‘तसे आपण सारेच निरुपद्रवी. जगण्यासाठी आवश्यक असेल तेवढेच रक्त पितो एवढाच काय तो आपला दोष. त्यावरून रक्तपिपासू ही पदवी कायमची चिकटलेली. हे एक सोडले तर कुणाच्या अध्यात ना मध्यात असेच सर्वांचे वर्तन. तरीही सध्याच्या राजकीय साठमारीत आपला उल्लेख व्हावा हे अन्यायकारक. तोही स्वत:ला प्राणीप्रेमी म्हणवून घेणाऱ्या उद्धवरावांनी करावा हे जास्तच वेदनादायी. त्यामुळे याचा निषेध व्हायलाच हवा’ आकाशवाणीजवळच्या आमदार निवासात उत्तररात्री भरलेल्या सभेत एक मोठ्या आकाराचा ढेकूण हे बोलताच उपस्थित साऱ्यांनी ‘वळवळ’ करून त्याला दुजोरा दिला. त्यामुळे उत्साह वाढलेल्या ढेकणाने पुण्याच्या सभेत काय घडले ते सर्वांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: यामिनी कृष्णमूर्ती

‘काय गरज होती त्यांना आपला उल्लेख करण्याची? विरोधकांना नावे ठेवायची एवढीच हौस असेल तर इतिहासातले नवीन गनिम शोधायचे. त्यांची नावे आठवली नाहीत म्हणून आपला ‘उद्धार’ करण्याची गरज काय? अलीकडे माणसे टापटीप राहू लागली, स्वच्छतेचा सोस पाळू लागली म्हणून तसाही आपला अधिवास कमी झाला आहे. मुंबईतील ‘मनोरा’ व ‘मॅजेस्टिक’ ही आमदारांची निवासस्थाने कधीकाळी हक्काच्या जागा होत्या. तिथे पोटाला अन्नही सकस मिळायचे. त्याही गमवाव्या लागल्या. एकूणच जगण्याची कोंडी झाली असताना व सारेच नवनव्या जागेसाठी धडपडत असताना या कारणावरून आपण चर्चेत येणे वाईटच. आणि पुढे म्हणाले काय तर अंगठ्याने चिरडून टाकू. वा रे वा! काही भूतदया शिल्लक आहे की नाही या महाराष्ट्रात. नखाएवढे असलो म्हणून काय झाले? म्हणून जीव घेणार का हे आपला? काहीही झाले तरी सजीव आहोत आपण. निसर्गचक्राच्या संतुलनात लहानसा का होईना पण वाटा आहे आपला. मग का म्हणून अशी हिंसक भाषा सहन करायची? ‘जेवढे दुर्लक्षित असू तेवढे सुखी’ हीच आजवर आपल्या जगण्याची व्याख्या राहिलेली. ती ठाऊक नाही वाटते यांना.

हेही वाचा >>> संविधानभान: राष्ट्रपतींचे स्थानमाहात्म्य

प्राण्यांना वेठीस धरणारी ही भाषिक हिंसा राज्याच्या पुरोगामी परंपरेला शोभणारी नाही हे कुणी तरी त्या उद्धवरावांना सांगितले पाहिजे. ‘येथ सरण आलियासी कासया मरण’ असे म्हणत शरण येणाऱ्या प्राण्यांची शिकार करू देणार नाही असे सांगणाऱ्या चक्रधरस्वामींचा हा महाराष्ट्र आहे. म्हणूनच तो आपणा सर्वांना सुरक्षित वाटत आला. हा इतिहास ठाऊक नसेल त्यांना? की या उल्लेखाच्या निमित्ताने आपणही शरण जावे असे वाटते की काय त्यांना! तसे न करता एकी दाखवून देण्याची हीच वेळ आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो! या राज्यातच नाही तर देशात राजकीय वैर जोपासताना प्राणिमात्राची उपमा द्यायची नाही, असा कायदा असायला हवा. नवनवे कायदे करण्याची हौस असलेल्या केंद्रातल्या सरकारकडे आपण तशी मागणी करायला हवी. तेव्हाच अशी ऊठसूट उपमा देणाऱ्यांना जरब बसेल. आणि याच कायद्यात रक्तपिपासू संबोधण्यावरही बंदीचा उल्लेख हवा. आपल्यापेक्षा माणूस जास्त रक्तपिपासू झालाय हे सोदाहरण सिद्ध करू शकतो आपण. हे तर दिल्लीत जाऊन करूच पण त्याआधी आपले उपद्रवमूल्य सिद्ध करण्याची नामी संधी चालून आली आहे. तेव्हा मी साऱ्यांना ‘चलो मातोश्री’चा आदेश देत आहे.’ भाषण संपताच सारे ढेकूण वांर्द्याच्या दिशेने तुरुतुरु चालू लागले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chasma loksatta satire article uddhav thackeray called fadnavis a bedbug zws
Show comments