उंटाच्या पाठीवरून सुरू झालेला उद्याोग-प्रवास, तिसऱ्या पिढीपर्यंत देश-विदेशाच्या सीमा लांघून जगभर पसरत गेला… या वर्णनाची प्रचीती म्हणजे कॅम्लिन उद्याोग समूह. दांडेकर बंधूंनी १९३१ साली सुरू केलेल्या या उद्याोगातील सुभाष दांडेकर हे दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी. पण त्यांनी नावीन्याची कास, द्रष्टेपणा व धडाडीच्या आधारे या पारंपरिक उद्याोगाला आधुनिक तोंडवळा दिला. याचा पुरावा हाच की, कॅम्लिनची दौत आणि पेन्सिलीने अनेक शालेय, महाविद्यालयीन पिढ्यांना घडविले. पण ९० वर्षे सरून गेली तरी कॅम्लिनच्या कंपास पेटीपासून रंग साहित्यापर्यंत नवनवी उत्पादने आजही तितकाच जिव्हाळा आणि विश्वासार्हता राखून आहेत.

मराठी मातीतील या उद्याोग समूहाने महाराष्ट्राच्या भूगोलाशी लांबूनही संबंध नसलेल्या उंटाला बोधचिन्ह म्हणून का बरे स्वीकारले? तर इच्छित ग्राहकांपर्यंत अगदी दुर्गम भागात आपली उच्च-गुणवत्तेची उत्पादने जो इमानाने पाठीवरून वाहून नेतो, त्या उंटाला आपली नाममुद्रा (मूळ नाव कॅमल इन्क) म्हणून स्वीकारणे दांडेकरांना श्रेयस्कर वाटले. आपली पाळेमुळे विसरता कामा नये, हा गुण सुभाष दांडेकर यांनी आजीवन सांभाळला आणि त्यामुळे उद्याोगाचा पसारा वाढवताना, प्रत्येक उत्पादनावरील उंटाची मुद्रा त्यांनी कायम ठेवलीच, दर्जा व गुणवत्तेशी कधीही तडजोड होणार नाही हेही पाहिले. मराठी उद्याोगाने स्व-कौशल्य आणि कष्टाने इतकी उंच झेप घेणे आणि तिसऱ्या पिढीपर्यंत तो अखंडपणे वाढत जाणे, हीच अनोखी गोष्ट ठरावी. भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली.

त्यातच हर्षद मेहता घोटाळ्याने भांडवली बाजारात कमालीची अस्थिरता आणि अविश्वासाचे वातावरण होते. अशातच कॅम्लिनच्या प्रारंभिक समभाग विक्रीने १९९३ मध्ये गुंतवणूकदारांकडून २१ पटीने अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळविला. आव्हानांना पुरून उरणाऱ्या सक्षमतेच्या सुभाष दांडेकर यांच्या प्रवासातील हाही एक ठळक अध्यायच. याच आर्थिक संक्रमणाच्या काळात (१९९० ते ९२) त्यांनी राज्याच्या उद्याोग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपद भूषविले. कॅम्लिन फाइन सायन्सेस ही रंगाकडून रसायनांच्या निर्मितीतील वेगळी वाट त्यांनी चोखाळली. त्यांचा मुलगा आशीष या कंपनीची धुरा आज समर्थपणे सांभाळत आहे. राज्यातील हजारो उद्याोजकांना प्रेरणा आणि मदतीचा हात देणारे त्यांचे समाजोपयोगी कार्यही असामान्यच. स्थानिक स्तरावरील उद्याोजकांचे प्रश्न विनाविलंब निकाली निघावेत ही संकल्पना त्यांनी तत्कालीन उद्याोगमंत्री विलासराव देशमुख यांच्यापुढे मांडली आणि त्यातून उद्याोग मित्र समितीचा पाया रचला गेला. या स्वरूपाचे प्रयत्न आणि पाठपुरावा वेगवेगळ्या रूपात आजही सुरू आहे. अत्यंत उज्ज्वल कारकीर्द राहिलेल्या ज्येष्ठ उद्याोजकाला त्यांनीच घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे व्यापार-उद्याोगात सचोटी व तत्त्वनिष्ठेशी कटिबद्धता प्रत्येकांत दिसून यावी, हीच खरी आदरांजली ठरावी.