यांना त्यांची मूळ व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तयार केलेली वेशांतरीत छायाचित्रे पाठवण्यात आली आहेत. लग्न लागल्यावर कुणीही ‘जॉय फायरिंग’ करायची नाही अशी ताकीद दिली आहे. कायदेशीररित्या हजेरी लावू शकणाऱ्या दोन्ही टोळ्यांतील प्रत्येकाला जामिनाचा आदेश खिशात असू द्या, असे सांगितले आहे. लग्नाला हरियाणा व राजस्थानमधील दोन मोठ्या ‘लॉ फर्म’चे दहा वकील हजर असतील. त्यांची लाखोंची फी आधीच अदा करण्यात आली आहे. पोलिसांनी मंजूर केलेल्या वऱ्हाड्यांच्या यादीत आपली १०० माणसे वेगवेगळ्या नावाने घुसवलीत. त्यातले ५० आपल्या कुटुंबाच्या मागेपुढे असतील. आपल्याला नियमित खंडणी देणाऱ्या व या लग्नासाठी मदत करणाऱ्या २५ मान्यवरांना ‘आना ही पडेगा, नही तो…’ म्हणून निमंत्रित केले आहे. स्कॅनिंग मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे हाताळणाऱ्या पोलिसांच्या घरी आधीच बक्षीस पोहोचले आहे. लग्नानंतर नृत्यांगना सपनाचा डान्स ठेवला असून त्यात आपल्या सहकाऱ्यांनी नाचून गोंधळ करू नये म्हणून ‘सत्या’मधले ‘सपने मे मिलता है’ हे गाणे अजिबात वाजवायचे नाही अशी सक्त सूचना दिली आहे. लग्न लावणारा पंडित पोलिसांनी निवडला असला तरी काही ‘गेम’ होऊ नये म्हणून त्याच्यावर २४ तास पाळत ठेवण्यात आली आहे. एवढे करूनही काही दगाफटका झालाच तर बिनधास्त शस्त्रे चालवा असेही साऱ्यांना सांगून ठेवले. तेवढ्यात विवाहस्थळ आले तसे दोघांचे बोलणे थांबले. ते खाली उतरले तेव्हा हजर असलेल्या साऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. आपले सारे सहकारी सूटाबुटात व स्वच्छ दाढी केलेले बघून त्यांना खूप नवल वाटले. सप्तपदीसाठी दोघे विवाहवेदीवर येताच पंडितजीने विधी सुरू केले तसा मंडपात एकाचवेळी पिस्तुलांचे चाप ओढल्याचा आवाज झाला. तो ऐकून सारेच थबकले. मग काहीच झाले नाही अशा थाटात फेऱ्यानंतर दोघांनी एकमेकांना हार घातले. नेमके तेव्हाच मंडपापासून २०० मीटरवर आकाशात गोळ्या झाडल्याचा आवाज आलाच. त्याकडे कुणी लक्ष देऊ नये म्हणून उपस्थित साऱ्यांनी ‘दयाळू भारतीय न्यायव्यवस्थेचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा सुरू केल्या. त्या ऐकून पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.