जगात एवढय़ा भाषा, त्यात लिहिणारे इतके लेखक, रोज कुठेतरी कुणाला तरी पुरस्कार मिळणार, कुणाचे तरी देहावसान होणार ही जगरहाटीच आहे. असे असताना तिकडे दूर इंग्लंडमध्ये एक लेखिका शंभरेक पुस्तकांचा ऐवज मागे ठेवून वयाच्या ९४ वर्षी मरण पावते याचे तसे आपल्याला काही असायचे कारण नाही. पण तरीही लिन रेड बँक या ब्रिटिश लेखिकेच्या मृत्यूची दखल घ्यावीच लागते ती त्यांच्या एका कादंबरीमुळे.
लिन मुख्यत: प्रसिद्ध होत्या त्या लहान मुलांसाठी त्यांनी केलेल्या लिखाणासाठी. जे. के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटरने मुलांसाठी जादूई विश्व उघडून दिले असे म्हटले जात असले तरी लिन यांनी त्याच्या कितीतरी आधी मुलांना या जादूई, कल्पनारम्य विश्वाची सफर घडवून आणली होती ती त्यांच्या द रिटर्न ऑफ द इंडियन; द सिक्रेट ऑफ द इंडियन; द मिस्ट्री ऑफ द कबर्ड; आणि द की टू द इंडियन या चार भागांच्या कादंबरी मालिकेमधून.
१९८५ ते १९९८ या १३ वर्षांच्या कालावधीत आलेली, त्यांची ही कादंबरी मालिका बेस्ट सेलर ठरली. ती वेगवेगळय़ा २० भाषांमध्ये अनुवादित झाली. तिच्या त्या काळात दीड कोटी प्रती विकल्या गेल्या. तिच्यावर पुढे चित्रपटही निघाला. त्यांच्या लहान मुलासाठी त्यांनी लिहिलेली ही चार पुस्तके जगातल्या अनेक मुलांच्या कल्पनाविश्वाचा भाग झाली.
ओम्नी नावाचा एक लहान मुलगा आणि त्याचे मित्र यांच्या भावविश्वात ही कादंबरी घडते. ओम्नी रोज रात्री त्याची खेळणी कपाटात बंद करून ठेवतो, तेव्हा त्यानंतर ती जिवंत होतात. त्या खेळण्यांमध्ये एक भारतीय खेळणेही असते आणि या खेळण्याकडे जादूई शक्ती असते, असा तो भारतीय संदर्भ आहे.
अर्थात लिन रेड एकपुस्तकी लेखिका नव्हत्या. द इंडियन इन द कबर्ड लिहिण्याआधी १९६० मध्ये त्यांनी एल शेप्ड रुम ही कादंबरी लिहिली होती. ती देखील त्या काळात बेस्ट सेलर ठरली होती आणि तिच्यावरही लगेचच एकामागून एक असे दोन चित्रपट निघाले होते. एवढं यश मिळवणाऱ्या लिन यांच्या व्यक्तित्वाला अनेक पैलू होते. शालेय जीवनात त्या नाटकात काम करत. नंतर त्या टेलिव्हिजन पत्रकार म्हणून काम करायला लागल्या. नंतर त्या शिक्षिकेचं काम करण्यासाठी इस्रायलला गेल्या. तिथल्या वास्तव्यात त्यांनी एका शिल्पकाराशी विवाह केला.
कालांतराने पती आणि मुलांसह त्या इंग्लंडला परतल्या. त्यानंतरच्या काळात त्यांनी विपुल लेखन केले. त्यात लहान मुलांसाठी कथा- कादंबऱ्यांचे प्रमाण ५० च्या घरात आहे. त्याशिवाय प्रौढांसाठी कादंबऱ्या, इतरही बरेच लिखाण त्यांच्या नावावर आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.
उत्साहाचे रसरशीत जीवन जगलेल्या लिन यांचे अनुभवविश्व अत्यंत समृद्ध होते. पण त्याहीपेक्षा कमालीचे होते त्यांचे लेखन. एखाद्या लिखाणाचे कौतुक झाल्यावर आकाश दोन बोटे उरणाऱ्या लेखकांच्या तुलनेत इतके यश मिळवून, ते पचवून सतत लिहित राहणाऱ्या लिन यांचे उदाहरण विरळाच.