रवींद्र पांडुरंग आपटे हे नाव उच्चारताच ते शेती, सहकार, दूध क्षेत्रातील संशोधनाशी संबंधित असेल असे कोणाच्याही ध्यानीमनी येणार नाही. नुकतेच त्यांचे निधन झाले आणि या व्यक्तीभोवती भिन्न वाटणाऱ्या या विषयाची नाळ किती घट्ट आणि साक्षेपी नजरेने जोडलेली होती हे प्रकाशात आले. शेती, शेतीपूरक व्यवसायांमधील विविध प्रयोगांपासून ते गोकुळसारख्या देशातील एका मोठ्या सहकारी दूध संघाच्या आजवरच्या वाटचालीमागे या कृषी संशोधकाचे द्रष्टेपण दडलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आपटे यांना सुरुवातीपासूनच शेती आणि शेतीपूरक दूध व्यवसायाबद्दल प्रचंड आकर्षण होते. यामागे घरची शेती, दूध व्यवसाय याची पार्श्वभूमी असली, तरी त्यांची दृष्टी त्यापलीकडे काही शोधणारी होती. यातूनच त्यांनी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आपटे यांनी कृषी विषयाची पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेताना मानाचे सुवर्णपदक पटकाविले. या शिक्षणानंतर परदेशांतील अनेक नामांकित कंपन्यांचे निमंत्रण असताना आपटे यांनी मात्र इथल्याच काळ्या मातीत काम करण्याचे ठरवले. यातूनच ऐंशीच्या दशकात त्यांच्या उत्तुर या गावी आपटे यांनी पहिल्यांदा संकरित गाई आणल्या. त्यांचे संगोपन, दूध व्यवसायाची भरभराट हा त्या वेळी परिसरात चर्चेचा विषय बनला. ही नवलाई पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांची पायधूळ उमटू लागली. घरचा गोठा आधुनिक केल्यावर त्यांनी याच पद्धतीने त्यांच्या गावातीलच प्रगती दूध संस्थेचा विस्तार केला. यातून पुढे आपटे आणि दूध व्यवसायातील मार्गदर्शन हे सूत्रच बनले. त्या वेळी संपूर्ण आजरा तालुक्यात जेमतेम १५ ते २० असलेल्या दूध संस्थांचा विस्तार आपटे यांनी साडेतीनशेपर्यंत नेला.

त्यांची ही धडपड गोकुळचे तत्कालीन अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपटे यांना गोकुळमध्ये आणले. त्यांचे या क्षेत्रातील ज्ञान आणि योगदानामुळे गोकुळशी ते कायमचेच जोडले गेले. सहकारी तत्त्वावरील या संस्थेत संचालक मंडळात कितीही बदल झाले, तरी आपटे आणि गोकुळ हे नाते कायम राहिले. १९८७ ते २०२२ अशी तब्बल ३५ वर्षे ते गोकुळचे संचालक होते. यातही तीन वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या या कार्यकाळात केवळ शेतीचा जोडधंदा म्हणून असलेला हा दुग्धव्यवसाय पूर्णपणे व्यावसायिक झाला. दूधउत्पादक, त्याचा गोठा, जनावरे, चारा, औषधे, वाहतूक, साठवण, वितरण, उत्पादकांची देयके या प्रत्येक टप्प्यावर गोकुळने प्रगती केली. गोकुळच्या आजच्या धवलक्रांतीची बीजे आपटे यांच्याच काळात रुजली गेली. आपटे यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेत, त्यांना महानंद संस्थेवरही उपाध्यक्ष म्हणून सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. शेती, सहकारी साखर कारखानदारी या क्षेत्रातही मार्गदर्शकाच्या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहिले जात होते. महाराष्ट्राच्या धवलक्रांतीला दिशा देणारा संशोधक त्यांच्या निधनाने हरपला आहे.