दीडशे वर्षांपूर्वी मुंबईपाठोपाठ सोलापुरात वस्त्रोद्योग सुरू झाला, त्याच वेळी तेलंगणा भागात पडलेल्या दुष्काळामुळे उदरनिर्वाहासाठी तेथील विणकर कुटुंबे सोलापुरात स्थलांतरित झाली. पारंपरिक हातमागावर साडी, धोतरनिर्मितीबरोबर पुढे यंत्रमागावर चादर, टॉवेल, बेडशीटसारखी उत्पादने तयार होऊ लागली. महिला विडय़ा वळून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू लागल्या. सोलापुरी चादरीला नाममुद्रा मिळाली. हा विणकर समाज पुढे सोलापूरच्या मातीशी एवढा एकरूप झाला की, वस्त्रोद्योग आणि विडी उद्योगासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांतही तेलुगु भाषक विणकरांनी ठसा उमटविला. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रोत्साहनातून या समाजातून राजकीय नेतृत्वाचा उदय झाला. सहकार चळवळीतून तीन सूतगिरण्या उद्योग बँक, हातमाग संस्था महासंघ, सहकारी रुग्णालय अशा अनेक संस्थांची उभारणी झाली. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रीपदापर्यंत या समाजाची भरभराट झाली. एके काळी सोलापूरच्या स्थानिक राजकारणाची सूत्रे विणकर समाजाचे प्राबल्य असलेल्या शहराच्या पूर्व भागातून हलविली जात. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना त्या काळात पद्मशाली समाजाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागत असे. या विणकर पद्मशाली समाजातून रामकृष्णपंत बेत, गंगाधर कुचन, ईरय्या बोल्ली, नरसय्या आडम आदी नेत्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला. याच मालिकेत धर्मण्णा मोंडय्या सादूल यांचे स्थान उल्लेखनीय होते. शांत, संयमी, सुसंस्कृत, विनम्र आणि विणकर समाजाच्या विकासाची दूरदृष्टी असलेले धर्मण्णा सादूल हे काँग्रेसच्या मुशीतून तयार झाले आणि सहकार चळवळीतही पुढे आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा