राज्याच्या ४७व्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती झाल्याने सीताराम कुंटे यांच्यानंतर महाराष्ट्रातील अधिकाऱ्याला हे पद भूषविण्याची संधी मिळाली आहे. नगर जिल्ह्यातील लोणी गावचे करीर हे मूळ पंजाबी असले, तरी त्यांचे पूर्वज वर्षांनुवर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण केलल्या करीर यांना ३५ वर्षांच्या सेवेत सांगली जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, विक्रीकर आयुक्त, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, नगरविकास, महसूल व वित्त सचिव अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. सांगली जिल्हाधिकारीपदी असताना प्रौढ साक्षरतेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाबद्दल देशातील सर्वोत्कृष्ट जिल्ह्याला देण्यात येणारा ‘सत्येन मित्रा पुरस्कार’ प्राप्त झाला होता. ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना सामाजिक विकास क्षेत्रातील राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार पुणे जिल्ह्याला मिळाला होता. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक या पदावर चार वर्षे काम करताना त्यांनी केलेल्या बदलांची देशभर दखल घेतली गेली होती. जमीन नोंदणीत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या प्रक्रियेच्या संगणीकरणाचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले. जमीन नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली. महाराष्ट्राने ई-गव्र्हनन्समध्ये केलेल्या बदलांचा अन्य राज्यांनी स्वीकार केला होता. या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ई-गव्र्हनन्स पुरस्कार प्राप्त झाला होता. विक्रीकर आयुक्तपदी असताना राबविण्यात आलेल्या ई-गव्र्हनन्स उपक्रमाबद्दल त्यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला होता.
पुणे महापालिका आयुक्त असताना इमारतींच्या बांधकाम परवानगीचे आराखडे मंजूर करण्यासाठी राबविलेल्या स्वयंचलित संगणकीय प्रणालीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली होती. महसूल खात्याचे सचिव असताना त्यांनी घरांची नोंदणी ऑनलाईन करण्याबरोबरच जमीन नोंदणीत अधिक सुटसुटीतपणा आणण्यावर भर दिला. कामे जलद मार्गी लागावीत यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. सनदी अधिकाऱ्याने लोकाभिमुख असावे, अशी अपेक्षा असते. पण बहुतेक अधिकाऱ्यांना फाइलींच्या बाहेर पडण्यास उसंतच मिळत नाही. करीर हे त्याला अपवाद होते. कला, साहित्य क्षेत्राचा अभ्यास असतानाच राज्याच्या विविध भागांमध्ये भरणाऱ्या जत्रा, उरूस यांची माहिती संकलित करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी सायकलवरून मुंबई पालथी घालून त्यांनी शहराविषयी विविध निरीक्षणे नोंदविली. याचा त्यांना निर्णय प्रक्रियेत उपयोग झाला. विविध पदांवर ठसा उमटविणाऱ्या अधिकाऱ्याकडून प्रशासनाचे प्रमुख या नात्याने प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.