‘हिप्पीं’नी भारतात येणे ही १९६५ नंतरच्या काळात नित्याची बाब ठरली; पण त्याआधीच – सन १९५९ मध्ये वयाच्या पंचविशीत स्कॉटलंडहून विल्यम (ऊर्फ बिल) लिआम मॅकके एटकेन हा तरुण खिशात अवघे ५० पौंड घेऊन निघाला आणि भारतात आला. इथेच राहून, १९७२ मध्ये भारतीय नागरिकत्वही मिळवून हिमालयाबद्दलची तसेच भारताच्या आध्यात्मिक परंपरांचा ठाव घेणारी डझनभर पुस्तके या बिल एटकेन यांनी लिहिली आणि १७ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. भारतात झालेला त्यांचा जीवनप्रवास सांगणारे अखेरचे पुस्तक तयार असूनही, त्यांच्या इच्छेनुसार ते अप्रकाशितच राहील. बिल यांनी भारतात येण्याचे कारण आध्यात्मिकच, पण लीड्स विद्यापीठातून ‘तौलनिक धर्म-अभ्यास’ या विषयात पदवी घेताना महात्मा गांधींच्या आध्यात्मिक कल्पनांबद्दलचा विशेष अभ्यास, कठोपनिषदावरील भाष्याचे वाचन, यांमधून भारताबद्दलची एटकेन यांची जाण निश्चितपणे वाढली होती. पहिला मुक्काम त्यांनी कोलकात्यात (तेव्हाचे कलकत्ता) केला. जवळचे ५० पौंड – म्हणजे त्या वेळच्या विनिमयदरानुसार सुमारे ६६७ रुपये – संपले आणि परतीच्या प्रवासासाठी तिथल्या एका हिंदी शाळेत इंग्रजी शिक्षक म्हणून काम मिळवावे लागले. कोलकात्यालाच त्यांनी ठरवले- इथून कौसानीला सरलाबहन किंवा मित्रोला इथे गुरू कृष्णप्रेम यांचा आश्रम आहे तिथे जायचे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन कॅथरीन मेरी हाइलमान भारतात आल्या आणि सरलाबहन झाल्या; तर पहिल्या महायुद्धात लढलेले रोनाल्ड हेन्री निक्सन हे पुढे लखनऊ विद्यापीठात शिकवण्यासाठी आले आणि कृष्णभक्तीतून वैष्णवपंथाकडे वळले. या दोघांच्याही आश्रमांत एकंदर सुमारे आठ वर्षे बिल एटकेन राहिले.

मग जिन्द या भूतपूर्व संस्थानाच्या महाराणींकडे सेक्रेटरी म्हणून ते राहिले, तेव्हा बरीच वर्षे त्यांचा मुक्काम दिल्लीतही झाला. पण कौसानीच्या आश्रमात असतानाच ‘नंदादेवी’ या शिखराने त्यांना वेड लावले होते… पार्वतीचा अवतार मानल्या जाणाऱ्या या शिखराबद्दलच्या आध्यात्मिक आणि साहसी कथांचा धांडोळा त्यांच्या ‘द नंदादेवी अफेअर’ या पुस्तकात आहे. त्याआधी, तसेच पुढे वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतरही नंदादेवी शिखराचे दर्शन आणि चिंतन हा क्रम त्यांनी सोडला नाही. नंदादेवी शिखरातूनच आध्यात्मिक ऊर्जा मिळवू पाहाणारे बिल एटकेन, इतर आध्यात्मिक परंपरांचा शोध घेताना प्रसंगी श्रद्धांचीही तपासणी करत. त्यामुळे स्वत:ची ओळख अध्यात्मवादी लेखक अशी न सांगता ‘प्रवासलेखक’ अशीच ते सांगत. मात्र ‘बाकीचे लेखक हे आधी लेखक आणि मग प्रवासी असतात- मी तसा नसून आधी प्रवासी आणि मग लेखक आहे’ अशा शब्दांत, लिखाणापेक्षा प्रवासच आपण महत्त्वाचा मानतो, असे ते आवर्जून सांगत. कशासाठी फिरायचे हे ठरवूनच मी फिरतो, नोंदीही करतो, पण हे असे बऱ्याचदा केल्यानंतरच मी लिहितो- असे स्वत:च्या लेखनपद्धतीचे वर्णन त्यांनी एका मुलाखतीत केले होते. या पद्धतीमुळे काळ जणू गळून पडतो आणि प्रवास चिरंतन भासू लागतो, ही किमया ‘सेव्हन सॅक्रेड रिव्हर्स’ किंवा ‘फूटलूज इन द हिमालयाज’ या त्यांच्या पुस्तकांमध्ये पुरेपूर उतरली आहे. यापैकी सात नद्यांबद्दलचे पुस्तक विशेष गाजले. एटकेन यांच्या निधनाने केवळ एक प्रवासलेखकच नव्हे, तर भारतीय अध्यात्माचा डोळस अभ्यासकही आपण गमावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.