भारतात न्यूटेला पराठा किंवा न्यूटेला डोसा यांसारखे पदार्थ मिळतात, हे वयाच्या ९७ व्या वर्षी तरी फ्रान्चेस्को रिव्हेला यांना माहीत होते की नाही, कोण जाणे! १४ फेब्रुवारीला या रिव्हेला यांचे निधन झाले. त्यामुळे आता, न्यूटेलाचा साज ल्यालेल्या भारतीय पदार्थांची माहिती त्यांना होती की नाही, हे कुणालाच सांगता येणार नाही. पण या न्यूटेलाचे संशोधक कुणीतरी फ्रान्चेस्को रिव्हेला म्हणून इटालियन होते, इतपत माहिती एव्हाना अनेक भारतीयांना झालेली आहे. त्यांच्या निधनवार्तेनंतर काहींनी फेसबुकादी समाजमाध्यमांवर ‘पसंद है न्यूटेला? अब जानिए इसके जन्मदाता को…’ वगैरे प्रकारचा मजकूर प्रसवलेला/ पसरवलेला आहेच, गेल्या आठवड्याभरात.
हे फ्रान्चेस्को रिव्हेला एका बलाढ्य चॉकलेट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी होते, ही फारच त्रोटक ओळख ठरेल. ती कंपनी बलाढ्य करण्यातही रिव्हेला यांचा मोठा वाटा होता. इटलीच्या टुरीन शहराजवळ मिशेल फेरोरो यांनी सुरू केलेल्या या कंपनीचे नावही मिशेल यांच्या आडनावावरूनच ठेवलेले आहे, इतका हा गृ़हउद्याोग होता एकेकाळी. पण बेडेकर, कुबल आदी एकेकाळचे गृहउद्याोग जसे वाढले, तसा हा फेरोरोचा उद्याोगही वाढला. गल्लोगल्ली अंड्याच्या आकारात मिळणाऱ्या किंडर जॉय या चॉकलेटचे निर्मातेही हे फेरोरोच. तर या फेरोरोंच्या दुकानवजा कंपनीत १९५२ मध्ये- ऐन पंचविशीतल्या फ्रान्चेस्को रिव्हेलांना नोकरी लागली. फ्रान्चेस्कोंकडे रसायनशास्त्राची पदवी होती टुरीन विद्यापीठाची. शहरातून उच्चशिक्षण घेऊन आलेल्या या तरुणाकडे नवनवीन चॉकलेटप्रकार शोधण्याची- खरे तर कमी खर्चात अधिक किफायती माल कसा बनवता येईल याचीसुद्धा – जबाबदारी सोपवण्यात आली. ती फ्रान्चेस्कोंनी उत्तम पार पाडली. इतकी उत्तम की, ‘न्यूटेला’ची क्रांतीच जगभर घडली.
अर्थात त्यांचा उल्लेख नेहमीच ‘न्यूटेलाचे सह-संशोधक’ असा केला जातो. दुसरे संशोधक म्हणजे खुद्द मिशेल फेरोरो. या फेरोरोंनी म्हणे १९४६ सालीच ‘जांदुया’ (स्पेलिंग Gianduja) नावाचे अत्यल्प कोको आणि बरीचशी हेझलनटची पेस्ट वापरलेले चॉकलेट तयार केले होते. तेव्हा अक्षरश: ‘गरज ही शोधाची जननी’ होती, कारण दुसऱ्या महायुद्धामुळे (आणि १९४० सालात फ्रान्स, ब्रिटनवर हल्ले करण्याइतपत फुरफुरणाऱ्या फॅसिस्ट इटलीला १९४५ मध्ये त्यात सपाटून मार खावा लागलेला असल्यामुळे) कोको मिळणे दुरापास्तच झाले होते. हाच तो काळ, जेव्हा अमेरिकेतही ‘पीनट बटर’ची लोकप्रियता अतोनात वाढलेली होती. शेंगदाण्यापेक्षा हेझलनट चटकन मिळवणाऱ्या या कंपनीने १९५१ मध्येच ‘जांदुया’पासून पीनट बटरसारखा, पावाला लावता येणारा ‘सुपरक्रेमा’ हा पदार्थ बाजारात आणून पाहिला. तो चालला नाही, कारण सपाट पावावर तो नीट एका थरात पसरतच नसे. या सुपरक्रेमाला सुधारण्याची किमया फ्रान्चेस्को रिव्हेला यांची! मग १९६४ मध्ये ‘न्यूटेला’ या नावाने रिव्हेलांनी शोधून काढलेला नवा पदार्थ बाजारात आला. पावावर विनासायास पसरणारा, चटकन खराब न होणारा, साठवून ठेवता येणारा हा पदार्थ होता. त्याचे नाव म्हणजे मुळात, हेझलनट मधला ‘नट’ आणि रिव्हेला या आडनावातला ‘एला’ यांचे संधी-संयुग होते. ‘न्यूटेला’ने १९६६ पर्यंत जर्मनी आणि फ्रान्समध्येही जम बसवला, मग १९७८ पर्यंत तो इंग्लंड- अमेरिकेतही पोहोचला. रिव्हेला मात्र फेरोरो कंपनीतच राहिले. या कंपनीच्या व्यवस्थापनातही त्यांचा समावेश झाला. तीन मुलगे आणि एक विवाहित कन्या यांचे सुखी संसार पाहून त्यांचे उतारवय गोड झाले होते.