‘तुम्हाला वेगाचे एवढे वेडच असेल तर कार रेसिंगसारख्या खेळांत भाग घ्या… इथे शहरात आमच्या जिवावर नका उठू…’ हा अनेक पादचाऱ्यांच्या मनातला उद्गार एकीकडे आणि कार रेसिंग म्हणजे केवळ ‘फॉर्म्युला वन’सारखा महागडा- आणि फक्त परदेशांतच होणारा खेळ हे भारतीयांचे (अ)ज्ञान यांबद्दल खंत-खेद न बाळगता इंदु चंधोक यांनी भारतात कार रेसिंगची संस्कृती रुजवण्यासाठी सुमारे ६० वर्षे सलग प्रयत्न केले होते! या इंदु चंधोक यांचे निधन शनिवारी, वयाच्या ९३ व्या वर्षी झाले; पण त्यांच्या पुढल्या दोन पिढ्यांकडे त्यांनी या खेळाचा वारसा सोपवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेसिंगसाठीच्या मोटारगाड्या विशिष्ट प्रकारच्याच असाव्या लागतात, क्षमतेनुसार गट पाडून एकेका गटातील कारचीच एकेक शर्यत होत असते वगैरे नियमांनी चालणारा खेळ १९५० च्या दशकात अर्थातच भारतात नव्हता. रस्त्यांवरच ‘कार रॅली’ मात्र त्याहीवेळी होई. सन १९५५ मध्ये महाबलिपुरम ते मद्रास अशा कार रॅलीत इंदु चंधोक यांनी स्वत:च्या ‘ट्रायम्फ मेफ्लॉवर’ गाडीसह भाग घेतला आणि पहिले आले. त्याआधी १९५४ पासून ‘मद्रास मोटर स्पोर्टस क्लब’चे ते सदस्य होते आणि १९५६ मध्ये ते या क्लबचे सरचिटणीसही झाले. शर्यतींचा छंद ‘रॅली’ फारच लुटूपुटूची- खरा खेळ खास आखलेल्या पट्टीवरच रेसिंगच्या गाड्यांचा, हा विचार क्लब-सदस्यांच्या गळी उतरवून त्यांनी १९५९ मध्ये तात्पुरत्या ट्रॅकवर पहिली कार रेसिंग स्पर्धा भरवली, म्हणून ते कार रेसिंगचे अध्वर्यू!

कोलकात्यात १९३१ साली इंदु चंधोक यांना जन्म देणारे व्यापारी कुटुंब पुढल्याच वर्षी तत्कालीन मद्रासमध्ये (चेन्नईत) आले. इंदु यांचे शिक्षण इंग्रजीत झाले असले तरी, कामचलाऊ तमिळ त्यांना येई.  त्या वेळचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री, माजी अभिनेते ‘एमजीआर’ हे कार रेसिंग स्पर्धाना उपस्थित राहात, तेव्हा त्यांना नेमके बारकावे तमिळमध्ये इंदुच सांगत. हा खेळ पुढल्या दीडदोन दशकांत इतका वाढला की, १९७१ मध्ये ‘फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट क्लब्ज ऑफ इंडिया’ या महासंघाची स्थापना करण्यात इंदु यांनी पुढाकार घेतला. आधी शोलावरम येथे, तर १९८९ नंतर इरुंगकोट्टकइ या गावानजीक इतका उत्तम रेसिंग ट्रॅक इंदु यांच्या देखरेखीखाली उभारला गेला की, आज येथे होणाऱ्या वार्षिक स्पर्धेसाठी विदेशी स्पर्धकही येतात. इंदु यांचे पुत्र विकी चंधोक यांनी वडिलांइतक्याच उत्साहाने या स्पर्धाच्या व्यवस्थापनाचा वारसा सांभाळला, तर नातू करुण चंधोक हे स्वत: कार रेसिंगमध्ये भाग घेतात.