नियोजन, अचूकता आणि प्रावीण्य यांचे महत्त्व भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल रणजितसिंह बेदी (निवृत्त) यांना चांगलेच ज्ञात होते. ‘दुसऱ्या संधी’वर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही; त्यामुळे सहकाऱ्याच्या विमानाची धडक बसल्यानंतरही जमिनीवर कोसळण्याच्या बेतात असणाऱ्या आपल्या ‘मिग २१’चे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नियंत्रण गमावले नाही! विलक्षण कसब दाखवत अपघातग्रस्त विमान चंडीगढ हवाई तळावर आणले. १९७० मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळय़ाच्या मानवंदना उड्डाणातील (फ्लायपास्ट) रंगीत तालमीत ही घटना घडली होती. शौर्य व हवाई कौशल्य दाखविणारे एअर मार्शल रणजितसिंह बेदी यांचे नुकतेच निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. राजपथावर हिऱ्याच्या आकारात (डायमंड फॉर्मेशनमध्ये) मिग २१ विमाने मार्गक्रमण करीत असताना हा अपघात झाला होता. या फॉर्मेशनचे नेतृत्व बेदी यांच्याकडे होते. प्रचंड ताणतणाव, दबाव असताना शांत, धीरोदात्तपणे कार्यरत राहण्याचा आदर्श त्यांनी वैमानिकांसमोर ठेवला. याबद्दल त्यांना वायू सेना पदकाने सन्मानित करण्यात आले. भारत-पाकिस्तानच्या १९६५ आणि १९७१ मधील युद्धात त्यांचा सहभाग होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअर मार्शल बेदी हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या नवव्या शिक्षणक्रमाचे विद्यार्थी. १९५६ मध्ये त्यांना वैमानिक शिक्षणक्रमातून हवाई दल प्रबोधिनीत नियुक्ती मिळाली. लढाऊ विमानासाठी निवड झाली. डी. हॅविलँँड, हॉकर हंटर, मिग २१ आदी विमानांचे त्यांनी सारथ्य केले. हवाई दलाच्या पहिला एरोबिक्स संघ स्थापनेपासून ते जुन्या विमानांवर कार्यरत वैमानिकांना मिग २१ विमान संचलनासाठी तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. अल्फा तुकडीचे विभागीय अधिकारी म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जबाबदारी सांभाळली. १९६५ च्या युद्धात हवाई गस्त व फ्लाइट कमांडरची धुरा सांभाळणाऱ्या बेदी यांनी १९७१ च्या युद्धात ‘एस्कॉर्ट’ म्हणून तसेच गस्तमोहिमांसाठी उड्डाण केले. िवग कमांडर या पदोन्नतीवर त्यांची २७ स्क्वाड्रनचे कमांडिंग अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. टॅक्टिकल एअर कमांड, प्रमुख कार्यवाही अधिकारी, कमांडिंग हवाई अधिकारी या पदोन्नतींनंतर त्यांनी हवाई दलाच्या पश्चिम मुख्यालयात प्रभारी वरिष्ठ अधिकारी (प्रशासन) आणि एअर मार्शल म्हणून पूर्वेकडील एअर कमांडचे वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले. त्यांची दलातील अखेरची नियुक्ती महासंचालक (संरक्षण कर्मचारी नियोजन) म्हणून झाली होती. ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नोव्हेंबर १९९३ मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर चंडीगढमध्ये स्थायिक होऊन तेथील महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते! संरक्षण व सामरिकशास्त्र विषयांवर विपुल लेखन केले. ‘रॅण्डम थॉट्स : नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅण्ड करंट इश्यूज’ हे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. सामाजिक कार्यासह हवाई दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते धडपडत राहिले.