प्रत्येक कलाकाराची जगण्याची प्रेरणा भिन्न असते. कोणाला अभिनयात, कोणाला संगीतात जगण्याचा सूर सापडतो. म्हसवे गावातून आलेल्या आनंद म्हसवेकर यांना साहित्यात आपले जगणे सापडले होते. त्यातही नाट्यलेखनाने ते अधिक झपाटले. मी कोण आहे, माझी जात कोणती, हे विचारू नका. माझ्या लेखणीतून जन्माला येणारा कथाविषय, त्यातून उमटणारे विचार लक्षात घ्या, हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे गाव सोडताना त्यांनी आपले मूळ नाव न लावता गावाचे नाव जोडले आणि मुंबईत येऊन शिक्षण घेता घेता जाणीवपूर्वक आपल्यातील लेखक घडवला, फुलवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मूळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावचे रहिवासी असलेले आनंद म्हसवेकर शिक्षणानिमित्त मुंबईत आले. मुंबई विद्यापीठातून बी.कॉम. आणि एम.ए.ची पदवी, त्यानंतर १९७९ ते २००० सालापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियामधली नोकरी केल्यानंतर ते पूर्णवेळ लेखक म्हणून काम करू लागले. मात्र, शालेय जीवनापासूनच त्यांनी लिखाण, वाचनाची आवड जोपासली. विविध नाटकांच्या संहिता, दिग्गज साहित्यिकांची नावाजलेली पुस्तके, थोरामोठ्यांची चरित्रे वाचण्यावर त्यांनी अधिक भर दिला. संघर्षातून वर आलेल्यांच्या जीवनकथा वाचल्याने अधिक प्रेरणा मिळते, ही त्यांची धारणा होती. ते स्वत: तळागाळातून वर आले होते त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे, त्यांचा संघर्ष याची त्यांना चांगली जाण होती. रोजच्या जगण्यातून आलेले हेच अनुभव सुरुवातीला त्यांच्या एकांकिका लेखनातही उतरले. त्यांनी ४२ एकांकिकांचे लेखन केले होते.

सतत वाचन आणि लेखन करणे हा त्यांचा ध्यास होता. १५ व्यावसायिक नाटके, १४ चित्रपट, १२ मालिका आणि ५ कवितासंग्रह इतके विपुल आणि विविधांगी लेखन त्यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ आणि ‘चार दिवस सासूचे’ या मालिका दीर्घकाळ चालल्या. ‘यू टर्न’ हे त्यांचे नाटकही प्रचंड गाजले. या नाटकाचे बाराशेहून अधिक प्रयोग झाले. ‘ह्याचं हे असंच असतं’, ‘सासू नंबर वन’, ‘असे नवरे अशा बायका’, ‘असे पाहुणे येती’, ‘रेशीमगाठी’, ‘चॉइस इज युवर्स’, ‘बायको माझी लय भारी’ अशा त्यांच्या नाटकांवर नजर टाकली तरी विषय आपल्या रोजच्या जगण्यातील होते मात्र, त्यांची मांडणी करतानाही त्यांचा वेगळा दृष्टिकोन रसिकांना अधिक भावला.

‘असा मी काय गुन्हा केला’, ‘भरत आला परत’, ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘साद’, ‘तृषार्त’, ‘झेंटलमन’ आदी चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले होते. म्हसवेकर यांनी ‘असा मी काय गुन्हा केला’ आणि ‘आम्ही बोलतो मराठी’ या चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केले. शेवटच्या श्वासापर्यंत वाचत राहीन म्हणणारा हा कविमनाचा लेखक शेवटपर्यंत लिहिता राहिला. त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते यूएसए’ या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार होते, मात्र त्याआधीच त्यांचा इहलोकाचा प्रवास संपला.