‘२०१४ पूर्वी काही घडलेच नाही हे पटवून देण्यासाठी यांना परिवाराने खासगी वितरणासाठी तयार केलेला इतिहास वाचायला द्यायची काय गरज होती? नेहरूंना खुजे ठरवण्यासाठी सरदार पटेल व सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीत तुम्ही ज्या कथा (भाकड नाही) तयार केल्या त्या खऱ्या समजून या लोकांना सांगत सुटल्या आहेत. बोस देशाचे पहिले पंतप्रधान व पटेलांना इंग्रजी येत नव्हते म्हणून ते या पदावर आले नाहीत हा यांचा युक्तिवाद याच कथांचा भाग. यामुळे यांच्या डोक्यात मोठा ‘केमिकल लोच्या’ झालाय.’ नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे मानसिक संतुलन ठीक राहावे म्हणून पक्षाच्या मुख्यालयात तयार करण्यात आलेल्या मानसोपचार कक्षातील तज्ज्ञ गंभीरपणे बोलत होते व त्यांच्यासमोर कंगनाला घेऊन आलेले पदाधिकारी ते निमूटपणे ऐकत होते. कंगना मात्र ‘व्हॉट्सअॅप विद्यापीठ व इतिहास’ हे नवेकोरे पुस्तक चाळण्यात व्यग्र होती.
‘यांच्या वक्तव्यामुळे यांचीच प्रतिमा मलीन होतेय, आता काय करायचे’ असे एका पदाधिकाऱ्याने विचारताच डॉक्टर म्हणाले ‘यांची संपूर्ण ‘हिस्ट्री’ मी तपासली. यांना आरंभापासूनच इतिहासात रमण्याची सवय आहे, पण त्यासाठीचा अभ्यास यांच्याकडे नाही. तुमच्या इतिहासाने (कथित नाही) यांची ही सवय वृिद्धगत होण्यास हातभार लागला. २०१४ नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व विश्वगुरूंच्या नेतृत्वात देश स्वयंसिद्धतकेडे वाटचाल करू लागला इथपासूनच यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात करायला हवी होती. त्यांना अजिबात ठाऊक नसलेला जुना (तुम्ही तयार केलेला) इतिहास सांगायची काही गरज नव्हती. या अभिनेत्री वगैरेंना मजकूर पाठ करायची सवय असते. मग कुठेही कॅमेरा ऑन झाला की त्या बेधडक बोलू लागतात हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे होते. या सृष्टीतले लोक नेत्यांसारखे लवचीक नसतात. केलेल्या विधानाच्या समर्थनार्थ ते तुम्ही वाचण्यासाठी दिलेल्या कागदांनाच पुरावे म्हणून सादर करू शकतात. यामुळे पंचाईत होईल हे तुम्ही ध्यानात घेतलेले दिसत नाही. या लोकांना आवरणेसुद्धा कठीण असते. या अशाच सुसाट सुटल्या तर भविष्यात स्वत:ला स्वयंघोषित पंतप्रधान (बोसांप्रमाणे) म्हणून जाहीर करायलासुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत.’ हे ऐकताच कक्षातील सर्वानाच घाम फुटला, कंगना सोडून. ती शांतपणे ‘एक्स’वर मग्न होती व स्वत:शीच हसत होती.
मग दुसरा पदाधिकारी विचारता झाला ‘आता कसे? यांच्या डोक्यातील २०१४ पूर्वीच्या साऱ्या घडामोडी पुसून टाकण्यासाठी काही औषधे असतील तर द्या, नाही तर नव्या सभागृहात या आणखी अडचणी निर्माण करतील’ यावर डॉक्टर हसले व म्हणाले ‘औषधे आहेत. ती देतोच मी पण त्यामुळे आधीचा व १४ नंतरचा सर्व इतिहासविचार पुसला जाईल. नंतर तुम्हाला पुन्हा यांची शिकवणी घ्यावी लागेल, फक्त हे उपचार सुरू असताना त्यांना थंड प्रदेशात ठेवू नका. उष्ण ठिकाणी ठेवा व रोज तीन तास डोके उन्हात राहील याची काळजी घ्या आणि भविष्यात प्रवेशासाठी माणसे निवडताना तुम्ही ठरवलेले अज्ञानाविषयीचे (मूर्खता नाही) निकष जरा बदला.’ हे ऐकून सारेच हसले, फक्त कंगना सोडून. ती तिच्याच विश्वात मग्न होती..