संशोधन क्षेत्रात देशाचा ठसा उमटायला हवा असेल तर पायाभूत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करायला हवे, असे शिक्षणतज्ज्ञ, संशोधक डॉ. हेमचंद्र प्रधान यांचे ठाम मत होते. सत्तरच्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात अव्वल असणाऱ्या एमआयटी विद्यापीठात त्यांनी आण्विक भौतिकशास्त्रातील पीएचडी पूर्ण केली होती. त्यानंतरही काही काळ परदेशातील विद्यापीठांमधून संशोधन केल्यानंतर भारतात येऊन त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात अध्यापनाची सुरुवात केली. त्यानंतर १९८८ साली ते होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र – टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम सुरू केले. ऑक्टोबर २००८ ते जून २०११ या काळात संस्थेचे संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात संस्थेने विस्तार आणि गुणवत्तेबाबत उल्लेखनीय काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड स्पर्धेत विज्ञान विषयासाठी भारतीय संघ १९९८ साली पहिल्यांदा सहभागी झाला तो त्यांच्याच नेतृत्वाखाली. त्यानंतर विज्ञान आणि खगोलशास्त्रातील अनेक पारितोषिके भारतीय संघाने त्यांच्या नेतृत्वात मिळवली. अनेक वर्षे या स्पर्धांसाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक, सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागात ते २०१२ ते २०१७ या काळात राजा रामण्णा फेलो होते. आण्विक भौतिकशास्त्र, विज्ञान व गणित शिक्षणाशी संबंधित ५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि ३० हून अधिक पुस्तकांचे लेखन, सहलेखन तसेच संपादनही केले आहे.
देशा-परदेशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये, शिक्षणासाठीच्या शासकीय संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली होती. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील (एनसीईआरटी) विविध समित्यांचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. मात्र ते खरे रमले ते बालशिक्षणात. शालेय स्तरावरील अभ्यासक्रम कसा असावा, प्रत्यक्ष अध्यापन करताना काय लक्षात घ्यावे याबाबत त्यांनी मांडलेल्या मूलभूत विचारांनी राज्यातील शिक्षण क्षेत्राला कायमच दिशा दाखवली. अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अध्यापनाच्या नव्या पद्धतींवर काम, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी काम, शिक्षक प्रशिक्षण, अभ्यास साहित्याची निर्मिती अशा अनेक पटलांवर त्यांनी केलेले कार्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी मोठे संचित आहे. कठीण संकल्पना अत्यंत सुलभतेने समजावून सांगण्याची हातोटी आणि मृदू भाषा अशा लोभस व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. प्रधान यांची अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती यांबाबतची ठाम आणि वेळप्रसंगी कठोर भूमिका धोरणकर्त्यांनाही चुकीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडत असे. गेल्या पाच वर्षांपासून देशभरात नव्या शैक्षणिक धोरणाचे वारे वाहत आहेत. त्यापूर्वी दोन दशके डॉ. प्रधान यांनी कृतिशील शिक्षणाच्या प्रसाराचे काम हाती घेतले. विद्यार्थ्यांना नवे शिकण्यासाठी उद्याुक्त केले पाहिजे, या विचारातून विज्ञान आणि गणित शिक्षणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. विज्ञान- गणित शिक्षणातील त्यांच्या अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. विज्ञान शिक्षणाबरोबरच वैज्ञानिक मूल्ये जनमानसात रुजावीत यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. वार्धक्य आणि त्याचबरोबर आजारपण याला तोंड देतानाही शिक्षण, अभ्यासक्रम, विज्ञानप्रसार याचा त्यांचा ध्यास कायम होता. त्यांच्या निधनाने एक द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.