१९६०-७०च्या दशकामध्ये अमेरिकेत आफ्रिकी-अमेरिकनांच्या जाणिवा टोकदार बनू लागल्या होत्या. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात (१८६५) अमेरिकेत अब्राहम लिंकनकृत १३व्या घटनादुरुस्तीने गुलामगिरी नष्ट केली, त्याला १०० वर्षे उलटूनही त्या देशातील गौरेतरांना- विशेषत: कृष्णवर्णीयांना समान वागणूक, समान हक्क, समान संधी पुरेशा मिळत नव्हत्या. परिस्थिती हलाखीची होती आणि गुन्हेगारी हा स्वाभाविक मार्ग होता. पण यातील काही तरुण बॉक्सिंगकडे वळले. पुढे मोहम्मद अली यांच्या आगमनानंतर बॉक्सिंग हा अनेक कृष्णवर्णीयांच्या स्वाभिमानाचा आणि संस्कृतीचा हुंकार ठरला. बॉक्सिंगचे सुवर्णयुग मानल्या जाणाऱ्या या काळात मोहम्मद अली, जो फ्रेझियर आणि जॉर्ज फोरमन या त्रिकुटाने बॉक्सिंग रिंग गाजवलीच, पण त्यांच्यामुळे दूरचित्रवाणी प्रक्षेपणाद्वारे हा खेळ जगभर पोहोचला. तिघेही व्यावसायिक बॉक्सर. अमेरिकेतील हौशी बॉक्सिंग व्यवस्थेतून ते उदयाला आले. पुढे आलटून-पालटून हेवीवेट गटात जगज्जेते बनले. अली आणि फोरमन तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतेही होते. त्या रांगड्या, राकट परंपरेतील अली व फ्रेझियर यांच्या पाठोपाठ आता जॉर्ज फोरमन हेही निवर्तल्यामुळे एक सुवर्ण अध्याय संपुष्टात आला.

फोरमन यांचा जन्म टेक्सासच्या आडगावात १० जानेवारी १९४९ रोजी झाला. काही वर्षांनी त्यांची आई सहा पोरांसह ह्यूस्टनला आली. जॉर्ज फोरमन शाळेबाहेर गुंडगिरी करू लागले. पण १६व्या वर्षी अमेरिकी सरकारच्या रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमात दाखल झाल्यामुळे, अधोगतीपासून बचावले. आडदांड व्यक्तिमत्त्वामुळे अनेकांच्या सांगण्यावरून ते १७ व्या वर्षी बॉक्सिंग करू लागले. राग आणि निराशा बॉक्सिंग रिंगमध्ये मोकळी कर, असा सल्ला त्यांना कुणीतरी दिला होता. तो शिरसावंद्या मानून जॉर्ज फोरमन यांनी सराव सुरू केला. अल्पावधीत प्रावीण्य मिळवले. इतके, की १९६८ मधील मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये हेवीवेट वजनी गटात त्यांनी सुवर्णपदक जिंकले, तेही एका सोव्हिएत प्रतिस्पर्ध्याला हरवून! त्या स्पर्धेत टॉमी स्मिथ व जॉन कार्लोस या धावपटूंनी पदकदानावेळी मुठी उगारून कृष्णवर्णीयांना अमेरिकेत मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध व्यक्त केला होता. फोरमन यांनी मात्र सुवर्णपदक जिंकल्यावर बॉक्सिंग रिंगमध्ये अमेरिकी ध्वज फडकवला. ‘अमेरिकी असल्याचा आनंदच वाटतो,’ ही त्यांची भूमिका तेव्हा धाडसाची ठरली होती.

१९७१मध्ये हेवीवेट जगज्जेतेपदाच्या लढतीत फ्रेझियर यांनी अलींना हरवले, सर्वस्वी अनपेक्षितरीत्या. पुढे फ्रेझियरना फोरमन यांनी १९७३मध्ये काही मिनिटांत लोळवले, तेही अनपेक्षितरीत्या. पण जगज्जेतेपदाचा आनंद फार टिकला नाही. कारण पुढच्याच वर्षी अली यांनी फोरमन यांना पराभूत केले. निराश झालेले फोरमन पुढे काही काळ धर्मोपदेशक बनले. वेगळे काही करण्याच्या जिद्दीतून काही वर्षांनी त्यांनी ग्रिल ओव्हन निर्मितीचा व्यवसाय सुरू केला, नफा कमावला. पण बॉक्सिंग रिंग खुणावतच होती. त्यामुळे बॉक्सिंग सोडून दहा वर्षे झाल्यानंतर फोरमन यांनी रिंगमध्ये धाडसी पुनरागमन केले. सुरुवातीस संमिश्र यश मिळाल्यानंतर १९९४मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी मायकेल मूररला हरवून दुसऱ्यांदा जागतिक हेवीवेट जगज्जेतेपद पटकावले. अलींशी हरलेला नव्हे, तर ‘सर्वांत वयस्कर जगज्जेता’ हीच आपली अंतिम ओळख राहील हे फोरमन यांनी ३० वर्षांपूर्वीच अशा प्रकारे सुनिश्चित केले.